वॉशिंग मशीनचा योग्य वापर कसा कराल? (How to use ...

वॉशिंग मशीनचा योग्य वापर कसा कराल? (How to use Washing Machine In a Perfect Manner?)

वॉशिंग मशीनच्या योग्य वापराने केवळ वीजच नव्हे तर पैसेही वाचवा!

आधुनिक तंत्रज्ञानानं गृहिणींची दैनंदिन कामं हलकी करण्यासाठी अनेक मशीन्स निर्माण केल्या. ज्या खरोखरच अतिशय उपयुक्त आहेत. परंतु या मशीन्सचा योग्य प्रकारे वापर केला गेला नाही तर त्याच्यामुळे होणार्‍या नुकसानाला सामोरं जावं लागतं. अशा काही मशीन्सपैकी वॉशिंग मशीनच्या योग्य वापराने केवळ वीजच नव्हे तर पैसेही कसे वाचवता येतील ते आपण पाहूया.

– कापड कोणतं आहे (जसं सुती, सिंथेटिक, फायबर इत्यादी ) त्यानुसार मशीनला टायमर लावा.
– वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.
– जास्त मळलेले कपडे असतील तर ते गरम पाण्यात डिटर्जंट घालून 15-20 मिनिटं भिजवून ठेवा. नंतर मशीनमध्ये टायमर लावून धुवा.
– मशीनची जेवढं वजन घेण्याची कुवत असेल त्या प्रमाणातच कपडे घाला. मशीन अंडरलोड वा ओव्हरलोड करू नका. त्यामुळे वीज जास्त प्रमाणात खर्च होते.

– कमी वजनाचे आणि जड वजनाचे कपडे (बेडशीट, टॉवेल, पडदे इत्यादी ) वेगवेगळे धुवा. कारण दोन्ही प्रकारच्या कपड्यांना धुण्यासाठी वेगवेगळी वेळ सेट करावी लागते.
– गरम पाण्याचं तापमान कमी ठेवून आपण ऊर्जा वाचवू शकतो.
– मशीनमध्ये योग्य प्रमाणात डिटर्जंट घाला.
– मशीनमध्ये शॉर्टेस्ट सायकल आणि लोएस्ट वॉटर लेव्हल वरच कपडे धुवा.
– रोजच्या वापरातले कपडे कमी तापमानावर धुवा.
– कपडे घुसळण्यासाठी गरम पाणी न वापरता थंड पाण्याचा वापर करा.
– ड्रायरमध्ये कपडे एकदम सुकवू नका. थोडे ओलसर ठेवून उन्हात सुकवा.
– मशीनमध्ये ऑटो-ड्रायर असल्यास टायमर लावा.
– उन्हाळ्याच्या दिवसात कपडे ड्रायरला लावण्याऐवजी उन्हात सुकवा. वीज वाचेल आणि बिलही कमी येईल.
– ड्रायरला कपडे लावताना ते वेगवेगळे करून टाका. उदाहरणार्थ – सिंथेटिक कपडे एकत्र टाका. कारण सुती कपड्यांच्या तुलनेत ते लवकर सुकतात.
– प्रत्येक वेळी ड्रायरचा वापर करून झाल्यानंतर ड्रायर फिल्टर साफ करून घ्या. यामुळे एअरफ्लो चांगला राहतो आणि ड्रायरही चांगल्या पद्धतीने काम करतो. ड्रायरचा योग्य वापर करून आपण 10 टक्के ऊर्जा वाचवू शकतो.
– वॉशिंग मशीन 10 वर्षे जुनी असेल तर ती बदलून नवीन मशीन घ्या. कारण जुनं मशीन जास्त प्रमाणात ऊर्जा खेचतं.