गर्लफ्रेंड सबासह लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय...

गर्लफ्रेंड सबासह लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय ही केवळ अफवा… हृतिकने सोडलं मौन (Hrithik Roshan Reacts On Rumours Of Live In Relationship With Saba Azad)

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद बॉलिवूडच्या बहुचर्चित जोड्यांपैकी एक मानली जातात. बरेचदा या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी डिनर तर कधी बॉलिवूड पार्टी असं हे दोघं सध्या बऱ्याच वेळा एकमेकांबरोबर दिसतात. नुकत्याच या दोघांच्या लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत होत्या. यावर आता हृतिक रोशनने मौन सोडलं आहे.

हृतिकने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून एक ट्वीट करत लिव्ह इन रिलेशनशिपच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. अलिकडेच एका रिपोर्टमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद लवकरच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचा दावा केला होता. एवढंच नाही तर त्यासाठी हृतिकने एक आपार्टमेंटही विकत घेतल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं. ज्यावर आता हृतिक रोशनने प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत हे सर्व रिपोर्ट अफवा असल्याचं हृतिकने म्हटलं आहे.

हृतिक रोशनने त्याच्या ट्वीटमध्ये एका बातमीची लिंक शेअर केली आहे. या बातमीत हृतिक रोशन आणि सबा आझाद यांनी एक अपार्टमेंट विकत घेतलं असून लवकरच ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही लिंक शेअर करताना हृतिकने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “मी एक प्रसिद्ध व्यक्ती असल्याने माझ्याबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची लोकांची इच्छा असते हे मी समजू शकतो. पण या वृतामध्ये कोणतंही तथ्य नाही. या केवळ अफवा आहेत. माझ्या आयुष्यात खरंच काय चाललंय हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवणं बंद कराल.”