पावसाच्या दिवसात केसांची निगा कशी राखाल? (How T...

पावसाच्या दिवसात केसांची निगा कशी राखाल? (How To Take Care Of Your Hair In Rainy Days)


बाहेर मस्त पाऊस पडत असेल तर, मनसोक्त भिजावंसं वाटतं ना! पावसात भिजण्याची ओढ सगळं विसरायला लावते. पण केसांची होणारी दुर्दशा आपण विसरू शकत नाही.

आपला केशसंभार चांगला आणि आकर्षक दिसावा यासाठी आपण प्रयत्न करतोच. पण पावसाळ्यात या सार्‍या प्रयत्नांवर पाणी पडते. पावसात भिजून ओलंचिंब होण्याचा आनंद घेताना केसांचे होणारे हाल पाहवत नाहीत. केसांचं नुकसान होऊ नये म्हणून पावसात भिजण्याच्या आनंदापासून लांबच राहणं पसंत केलं जातं. पावसात केसांचं कमीत कमी नुकसान होऊन ते सुंदर आणि नीट कसे राहतील याकरिता त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्यातील ओलसर वातावरणात केस सतत ओले राहिल्याने केसांचं अधिक नुकसान होतं. यामुळे पावसात भिजून आल्यानंतर केस कोरडे करणे गरजेेचे आहे. केस सतत ओले राहिल्याने ते कोरडे व रूक्ष होणे, निस्तेज दिसणे, केस गळणे या समस्या तर सतावतातच. परंतु याशिवाय केसाच्या मुळाशी संसर्ग होऊन केसांच्या इतर समस्याही उद्भवतात. या समस्या होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घ्यायला हवे.

केस कोरडे ठेवा
पावसात अधिकतर प्रमाणात केस भिजतात. केस भिजल्यानं ते कोरडे व रूक्ष होतातच शिवाय त्यांचं पोषणही कमी होतं. म्हणूनच पावसात भिजण्याचा मोह होत असला तरी केसांचं नुकसान टाळायचं असेल तर सतत पावसात भिजू नका. पावसापासून रक्षण व्हावे याकरिता छत्री, कॅप जवळ बाळगा. घरातून निघण्यापूर्वी केसांना लिव्ह ऑन लावा अथवा दोन-तीन थेंब तेल लावा.

केस सतत धुऊ नका
पावसातून आल्यानंतर आंघोळ करणं आवश्यक आहेच. पण प्रत्येक वेळी केस धुतलेच पाहिजे असे नाही. रोज केस धुतल्याने त्याचं अधिक नुकसान होतं. आठवड्यातून केवळ दोन-तीन वेळाच केस धुवा. केस धुतल्यानंतर कंडिशनर जरूर लावा. यामुळे केस निरोगी व सुंदर राहतील. केस ओले असताना केसांना लिव्ह ऑन लावा.

केसांचं नैसर्गिक रूप जपा
केस नैसर्गिकरीत्या जसे आहेत तसेच ठेवण्याचा प्रयत्न करा. या काळात केसांवर वेगवेगळे प्रयोग करू नका. केस सरळ करणे वा कुरळे करणे, हायलाइट करणे, सतत कलर करणे या गोष्टी करू नका. अधिक आर्द्रता असणार्‍या या दिवसात विविध केमिकलचा वापर असणार्‍या
अशा स्टाइल्स केल्याने केसांचे नुकसान होते. शिवाय केस वातावरणातील आर्द्रता शोषून घेत असल्याने ते लगेच पूर्वस्थितीत येतात आणि केलेल्या स्टाइलची मेहनत वाया जाते.

आर्द्रतेपासून संरक्षण करा
वातावरणातील दमटपणामुळे केस सतत ओलसर राहतात आणि त्याचा परिणाम केसांवर होतो. यामुळे केसांना संसर्ग होऊन ते गळण्याचे प्रमाण वाढते. केसांना वास येतो. ते निस्तेज होतात. म्हणूनच या काळात केस आर्द्र होऊ नये याकरिता विविध प्रकारच्या जेल मिळतात. त्यांचा वापर केल्याने केसांच्या क्युटिकलवर संरक्षित आवरण तयार होतं आणि मॉइश्‍चर शोषून घेण्यास प्रतिबंध येतो.

उत्पादने काळजीपूर्वक वापरा
केसांना सतत वेगवेगळी उत्पादने लावल्याने त्याचे वाईट परिणाम केसांवर होतात. या काळात जेल, मॉइश्‍चरायजिंग, क्रिम, हेअर स्प्रे, कलर असे वेगवेगळे प्रॉडक्ट लावल्याने केस चिकट होतात आणि त्यांना लगेच संसर्ग होतो. तसेच सतत शाम्पू, कंडिशनर व लिव्ह ऑन लावणे, ओलसर केस सुकविण्यासाठी सतत हेअर ड्रायरचा वापर करणे या गोष्टीही टाळायला हव्यात.

केसाच्या मुळाच्या त्वचेची काळजी
सतत पावसात भिजून केस ओलसर राहतात, याबरोबरच केसाच्या मुळाच्या त्वचेवरही त्याचा परिणाम होतो. पावसाचे पाणी दूषित असल्याने त्याचे अपायकारक परिणाम केसांवर होतात. मुळाची त्वचा ओलसर राहिल्याने केसांची मुळे कमकुवत होतात. अशा त्वचेला संसर्ग होऊन लगेच कोंडा वा उवा होऊ शकतात. केसाच्या मुळाच्या त्वचेला संसर्ग झाल्यास केसांचे इतर विकार होण्याची शक्यता असते. म्हणून या त्वचेचे प्रथम संरक्षण करावे.

नियमित तेलाचे पोषण
पावसात केस ओले होतात म्हणून बाहेर पडताना आपण तेल लावू शकत नाही. मात्र सतत ओले राहून केस कोरडे होऊ नये याकरिता या काळात नियमितपणे तेल लावले पाहिजे. याकरिता केस धुण्याआधी आदल्या रात्री कोमट तेलाने केसांना व केसाच्या मुळाच्या त्वचेला मालीश करावे. यामुळे तेल केसाच्या मुळामध्ये झिरपते आणि केस मजबूत ठेवण्यास मदत होते. शिवाय तेलामुळे केस मुलायमही होतात. मात्र ओलसर केसांना तेल लावू नये. अन्यथा केसामधील ओलसरपणा, त्यात थपथपलेले तेल यामुळे केस अधिक चिकट होऊन त्यात धूळ आणि घाण जमून राहील आणि केसांचे अधिक नुकसान होईल.
कोणत्याही ऋतूत केसांची काळजी घेणं आवश्यक आहेच. परंतु पावसाळ्यात त्यांना अधिक जपावं लागतं. केसांची काळजी घेताना त्यांची स्वच्छता, स्टाइल, तुमचा दिनक्रम याबाबत पुढील गोष्टींचा काळजीपूर्वक अवलंब केल्याचे केसांचे होणारे नुकसान नक्की टाळता येईल.
केस आणि केसांच्या मुळाकडील त्वचा शक्यतो कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा.
सतत ओलसर राहणार्‍या केसांत कोंडा होण्याची शक्यता असतेच. तेव्हा आठवड्यातून एकदा केसांना अ‍ॅण्टी डॅण्ड्रफ शाम्पू लावा.
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे केस चिकट होतात. याकरिता केस धुतल्यानंतर केसांना लिव्ह ऑन लावा.
केसांचा रूक्षपणा कमी करण्यासाठी काही दिवसांच्या अंतराने केसांना डीप कंडिशनिंग करा. यामुळे केसांना प्रथिनांचे पोषणही मिळते.
पावसाळ्यात शक्यतो भिजण्याचे टाळा. केस भिजले असल्यास केस व्यवस्थित कोरडे करा आणि दोन-तीन थेंब तेल केसांना लावा. केस झटपट सुकण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नका.
केस धुण्याआधी कोमट तेलाने केसांना मालीश करा. यामुळे केसांना कंडिशनिंग मिळते.
वेगवेगळ्या हेअर स्टाइल करत असाल तर केस जास्त ताणले जातील, अशा स्टाइल शक्यतो टाळा. तसेच उगीचच हेअर स्प्रे वा जेलचा मारा करू नका.
केसांना सतत हेअर स्प्रे वा हेअर जेल लावल्यास,
ते केसांमध्ये एकाच जागी जमून राहतात. यामुळे केस चिकट होऊन इतर समस्या निर्माण होतात.
रोज रात्री बोटांनी केसांच्या मुळाशी हळुवारपणे मसाज करा. यामुळे मुळाच्या त्वचेकडील रक्ताभिसरण वाढते आणि केस बळकट होतात.
पावसाळ्यात केस चिकट राहिल्याने केसांमध्ये गुंता होऊन केस तुटण्याची शक्यता असते. तेव्हा केस विंचरण्यासाठी मोठ्या दाताच्या कंगव्याचा वापर करा.
केस धुण्यासाठी सौम्य शाम्पू व कंडिशनरचा वापर करा. कोंडा असल्यास अ‍ॅण्टी डॅण्ड्रफ शाम्पू लावा.
हेअर स्टाइल उत्पादनांचा कमीत कमी वापर करा.
केस स्वच्छ ठेवा आणि आठवड्यातून किमान दोन वेळा धुवा.
या ऋतूत केस रूक्ष आणि निस्तेज होतात, याकरिता नियमितपणे हेअर सिरम वापरा. ज्यामुळे केस मुलायम राहण्यास मदत होईल.
पावसाळ्यात आहार संतुलित ठेवून प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.