पावसाळी हवेत फर्निचर असे जपा (How To Take Care ...

पावसाळी हवेत फर्निचर असे जपा (How To Take Care Of Your Furniture In Rainy Season)


पाणी आणि ओलावा यांचा लाकडावर आणि फॅब्रिकवर आधारित असलेल्या फर्निचरवर फारच वाईट परिणाम होतो. तुमच्या फर्निचरचं आयुष्य वाढावं, ते सुंदर दिसावं यासाठी काही टिप्स्
आता लवकरच पावसाळा सुरू होईल! तुम्ही कदाचित थंडगार शिडकाव्याचा आनंद घ्याल, पण तुमचं फर्निचर नाही घेऊ शकणार. पाणी आणि ओलावा यांचा लाकडावर आणि फॅब्रिकवर आधारित असलेल्या फर्निचरवर फारच वाईट परिणाम होतो. तुमच्या फर्निचरचं आयुष्य वाढावं, ते सुंदर दिसावं यासाठी फर्निचरमधील जाणकार असलेले गोदरेज इंटिरिओचे ललितेश मांद्रेकर यांनी काही उपाय सुचवलेले आहेत. ते खूप चांगलं दिसेल, इतकंच नाही तर त्याचा सुगंधही उत्तम राहील यासाठी काही टिप्स….

तातडीने लक्ष देण्याची गरज
पावसाच्या पाण्याचा शिडकावा होऊ नये आणि गळतीपासून संरक्षण मिळावे, यासाठी तुमचे फर्निचर दरवाजे आणि खिडक्यांपासून दूर हलवा. अगदी थोडेसे थेंब जरी उडाले तरी लाकूड आणि फॅब्रिक खराब करू शकते. आणखी एक उपाय म्हणजे तुमचे वॉर्डरोब भिंतीपासून किमान 6 इंच अंतरावर ठेवा, यामुळे पुरेसं अंतर राहिल्याने वॉर्डरोबची मागची बाजू खराब होणार नाही.
नायलॉन, वेब किंवा रंगवलेलं मेटर यासारखं अगदी गार्डनमधलं फर्निचरसुद्धा पावसाळ्यात ओलं होण्यापासून वाचवलं पाहिजे. त्यासाठी ते आत आणून ठेवलं पाहिजे. यामुळे त्याला भेगा पडणं किंवा रंग उडणं असे प्रकार होणार नाहीत.

खेळत्या हवेची मदत!
हवा खेळती राहणं हे माणसांच्या आणि फर्निचरच्या आरोग्यासाठीसुद्धा हितकारक आहे! हवा खेळती राहिल्यामुळे खोलीतील ओलाव्याचं प्रमाण कमी होतं. तसेच फर्निचरवर थर किंवा बुरशीसुद्धा येत नाही.

नैसर्गिक उपाय
कापूर किंवा नॅप्थलिन बॉल्स हे उत्तम ओलावा शोषून घेतात. कपडे तसेच वॉर्डरोबचे वाळवी आणि इतर कीटकांपासून रक्षण करण्यास यांची मदत होते.
काही नैसर्गिक उपाय करायचा असेल तर कडुनिंबाचा पाला किंवा लवंगासुद्धा कपाटात ठेवू शकतो..
प्लासिंग, कापूर, नॅप्थलिन बॉल्स आणि निंबाचा पाला यांमुळे ओलाव्यापासून संरक्षण तर होईलच पण तुमच्या वॉर्डरोबमध्ये सुगंध दरवळत राहील.

काही उत्तम उपाय
= तुमचं लाकडी फर्निचर पुसायला ओलं फडकं अजिबात वापरू नका. तर त्यासाठी एक कोरडं आणि स्वच्छ कापड वापरा.
= धुळीपासून संरक्षण करा. धुळीमुळे ओलावा जिरण्यास मदत होते आणि काही काळानंतर फर्निचरमध्ये मऊपणा येतो.
= पावसाळ्यापूर्वी फर्निचरचे ऑइलिंग किंवा वॅक्सिंग करून घ्या, यामुळे ओलावा आत मुरण्यास मज्जाव होईल.
= जर घराचं रंगकाम करणार असाल तर पावसाळ्यापूर्वीच वॉटरप्रूफ पेंट वापरा.
= गच्चीत जमणार्‍या पाण्यामुळे भिंतींना ओल धरू नये म्हणूनही घर वॉटरपु्रफ असणं आवश्यक आहे.
= पावसाळ्यात कारपेट वापरणं शक्यतो टाळा. कारण वातावरण कुबट असल्यामुळे कारपेट खराब होण्याची शक्यता असते.
= घरात अर्थिंग नसेल तर सर्वात आधी ते काम करून घ्या. घरातील वायरिंग सतत तपासत राहा. बटण, प्लग, स्विच सर्वच तपासून पाहा. पावसाळ्यात शॉक लागण्याची जास्त शक्यता असते.
= पावसाळ्यात चामड्याच्या चपला खराब होतात.तसंच चप्पल स्टॅण्ड असल्यास त्यावर एक लहान कमी पॉवरचा बल्ब लावावा. जेणेकरून त्या उष्णतेमुळे चपलांमधील ओलावा शोषला जाऊ शकेल. ओल्या चपला वापरल्यामुळे पायांना त्रास होतो.