तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी? (How To Take Ca...

तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी? (How To Take Care Of Oily Skin?)

मी सत्तावीस वर्षांची आहे. माझी त्वचा तेलकट आहे. त्यामुळे मला पिंपल्स येतातच, पण साधा मेकअप देखी माझ्या त्वचेवर टिकत नाही. कृपया, मी माझ्या तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करावे.
– श्रद्धा, पनवेल
श्रद्धा तुमची त्वचा जर तेलकट असेल तर दिवसातून चार वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामध्ये दोनदा फक्त ऑईल फ्री फेसवॉश वापरा. तुमच्या आहारात तेलकट पदार्थांचा वापर शक्यतो कमी करा.  त्याऐवजी फळांचा आहार वाढवा. लिंबू, मोसंबी, संत्री म्हणजे क जीवनसत्त्व आपली तेलकट त्वचा नियंत्रणात आणण्याचे काम करू शकते. घरगुती उपाय म्हणून एक चमचा दह्यामध्ये प्रत्येकी 1 चमचा मुलतानी माती आणि पुदीना पावडर अर्धा तास भिजवून ठेवा. तो लेप चेहर्‍याला 15 मिनिटं लावून ठेवा. जेव्हा चेहर्‍यावरील लेप सुकेल, तेव्हा कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा. फरक जाणवेल. तुम्ही मेकअप करून बाहेर जात असल्यास जीलेटीन टिशू पेपर जवळ ठेवा व गरज पडल्यास त्वचेवरील ऑइली भाग त्याने टिपून घ्या. म्हणजे तुमचा मेकअप चांगला राहिल

Oily Skin, skin care

माझी मुलगी 18 वर्षांची आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे व सतत मोबाईल वापरामुळे तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली आहेत. कृपया यासाठी मला मार्गदर्शन करा.
– शालिनी, औरंगाबाद
आधुनिक जीवनात संगणक, मोबाईल हा आपल्या दिनचर्येचा भाग झाला आहे. त्याचबरोबर ताणतणाव, टेन्शन आहेच. योग्य आहार वेळेवर न घेतल्यामुळे ही समस्या उद्भवते. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामद्ये बदल करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप. रात्री झोपतेवेळी खोबरेल तेल डोळ्याखालील वर्तुळाकार लावून थोडा वेळ मसाज करावा व घरगुती उपाय म्हणून लिंबाच्या ताज्या रसामध्ये कापसाचा बोळा बुडवून दहा मिनिटे डोळ्यावर ठेवावा. ही क्रिया दररोज करावी. म्हणजे बर्‍यापैकी फरक पडलेला जाणवेल.

मी 35 वर्षांची आहे. माझे हात दिवसेंदिवस काळे व रुक्ष पडत चालले आहेत. माझ्या ह्या काळपट हातामुळे मी फुळ स्लीव्हज् घालणे पसंत करते. कृपया मला या समस्येपासून काही उपाय सुचवा.
– निला, काळाचौकी
निला जर तुमचे फक्त हातच काळे पडत असतील व बाकीच्या त्वचेचा रंग तसाच असेल तर तुम्ही जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्या. घराबाहेर पडते वेळी सनस्क्रिन लोशन हाताला व चेहर्‍याला लावणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे घरगुती उपाय म्हणून जसे आपण चेहर्‍याला फेशिअल करून तजेलदार करतो त्याप्रमाणे आठवड्यातून एकदा हाताला क्लिनिंग, स्क्रब, क्रिम लावावे. त्यामुळे हातावरची डेड स्किन निघून जाण्यास मदत होते व हात गोरे दिसण्यास मदत होते. त्यावर पॅक म्हणून हातांना लाल मसुर डाळ बारीक वाटून त्यात लिंबू पिळून लावावे. लगेचच फरक जाणवेल.