लहान मुलांमधील तणावाला देऊ नका वाव (How To Tack...

लहान मुलांमधील तणावाला देऊ नका वाव (How To Tackle Your Children Under Stress?)

आई-वडिलांच्या जीवनात त्यांच्या पाल्याचे महत्त्व किती असते हे सांगण्याची गरज नाही. आई-वडील आपल्या मुलांच्या हिताचा विचार करून त्यांना शाळेत पाठवतात. मुलं चालायला, बोलायला लागली की त्यांचं जग फक्त कुटुंबातील सदस्यांपुरतं मर्यादित न राहता त्यांचा बाहेरील जगाशी संपर्क येण्याकरिता प्री-स्कूल वा अंगणवाडी हा उत्तम पर्याय असतो. जन्मल्यापासून तुम्ही तुमच्या मुलांना अगदी लाडाकोडात वाढवता आणि जेव्हा त्यांना प्री-स्कूलमध्ये पाठवता, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत नसता. हा त्यांच्या जीवनातील मोठा बदल असतो. हा बदल त्यांच्या अंगवळणी पडेपर्यंत पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशावेळी मुलं बावरलेली असतात, अन् दुसरीकडे स्वतःचीच काळजी त्यांना वाटत असते.
हल्ली आई-बाबा आणि एकुलतं एक मूल असं त्रिकोणी कुटुंब दिसतं. त्यामुळे पालकांचं आपल्या त्या एकुलत्या एक पाल्याच्या संगोपनावर लक्ष केंद्रित झालेलं असतं. मुलाने हट्ट करावा आणि पालकांनी तो पूर्ण करावा अशी परिस्थिती असते. हेच शाळा सुरू झाल्यानंतर मुलांच्या जीवनात शिस्त आणि नियम लागू होतात. प्री-स्कूल मधून मुलं मोठ्या शाळेत जातात, तेथे त्यांना स्वतःलाच वास्तविक जगाचा सामना करावा लागतो. अशा वेळी प्रत्येक मुलाला या गोष्टीचा ताण येईलच असे नाही. हे मुलाचं व्यक्तिमत्त्व आणि त्याला मिळत असलेलं वातावरण यावर अवलंबून असतं. दरम्यान मुलांना अनेक आव्हांनाना सामोरं जावं लागतं.

आई-वडिलांपासून दूर जाण्याची भिती
नव्याने शाळेत जाणार्‍या लहान मुलांना असं वाटत असतं की आपली आई आपल्याला इथे शाळेत ठेवून निघून जाणार आणि परत येणार नाही. त्यामुळे त्यांना शाळेत जाण्याचीच भिती वाटते आणि ते चिंतीत होतात. अनेकदा मुलांना उलटी, पोटदुखी होण्याचा त्रास संभवतो. यामागचं कारण एकच असतं की त्यांना शाळेत जायचं नसतं. व्यक्तिगत सांगायचं तर, कित्येकदा मुलांना इतर मुलांसोबत जमवून घेणं अवघड जातं. या मुलांचा स्वभाव लाजाळू असतो, अशा मुलांना इतर मुलं चिडवतात.

शिक्षक ओरडतील अशी भिती
काही मुलं शिक्षकांना घाबरतात. शिक्षक कडक शिस्तीचे असल्यामुळे ते आपल्याला ओरडतील, अशी भिती मुलांना वाटत असते. मुलांमध्ये चिंता आणि तणावाची लक्षणं ही बहुत करून शारीरिक तसेच व्यावहारिक बदलाच्या रूपात दिसून येतात. मुलांच्या प्रतिक्रिया त्यांचं वय, त्यांची वर्तणूक, कौशल्यं आदीनुसार वेगवेगळी असू शकते. कधी कधी पालकही मुलांची ही वर्तणूक समजू शकत नाहीत आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. पालकांनी आपलं मूल तणावात आहे, हे समजून घेऊन त्यामागची कारणं शोधून काढली पाहिजेत.

मुलांमधील तणाव व चिंतेची लक्षणं
एकाग्रता नसणे, वर्तणुकीमध्ये अचानक बदल उदा. मुलांचा आक्रस्ताळेपणा, राग येणे, चिडचिडेपणा, भीती इत्यादी. तसेच अशा सवयी की ज्यामधून मुलांच्या मनातील चिंता दिसून येईल – जसे, सतत नखं कुरतडणं, कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रांपासून दूर राहणं, शाळेत जाण्यास नकार देणं, शाळेत कंटाळणं, नको त्या गोष्टी साठवून ठेवणं, त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल होणं, यात काही मुलं प्रमाणापेक्षा जास्त खाऊ लागतात तर काही जणांना भूकच लागत नाही, पोटदुखी डोकेदुखीची तक्रार करणं, अंथरूण ओलं करणं, झोपेच्या समस्या, वाईट स्वप्न पडणं, इतर शारीरिक समस्या ही लक्षणं मुलामंध्ये दिसून येत असतील तर आपलं मूल तणावग्रस्त तर नाही ना? हे पालकांनी जाणून घेतलं पाहिजे.

पालकांनी काय करावे?
पालकांनी स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्याव्यात. जसे – व्यायाम आणि तणाव दूर करण्याच्या पद्धती. मुलं नेहमी आपल्या पालकांचं अनुकरण करत असतात.
मुलांना भरपूर प्रेम आणि प्रोत्साहन द्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. स्वतःला शिस्त लावा आणि आत्मविश्वास वाढवा. आपल्या मुलांचं म्हणणं ऐका. त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या समस्येतून बाहेर पडण्यास मदत करा. मुलांच्या वर्तणुकीतील कोणत्याही बदलाकडे दुर्लक्ष करू नका. एवढे करूनही मुलांमध्ये तणावाची लक्षणं दिसत असतील तर डॉक्टर वा काऊन्सिलर यांची
मदत घ्या.