ह्रता दुर्गुळेचे वेब सिरीजमध्ये पदार्पण (Hruta ...

ह्रता दुर्गुळेचे वेब सिरीजमध्ये पदार्पण (Hruta Durgule Talked About Her Upcoming Web Series)

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाली आहे. मालिका, नाटक, चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवल्यानंतर ह्रता आता वेब सिरीजमधील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. याबद्दल ह्रताने स्वत: एका मुलाखतीत सांगितले.

ह्रता लवकरच ‘अगं आई, अहो आई’ या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिरीजमध्ये आई हे पात्र कोण साकारणार हे अद्याप समजलेले नाही. मात्र सूनेची भूमिका ह्रता साकारणार आहे.

लग्नानंतर मुलीचे बदलणारे आयुष्य, नाती, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना तसेच अगं आई ते अहो आई पर्यंतचा प्रवास या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.

या सिरीजबद्दल ह्रताने सांगितले की, मला या संपूर्ण टीमसोबत काम करण्याची आधीपासून इच्छा होती. नवीन टीमबरोबर नव्या प्रोजेक्टसाठी काम करताना अगदी लहानपणी शाळेतल्या पहिल्या दिवशी जसं दडपण असायचं, तसं काहीसं वाटतंय. पण संपूर्ण टीम खूप छान आहे. सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच लेखिका कल्याणी पंडित यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला. ‘दूर्वा’ आणि ‘मन उडु उडु झालं’ या दोन्ही मालिकांत सासू-सुनेचं छान नातं दाखवलं होतं. आता ‘अगं आई अहो आई’च्या निमित्ताने प्रत्येकाला आपल्याच घरातली वाटेल अशी गोष्ट वेब सीरिजमध्ये पाहायला मिळेल.’

विशेष म्हणजे ह्रताचे नुकतेच लग्न झाल्यामुळे तिच्या आयुष्यातही या वेब सिरीजसारखेच बदल घडले आहे. ह्रताला तिच्या सासूबाईंबद्दल विचारले असता ती म्हणाली की, प्रतिकच्या आईचं आणि माझं नातं माय-लेकींसारखंच आहे. ‘दुर्वा’ मालिकेपासून त्यांना मुग्धाताई अशी हाक मारायची सवय लागली आहे. घर सांभाळणं आणि काम हे करताना तारेवरची कसरत होते. पण मुग्धाताई सगळं सांभाळून घेतात. त्यामुळे कोणताही ताण नसतो.