त्वचा कोरडी व निस्तेज झाली आहे… (How To T...

त्वचा कोरडी व निस्तेज झाली आहे… (How To Take Care Of Dry And Pale Skin?)

मी 32 वर्षांची आहे. माझ्या संपूर्ण शरीरावरील त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज झाली आहे. काय करू काही कळत नाही. कृपया मला मार्गदर्शन करा. माझ्या सर्वांगाची त्वचा मृदू आणि सतेज होण्यासाठी काय उपाय करू, ते सुचवा.

  • रेखा, धुळे
    रेखा, यात घाबरण्यासारखं काहीही नाही. तुम्ही पाणी कमी प्रमाणात पीत असाल, असं मला वाटतं. त्यामुळे तुमची त्वचा डिहायड्रेट झाली आहे. त्वचा पुन्हा हायड्रेट करण्यासाठी अगदी सोपे उपाय करता येतील. दररोज सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी हळूहळू, अर्थात एक-एक घोट प्या. तसंच दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी अवश्य प्या. यामुळे त्वचा हायड्रेट होईल, मृदू होईल. यासोबत कच्ची हळद, पिवळी मोहरी आणि सालविरहित उडीद डाळ समप्रमाणात घेऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. या मिश्रणात थोडं मोहरीचं तेल मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण उटण्याप्रमाणे सकाळी अंघोळ करण्यापूर्वी सर्वांगावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. साधारण 15 मिनिटांनंतर अंघोळ करा. हे उटणं त्वचेसाठी उत्तम टॉनिक आहे. हा प्रयोग नियमितपणे केल्यास त्वचा सुंदर, डागविरहित, नितळ, सतेज आणि मुलायम होते.

माझी मैत्रीण कला, ब्युटिशियनचा कोर्स करते आहे. कोर्समध्ये शिकवण्यात येणार्‍या विविध ट्रिटमेंटचा सराव ती माझ्यावर करत असते. अशातच तिने काही दिवसांपूर्वी माझं वॅक्सिंग केलं. वॅक्सिंग करताना मला खूप दुखलं. शिवाय त्यानंतर माझ्या केसांची इनग्रोथही वाढली आहे. नक्की काय झालं असेल? केसांची ही इनग्रोथ कमी करण्यासाठी मी काय करू?

  • वैशाली, सोलापूर
    वैशाली, तुझी मैत्रीण अजून शिकते आहे, सराव करते आहे. त्यामुळे तिच्या कामात योग्य सफाई नसावी. वॅक्सिंग करताना तुला दुखलं, कारण ती त्या वेळी तुझी त्वचा खेचून धरत नसेल. वॅक्स आणि त्यावर रिमुव्हिंग स्ट्रिप लावल्यानंतर, ती स्ट्रिप ओढताना कलाला तुझी त्वचा खेचून, घट्ट धरायला सांग. यामुळे केस सहज निघतील, दुखणार नाही. तसंच इनग्रोथ जाण्यासाठी वॅक्सिंग करून झाल्यानंतर ती त्वचा स्वच्छ धुऊन, तिथे पाच मिनिटं वाफ द्यायला सांग. नंतर त्वचा स्वच्छ मुलायम कापडाने पुसून, त्यावर मॉइश्‍चरायजर लाव. यासोबत दररोज अंघोळी केल्यानंतर लगेच त्वचेवर मॉइश्‍चरायजर लाव, म्हणजे इनग्रोथची समस्या दूर होईल.