कुरळ्या केसांची घ्या विशेष काळजी (How To Take C...

कुरळ्या केसांची घ्या विशेष काळजी (How To Take Care Of Curly Hairs?)

कुरळे केस सांभाळणं कठीण असलं, तरी थोडी काळजी घेतल्यास, हे कामही सोपं होऊ शकतं आणि केसांचं सौंदर्य सहजच खुलू शकतं.
कितीही चापून-चोपून विंचरले, तरी कुरळे केस विस्कटल्यासारखेच दिसतात… कुरळ्या केसांच्या धनींची नेहमीच ही तक्रार असते. असं असलं तरी, हे विस्कटलेले कुरळे केसही अतिशय सुंदर दिसतात, हेही तेवढंच खरं. मात्र यासाठी एक अट असते. ती म्हणजे, हे कुरळे केस मुलायम आणि आरोग्यदायी असायला हवेत. मग असे केस विंचरले नाहीत, तरी छान दिसतात. म्हणूनच कुरळ्या केसांचं आरोग्य जपणं आणि ते मुलायम राहतील याची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. आणि हे काम वाटतं तेवढं कठीणही नाही. केस धुताना, सुकवताना, विंचरताना थोडं दक्ष राहिलं म्हणजे झालं. त्यासाठी या काही टिप्स-
– केस कुरळे आणि रूक्षही असतील, तर आठवड्यातून दोनपेक्षा अधिक वेळा शाम्पू करू नका. नाही तर केस अधिकच रूक्ष आणि निर्जीव होतील.
– केसांतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी शाम्पू केल्यानंतर कंडिशनर अवश्य लावा.

– खास करून कुरळ्या केसांसाठी तयार केलेल्या शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करा.
– बारीक दातांच्या कंगव्याचा किंवा ब्रशचा वापर मुळीच करू नका. कुरळ्या केसांसाठी जाड दातांच्या कंगव्याचाच पर्याय उत्तम आहे.
– कुरळे केस निसर्गतःच छान सेट होतात. अशा केसांवर स्टायलिंग उत्पादनांचा भडिमार करू नका.
– ओल्या केसांवर टॉवेल घासण्यापेक्षा, टॉवेल केसांवर दाबून पाणी टिपून घ्या. केस नैसर्गिक पद्धतीने सुकवण्यावर भर द्या.
– केसांची लांबी योग्य राखण्यासाठी दर तीन महिन्यांनी केस ट्रिम करा.
– कुरळ्या केसांचा पटकन गुंता होतो. हा गुंता बोटांनी किंवा जाड दातांच्या कंगव्याने सोडवा. चुकूनही ब्रशचा वापर करू नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक असते.
– केस तुटू नयेत यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी केसांवर सिल्क किंवा सॅटिनचा स्कार्फ बांधा.
– कधीही केसांची घट्ट वेणी बांधून झोपू नका. कारण केस खेचले गेल्यास तुटण्याची शक्यता वाढते.