‘मैंने प्यार किया’ व ‘हम आपके...

‘मैंने प्यार किया’ व ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटांचे संगीतकार रामलक्ष्मण यांचे निधन : लतादीदींची श्रद्धांजली (Hum Aapke Hain Kaun Music Composer Raam Laxman Passes Away)

‘मैंने प्यार किया’ व ‘हम आपके हैं कौन’ या सुपरहिट चित्रपटांना मधुर संगीत देणारे संगीतकार रामलक्ष्मण यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. मराठी चित्रसृष्टीतील तुफान यशस्वी कलाकार शाहीर दादा कोंडके यांच्या बव्हंशी चित्रपटांना रामलक्ष्मण यांचेच धमाल म्युझिक लाभले होते.

ते ७९ वर्षांचे होते व गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. नागपूर येथील आपल्या घरी त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचे मूळ नाव विजय पाटील होते. संगीतकार म्हणून त्यांचे पार्टनर होते सुरेंद्र. या दोघांनी राम-लक्ष्मण अशी नावे घेऊन संगीतक्षेत्रातील कारकीर्द सुरू केली. त्यामध्ये लक्ष्मण होते विजय पाटील. परंतु सुरुवातीलाच सुरेंद्र अर्थात राम यांचे दुर्दैवी निधन झाले. (‘एजंट विनोद’ हा हिंदी चित्रपट या जोडीने करारबद्ध केला होता.) तरीपण आपल्या संगीतक्षेत्रातील भागीदाराची स्मृती जागवत विजय पाटील यांनी ‘रामलक्ष्मण’ या नावाने संगीत देण्यास सुरुवात केली. अन्‌ हिंदी, मराठी व भोजपुरी भाषेतील २० हून अधिक चित्रपटांस संगीत दिले. परंतु राजश्री प्रॉडक्शन्स्‌ या मातब्बर निर्मिती संस्थेच्या ‘मैंने प्यार किया’ व ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील गाणी तुफान हिट झाली. या दोन्ही सिनेमांचा नायक सलमान खान होता. याच दरम्यान शाहीर दादा कोंडके यांच्या बव्हंशी चित्रपटास रामलक्ष्मण यांचेच संगीत लाभले. दादांच्या या यशस्वी चित्रपटांची उडती गाणी मराठी प्रेक्षकांच्या अद्यापही तोंडी आहेत.

गानसरस्वती लतादीदी मंगेशकर यांनी ट्वीटरवर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या लिहितात – अतिशय गुणी आणि लोकप्रिय संगीतकार रामलक्ष्मण (विजय पाटील) यांचे निधन झाल्याची वार्ता समजली. ती ऐकून मला अतीव दुःख होत आहे. तो एक चांगला माणूस होता. मी त्यांची बरीच गाणी गायली. ती खूपच लोकप्रिय ठरली. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करते.