संवेदनशील त्वचेच्या संवर्धनासाठी… (How To...

संवेदनशील त्वचेच्या संवर्धनासाठी… (How To Take Care Of Sensitive Skin In Monsoon?)

त्वचा ही शरीरांतर्गत असणार्‍या अवयवांसाठीचं संरक्षक कवच आहे. तरीही ती अति संवेदनशील आहे. प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेस इजा होते; परंतु उन्हाळ्यात त्वचेचं जे नुकसान होतं त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याच्या खुणा कायमस्वरूपी राहतात. तेव्हा त्वचेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
तसं पाहिलं तर प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेला इजा होतच असते. पण उन्हाळ्यात त्वचा बर्‍यापैकी काळवंडते आणि उष्ण वातावरणामुळे त्वचेला हानीही पोहोचते. त्वचेलगत असणार्‍या छिद्रांवर सूर्याची तीव्र किरणं पडल्याने त्यांचं नुकसान होतं आणि या सर्वांचा परिणाम त्वचा निस्तेज आणि आजारी पडण्यात होतोे. म्हणूनच उन्हाळ्यात त्वचा संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. उन्हाळ्यात त्वचेला होणार्‍या नुकसानाचे प्रकार आणि त्यावरील उपाय जाणून घेऊ-

त्वचा शुष्क होणं


त्वचा हा शरीरांंतर्गत आणि शरीरबाह्य असा अवयव आहे. शरीरातील हाडं आणि मांसपेशी यांना आच्छादणारा हा अवयव असल्याने हवा-पाणी आणि वातावरण यांच्या संपर्कात तो येत असतो. त्यामुळे त्वचा सातत्याने दूषित होत असते. उन्हाळ्यात हवेत असणार्‍या उष्णतेमुळे त्वचेलगतचं पाणी कमी होतं. त्वचेला दैनंदिन कार्यासाठी आर्द्रतेची गरज असते. उष्णतेमुळे ही आर्द्रता निघून जाते आणि त्वचा शुष्क होते. शुष्क त्वचेमुळे तिच्या आतील आवरणाला प्रत्यक्ष इजा होते आणि त्यातून अति पातळ थर सदृश पापुद्रे सुटू लागतात. काही तज्ज्ञ याला त्वचेलगतचा कोंडा असं म्हणतात. तर या शुष्कतेमुळे त्वचा आपले थर सोडते आणि उष्णतेमुळे पुन्हा नवीन थर न आल्याने त्वचेचा पोत पूर्णतः बिघडतो. त्वचा शुष्क होऊ नये यासाठी, मॉइश्‍चरायजर्सचा वापर करणं गरजेचं असतं. बाजारात उपलब्ध असणार्‍या कोणत्याही मॉइश्‍चरायजरच्या नियमित वापराने त्वचेचा शुष्कपणा घालवता येतो.

 • मॉइश्‍चरायजर नैसर्गिक पदार्थांचा वापर केलेलं किंवा कमी केमिकलयुक्त आणि ज्यांचा पीएच सामान्य पातळीपर्यंत असेल, असं वापरावं.
 • मॉइश्‍चरायजर्स नेहमी केमिस्टकडूनच घ्यावेत आणि सोबत पावती घ्यावी. हल्ली ग्रे मार्केट आणि बोगस प्रॉडक्टचा बाजार फोफावला आहे. त्यातून उत्तम दर्जाचं उत्पादन शोधणं अवघड जातं. त्यामुळे एक्सपायरी आणि पॅकेजिंग डेट पाहूनच मॉइश्‍चरायजर घ्यावं.
 • मॉइश्‍चरायजर नेहमी स्वच्छ त्वचेवर लावावं.
 • मॉइश्‍चरायजर लावल्यावर तीव्र उन्हात जाऊ नये.
 • मॉइश्‍चरायजर लावल्यावर घाम येत असल्यास, तो स्वच्छ रुमालाने टिपावा.
 • मॉइश्‍चरायजर आणि सनस्क्रिन लोशन यांचे अंगीभूत घटक व कार्य यांच्यात मोठी भिन्नता असल्याने ते एकत्र येतील, असे लावू नये.
 • उन्हात त्वचा शुष्क होऊ नये, यासाठी केवळ मॉइश्‍चरायजरचा योग्य पद्धतीने वापर करावा. अन्य कोणतेही सौंदर्य उपाय करू नये.
 • त्वचा काळवंडणं
 • उन्हाळ्यात कपड्यांनी त्वचा कितीही आच्छादली तरी तिचा उन्हाशी संपर्क येतोच. दुपारच्या उन्हात फिरल्याने त्वचेला काळसर रंग येतो. कारण उष्णतेमुळे त्वचा भाजली जाते. कायम वातावरणाच्या संपर्कात येणारा त्वचेचा वरचा थर उन्हाच्या किरणांनी जळतो. उन्हाळ्यात सकाळी दहा-अकरा वाजताच सूर्याचा प्रकाश तीव्र होण्यास सुरुवात होते, ते अगदी संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत. या दरम्यान प्रत्यक्ष सूर्यकिरणांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींची त्वचा काळवंडते. यावर वेळीच उपचार न केल्यास त्वचा कायमस्वरूपी गडद होते. सूर्यप्रकाश प्रत्यक्ष त्वचेवर येऊ नये, म्हणून सनस्क्रिन लावून त्वचा आच्छादून घेणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी सनस्क्रीन लोशन योग्य पद्धतीनं वापरणं महत्त्वाचं ठरतं.
 • सनस्क्रीन लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करून, कोरडी करा. त्यावर लोशन लावून हलकासा मसाज करावा आणि ते पूर्णतः सुकू द्या. लोशन वाळल्यावर त्याद्वारे घाम येत नाही ना, याची खात्री करूनच बाहेर जा. बाहेरून आल्यावरही त्वचा संपूर्णतः स्वच्छ करा.
 • ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी लिक्वीड बेस लोशन वापरावं, तर शुष्क त्वचा असणार्‍यांनी क्रीम बेस लोशनचा वापर करावा.
  त्वचा काळवंडल्यास, ती सुधारण्यासाठी केवळ सनस्क्रीन लोशनवर विसंबून चालणार नाही. त्यासाठी खालील उपचारही नियमितपणे करायला हवेत.
 • त्वचेवर गुलाबपाणीयुक्त रुमाल पाच मिनिटांसाठी ठेवा.
 • 3 चमचे गरम पाणी आणि 1 चमचा टाल्कम पावडर एकत्र करून 5 मिनिटे चेहर्‍यास लावून ठेवा. नंतर स्वच्छ धुवा.
 • औषधाच्या दुकानातून चंदन-वाळा यांच्या पावडरी आणा. त्या एकत्र करून स्नान करतेवेळी उटण्यासारख्या चोळा.
 • चंदन पूड आणि दही सम प्रमाणात घेऊन एकत्र फेटून लावा.
 • वाळा पूड आणि ताक सम प्रमाणात एकत्र कालवून लावा.
 • लिंबू-हळद सम प्रमाणात एकत्र करून केवळ नऊ मिनिटं लावा.
 • काकडी आणि गाजराचा रस एकत्र करून त्वचेवर लावा.
 • आंब्याचा गर आणि दही एकत्र करून लावा.
 • झेंडूची फुलं पाण्यात उकळवा. ते पाणी स्नानास घ्या.
  लक्षात ठेवा
 • उन्हाळ्यात ब्लिच करू नका.
 • फेशियल-ब्लिच एकत्र
  करू नका.
 • त्वचा स्वच्छ केल्यास 24 तास उन्हात जाऊ नका.
 • त्वचेला क्रीम मसाज करू नका.
 • त्वचेलगत आच्छादन देणारा रुमाल स्वच्छ असावा.
  त्वचेवर पुरळ येणं
  उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेवर पुरळ, अर्थात घामोळंही येतात. हे तात्पुरतं असतं. बाह्य त्वचेस शरीरांतर्गत उष्णता सहन होत नाही आणि त्यावर पुरळ येण्यास सुरुवात होते. हे कायमस्वरूपी नसलं, तरीही वेदनादायक असतं. घामोळ्यावर उपाय म्हणून बाजारात अनेक पावडरी उपलब्ध आहेत. त्यातही अँटी फंगल पावडरच त्वचेसाठी निवडा. घामोळं येऊ नये आणि आल्यावर करण्याचे उपाय-
  कोकम, आवळा, लिंबू सरबत योग्य प्रमाणात प्या.
 • कलिंगड, टरबूज, द्राक्ष नियमित आहारात घ्या.
 • आंबा प्रत्यक्ष आहारात घेण्यापेक्षा दूध, तूप, लोणी समवेत घ्या.
 • सब्जा-तुळशीचं बी रात्री झोपताना घ्या.
 • वाळा पावडर ताकात कालवून त्वचेवर लावा.
 • चंदनासव लेप स्वरूपात त्वचेवर लावा.
 • गुलाब पूड व केवडा जल एकत्र करून त्वचेवर लावा.
 • झेंडूची फुलं दह्यात वाटून त्वचेवर लावा.
 • जास्वंदाची फुलं गरम पाण्यात झाकून ठेवा. या पाण्याने त्वचा टिपा.
 • तुळशीच्या पानांचा रस पाण्यातून त्वचेवर लावा.
 • घामोळं आल्यावर ते खाजवू नका. यातून फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
 • सुती कपडे वापरा. तसंच कपडे इस्त्री करून घाला. इस्त्रीचे कपडे वापरल्याने घामोळं निघून जाण्यास मदत होते.
 • घामोळं लालसर झाल्यास किंवा त्वचेवर चट्टे उमटल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
  त्वचेला खाज येणं
  उन्हाळ्यात त्वचेमधील आर्द्रता कमी होऊन त्वचा शुष्क होते. या शुष्क त्वचेवर पातळ पापुद्रा तयार होतो. काहींना तो दिसतो, तर काहींना दिसत नाही. त्यामुळे त्वचेला खाज सुटते. खास करून हात, पाय, मान, मांड्या यांच्या दुमडण्याच्या स्थितीत खाज येते. ही खाज काही वेळेस तीव्र असते. तर कधी टोचल्यासारखी असते. त्वचा सातत्याने खाजवल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. त्वचेला खाज येऊ नये यासाठी-
 • वाळायुक्त पाण्याने स्नान करा.
 • स्नान जलात केवड्याचं पान घालून ठेवा.
 • केशरयुक्त जल सातत्याने आहारात घ्या.
 • खाज येणं हे अ‍ॅलर्जी प्रकारात येत असल्याने त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. फंगल इन्फेक्शनमध्ये त्वचेवर लालसर गोल डाग पडतात. हे हाताचे आतील कोपरे, मान आणि पाठ यावरच असतात. यावर उपायासाठी डॉक्टर बाजारात उपलब्ध लिक्वीड लावण्याचा सल्ला देतात. परंतु, ती पाण्यात कालवून लावायची असतात, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं अन्यथा त्वचा जळू शकते.
  त्वचेवर उष्णता येणं
  याला वैद्यकीय भाषेत अ‍ॅबसेस किंवा बॉइल्स, तर आयुर्वेदीय तज्ज्ञांच्या भाषेत गळू म्हटलं जातं. हा अत्यंत त्रासदायक त्वचा विकार आहे. एकतर ते खूप वेदनादायी असतं, शिवाय लवकर जात नाही. अन् गेल्यानंतरही त्वचेवर कायमस्वरूपी व्रण ठेवून जातं. मधुमेही व्यक्तींना गळू झाल्यास अधिक त्रास होतो. म्हणूनच गळू होणार नाही, यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे.
  गळू उन्हाळ्यातच होतात, हा गैरसमज आहे. गळू कोणत्याही ऋतूमध्ये उद्भवतात. शरीरातील उष्णता व साखर प्रमाणाबाहेर गेल्यास गळू होतात. अति मात्रेत तेलकट, तिखट खाल्ल्यानेही हा त्रास होतो. तेव्हा सर्वप्रथम आहार योग्य ठेवावा लागतो. गळू येऊ नये म्हणून-
 • आहारात काकडी, टोमॅटो नियमित घ्या.
 • तुळशीची बी किंवा सब्जा किमान 4 चमचे घ्या.
 • चिकन, मटण, अंडी याचं
  सेवन कमी करून, आहारातील मास्यांचं प्रमाण वाढवा.
 • कडधान्यं अत्यल्प प्रमाणात खा.
 • रात्री दही खाऊ नका.
 • तीळ, मोहरी यांचं सेवन अत्यल्प करा.
 • सुपारी (उष्ण) खाणं टाळा.
 • चंदन लेप त्वचेवर लावा.
 • काकडीचा रस त्वचेवर लावा.
 • गुलाबाच्या पाकळ्या दह्यात वाटून त्वचेवर लावा.
 • केवडा पाणी त्वचेवर शिंपडा.
 • मुलतानी माती व रक्तचंदन गुलाब पाण्यात
  कालवून लावा.
 • रोझमेरी किंवा
  ट्री टी अरोमा
  ऑईल साध्या पाण्यातून लावा.
 • उष्णतेचा गळू जर मोठ्या मात्रेत आला, तर तातडीने वैद्यकीय मदत घ्या. तसंच तो घरगुती उपायांनी फोडण्याचा प्रयत्न करू नका.
 • उन्हाळ्यात सर्वांनीच दोन वेळा स्नान आणि कडक उन्हात वाळवलेले कपडे घालायला हवेत.
 • स्वप्निल वाडेकर
  (सौंदर्य, आरोग्य व आहार तज्ज्ञ)