किशोरवयात उद्भवू शकणारे धोके वेळीच टाळा (How To...

किशोरवयात उद्भवू शकणारे धोके वेळीच टाळा (How To Tackle With Teenager’s Problems)

गेल्या काही वर्षांमध्ये टीनएज अवस्थेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूपच बदलला आहे. फुलण्याच्या, झुलण्याच्या वयाच्या या आनंदी टप्प्यामध्ये त्यांना काही गोष्टींची जाणीव करून दिल्यास पुढे उद्भवू शकणारे धोके टाळता येतील.
टीनएजर अर्थात पौगंडावस्था ही समाजाच्या रचनेचा एक अविभाज्य भाग आहे. फार पूर्वी असं समजलं जायचं की, माणसं बालपणातून थेट प्रौढत्वाकडे प्रवेश करतात. टीनएज वगैरे काही नसतं. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र टीनएज अवस्थेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूपच बदलला आहे. वयाच्या या टप्प्यात तरुणांच्या शरीरात आमूलाग्र बदल घडत असतात. हे बदल घडणं जितकं नैसर्गिक असतं तेवढंच या वयात त्यांच्या हातून काही चुका होण्याची शक्यताही आपण नाकारू शकत नाही. फुलण्याच्या, झुलण्याच्या या आनंदी टप्प्यामध्ये त्यांना धाकात ठेवून आपल्या मर्जीप्रमाणे वागण्यास सक्ती केली तर चालणार नाही, उलट काही गोष्टी जर त्यांना समजावून सांगता आल्या तर पुढे संभवू शकणारे धोके वेळीच टाळता येतील.
पौगंडावस्थेत पोहोचताच मुली अचानक त्यांच्या दिसण्याबद्दल आणि त्यांच्या शरीराबद्दल अधिक चिंतित होतात. त्यांचे लक्ष बहुतेकदा त्या कशा दिसतात यावर असते. या वयात मुलींना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या असू शकतात. म्हणूनच, या मुलींना त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी वेळीच शिकवल्या पाहिजेत. पौगंडावस्थेत मुलींच्या आरोग्याशी संबंधित काही विषयांबद्दलची योग्य माहिती प्रत्येक मुलीला असायलाच हवी.


स्थूलता
पौगंडावस्थेत वजन वाढणे किंवा किशोरवयातील गरोदरपणा ही आज मोठी समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सध्या 12.7 दशलक्ष किशोरवयीन स्थूलतेमुळे त्रस्त आहेत. यात 15 टक्के मुलींचा सहभाग आहे. महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी आणि पीसीओएस सारख्या समस्यांच्या मुळाशी स्थूलता हे एक कारण आहे. त्यामुळे, त्यांना त्यांचा आहार आणि शारीरिक हालचालींकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित करा जेणेकरून त्या लठ्ठपणाशी संबंधित या गंभीर आरोग्य समस्या टाळू शकतील. लठ्ठपणा हे किशोरावस्थेतील मुला-मुलींसाठी एक भयानक स्वप्नंच असतं. या वयात तुम्ही लठ्ठ असाल किंवा झपाट्याने वजन वाढण्याची शक्यता असेल तर किशोरवयातच ही समस्या सोडवणं आवश्यक आहे.

आहारावर नियंत्रण
साधारण वयाच्या या टप्प्यात मित्र-मैत्रीणींसोबत फिरायला जाणं, वाढदिवसांना जाणं होतं. मग बाहेरून खायला मागवायचं, जिभेचे चोचले पुरवायचे, हे होतंच. परंतु यामुळे वजनाचा काटा डळमळतो. किशोरवयात जर आहारावर नियंत्रण ठेवलं नाही तर लवकरच वजन वाढायला लागतं अन् ते कमी करणं खूप अवघड असतं. इतकं मोठं वजन अंगावर घेऊन वावरणं फार त्रासाचंही आहे.

अल्कोहोल वा इतर नशील्या पदार्थांचे सेवन
धूम्रपान, अल्कोहोल किंवा ड्रग्सशी संबंधित विविध सर्वेक्षण आणि अभ्यासांती किशोरवयीन मुलांच्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मते या वयात मुलं, अनेकदा त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून किंवा मोठ्यांचे अनुकरण करून सिगारेट, दारू किंवा ड्रग्जचे सेवन करू लागतात. अशा परिस्थितीत घरातील आई-वडील व वडीलधार्‍यांनी मुलांशी बोलले पाहिजे. त्यांनी मुलांना/मुलींना नशील्या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणार्‍या दुष्परिणामांची जाणीव करुन देणे आवश्यक आहे.

डेटिंगचे धोके


पौगंडावस्था वा किशोरवय म्हणजे जीवनातला एक अतिशय थरारक टप्पा असे म्हणावयास हरकत नाही. या वयात मुला-मुलींच्या शरीरात नवीन बदल घडून येतात, मनामध्ये नवीन भावना उचंबळून येतात, विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत मुला-मुलींना एकमेकांना भेटावे, एकमेकांशी बोलावे असे वाटू लागते. यातूनच डेटिंगची सवय लागते जी घातक ठरु शकते. शाळकरी मुलींना डेटिंग दरम्यान त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याची काही उदाहरणे आहेत. अशाप्रकारच्या वर्तनास डेटिंग व्हॉयोलन्स असंही म्हणतात. मुलींना अशाप्रकारच्या नात्यांपासून तसेच परिस्थितीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यास शिकवा.

नैराश्य आणि मानसिक समस्या
नैराश्य आणि मानसिक असंतुलनाची समस्या तरुण मुलींमध्ये जास्त दिसून येते. आकडेवारीनुसार, शाळेत जाणार्‍या एक तृतीयांश मुलींमध्ये निराशा आणि दुःखाची भावना असते. वेळीच त्यांच्या मानसिक समस्यांकडे लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. या वयातील मुलींशी बोलून, त्यांची भावनिक स्थिती समजून घेतल्यास त्या स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतात.