नाहीतर मोडेल कणा… (How To Take Care Of Sp...

नाहीतर मोडेल कणा… (How To Take Care Of Spinal Cord)

पाठदुखीची समस्या सध्या अगदी सामान्य झाली आहे. मात्र वेळीच योग्य ती खबरदारी न घेतल्यास, ही समस्या घातक बनू शकते.

दललेली जीवनशैली, दगदग आणि मुख्य म्हणजे, उठण्या-बसण्याच्या चुकीची पद्धत या सर्वांचा थेट दुष्परिणाम आपल्या पाठीवर, कण्यावर होतो. म्हणूनच हल्ली वयाचीही मर्यादा न पाळता पाठदुखीची समस्या बहुधा सर्वांनाच भेडसावताना दिसते. ऑफिसमधील बैठं काम, तासन्तास एकाच ठिकाणी बसून टी.व्ही. पाहणं, मोबाईल हाताळणं या आणि अशा आपल्या अनेक वाईट सवयी यास कारणीभूत ठरतात. ‘क्यू.आय. स्पाइन क्लिनिक’च्या वरिष्ठ स्पाइन तज्ज्ञ डॉ. गरिमा आनंदानी यांच्या मते, पोट आणि श्रोणी भागातील स्नायू (कोअर मसल्स) बळकट असले की, पाठ बळकट राहते आणि पाठदुखीला प्रतिबंध होतो. किंबहुना, पाठीच्या कण्याचं पुनर्वसन आणि कोअर स्नायूंच्या नियमित व्यायामामुळे पाठीच्या खालच्या भागातील वेदना शमवणंही शक्य होतं. पाठीचा कणा तणावमुक्त आणि परिणामी वेदनामुक्त राहण्यासाठी दैनंदिन जीवनात काही नियम पाळणं गरजेचं आहे.

उभे राहा : दर तासाभराने उभे राहा, जेणेकरून शारीरिक स्थितीत बदल होईल. स्नायूंवर ताण येऊ नये, यासाठी ते स्ट्रेचिंग करा, स्नायूंना पीळ द्या, ते वळवा.

योग्य पद्धतीने वाका : वाकताना नेहमी आधी गुडघे वाकवा. कधीही थेट पाठ वाकवू नका. थेट पाठीतून वाकल्यास किंवा पोक काढल्यास, पाठीच्या स्नायूंवर आणि मणक्यावर ताण येतो.

पोक काढून बसू नका : ताठ आणि खुर्चीच्या पाठीला पाठ लावून बसा. खुर्ची टेबलाजवळ असू द्या. पाठीला आधार देण्यासाठी लंबर रोलचा वापर करता येईल.

खुर्चीत योग्य प्रकारे बसा : खुर्चीत बसताना नितंब अगदी मागच्या बाजूला असावेत. पाय सपाट, जमिनीला पूर्ण टेकलेले असावेत. हातांना आर्मरेस्टचा आधार असावा. पाठही बॅकरेस्टला टेकलेली असावी.

उपकरणं नजरेच्या पातळीवर ठेवा : लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा सर्वांत वरचा भाग तुमच्या नजरेच्या 90 अंशांच्या कोनात असावा आणि माऊस कोपराच्या 90 अंशांच्या कोनात असावा. लॅपटॉपची उंची वाढवण्यासाठी लॅपटॉप स्टँड वापरता येईल. मोबाईल फोन वापरतानाही मान खाली वाकवण्याऐवजी नजर खाली करून मोबाईल पाहा. असं केल्यास फोन अधिक काळ वापरला तर मानेच्या स्नायूंवर अधिक ताण येणार नाही.

वजन उचलताना काळजी घ्या : पूर्णपणे खाली न बसता, बैठका मारताना खाली वाकतात तेवढं वाका, वस्तू शरीराजवळ उचलून घ्या आणि मग ती पूर्ण उचला. पोक काढून उचलू नका, कारण त्यामुळे पाठीच्या मणक्यांवर ताण येतो.

चालत राहा : फोनवर बोलताना उभे राहा किंवा चालत बोला. गप्पाही चालत चालत मारल्यास उत्तम. सहकार्‍यांना फोन करण्यापेक्षा त्यांच्याजवळ जाऊन निरोप द्या. पाठदुखी सहा आठवड्यांहून अधिक काळ राहणं, हातापायांपर्यंत वेदना पोहोचणं, पाच मिनिटांहून अधिक काळ चालणं किंवा उभं राहणं कठीण होणं, आतड्यांवरील नियंत्रण गमावणं इत्यादी लक्षणं आढळल्यास त्वरित स्पाइन तज्ज्ञाची भेट घ्या

स्ट्रेचिंग अत्यंत महत्त्वाचं आहे : सोप्या प्रकारे स्ट्रेचिंग करा. हात पाठीच्या खालच्या भागावर ठेवून मागील बाजूस वाका. वेदना होत असतील, तर मात्र वैद्यकीय निरीक्षणाशिवाय घरच्या घरी व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.