पावसाळ्यात ‘वॉशिंग मशीन’ची काळजी कशी घ्याल? (Ho...

पावसाळ्यात ‘वॉशिंग मशीन’ची काळजी कशी घ्याल? (How To Take Care Of Washing Machine In Rainy Season)

पावसाळा सुरू झाल्यामुळे आता हवेतील उष्मा कमी होऊन प्रत्येकाला खूप दिलासा मिळाला आहे, तसेच आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे; मात्र त्याचवेळी कपडे वारंवार भिजणे आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे ते लवकर न सुकणे याचाही त्रास होऊ लागला आहे. पावसाळ्यात आपले कपडे अनेक वेळा घाण होत असल्याने, ते धुण्याचा भारही वाढतो. सुमारे एक तृतीयांश शहरी भारतीय आज कपडे धुण्यासाठी ‘वॉशिंग मशीन’वर अवलंबून आहेत. वॉशिंग मशीन वर्षभर, आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, पावसाळ्यात नीट चालणे हे मशीन वापरणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे ठरते.  

वॉशिंग मशीनची देखभाल करण्यासाठी आणि कपडे अगदी उत्तम प्रकारे धुवून निघण्यासाठी गोदरेज अप्लायन्सेसच्या वॉशिंग मशीन्स विभागाच्या उत्पादन समूहप्रमुख राजिंदर कौल यांनी पुढीलप्रमाणे टिप्स दिल्या आहेत.

*वॉशिंग मशीनमध्ये योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरा : तुमच्या मशीनसाठी योग्य प्रकारचा आणि योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरत असल्याची खात्री करा. यासाठी मशीनबरोबर मिळालेली माहितीपुस्तिका वाचा. उदाहरणार्थ, टॉप लोड मशीनसाठीचे खास डिटर्जंट फ्रंट लोड मशीनमध्ये वापरणे योग्य नसते. त्याचप्रमाणे, कपड्यांचा लोड किती आहे, त्यानुसार तुम्ही डिटर्जंटचे प्रमाणदेखील तपासले पाहिजे. खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणात डिटर्जंट वापरू नये. हे प्रमाण किती असावे, याची माहिती तुमच्या मशीन मॅन्युअलमध्ये समाविष्ट असते.

*मशिन नीट स्वच्छ करा : डिटर्जंट किंवा जड पाण्यामुळे काहीवेळा मशीनवर पुटे चढतात, अनावश्यक थर निर्माण होतो. यामुळे कपडे धुण्याच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो आणि विशेषतः फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीनमध्ये दुर्गंधी येऊ लागते. वॉशिंग मशीनची खास क्लिनिंग पावडर वापरून डिटर्जंटचे डाग काढून टाकणे आवश्यक ठरते. मशीनमध्ये कपडे न घालता किंवा ‘टब क्लीन मोड’ वापरून मशीन अशा प्रकारे आतून स्वच्छ करता येते. ही प्रक्रिया दर महिन्याला करावी. थोडेसे पांढरे व्हिनेगर टाकून गरम पाण्याचा ‘एम्टी लोड’ लावणे हाही एक पर्याय आहे.  ही ‘एम्टी लोड’ची प्रक्रिया सुरू असताना मध्येच मशीनमध्ये थोडे डिटर्जंट टाकावे आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबावे. स्वच्छ टॉवेल वापरुन मशीनमधील ड्रम, दरवाजे आणि गास्केट पुसून घ्यावेत.

*कपडे धुण्याचे नियोजन करा : वॉशिंग मशीनचा पूर्ण क्षमतेने वापर तुम्ही करीत असाल, परंतु मशीनमध्ये कधीही क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुण्यास टाकू नका. मशीन ‘ओव्हरलोड’ करू नका. यातून तुमचे मशीन शक्य तितक्या कमी प्रमाणात ऊर्जा वापरू शकेल. तुम्हाला फक्त काही थोडकेच कपडे धुवायचे असतील, तर मशीनचा ‘इको-मोड’ (निवडक वॉशिंग मशीनमध्ये उपलब्ध असणारी सुविधा) वापरू शकता. या सुविधेमुळे वीज आणि पाणी यांची बचत होते.

* मशीनमधील कंट्रोल्सबाबत सावधगिरी बाळगावी: काही मशीन्समध्ये ओलावा प्रतिरोधक नियंत्रण असते; परंतु काही मशीन्समध्ये ही सोय नसते. म्हणून ओले कपडे नेहमी मशीनच्या कंट्रोल पॅनलपासून दूर ठेवावेत.

*अधिकृत सर्व्हिस सेंटरकडून नियमित सर्व्हिसिंग: अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संबंधित असलेल्या तंत्रज्ञांकडून वॉशिंग मशीनची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक असते.  मशीनमधील विविध भाग आणि घटक यांची स्वच्छता व देखभाल या गोष्टी आपण ग्राहक म्हणून करू शकत नसतो. त्यामुळे अशी देखभाल गरजेची आहे. मशीनमधील एखादा भाग झिजू लागल्यास त्याबाबत हा तंत्रज्ञ आपल्याला वेळीच खबरदार करील आणि त्याची दुरुस्तीही वेळेवर करेल. त्यातून मशीनमधील मोठा बिघाड टाळता येतो.

काळजीपूर्वक वापर आणि नियमित देखभालीमुळे आपली उपकरणे केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर पुढील अनेक वर्षे अधिक चांगली कामगिरी करतील.