मुलांचा चिडचिडेपणा स्वभाव की; असू शकतो मानसिक आ...

मुलांचा चिडचिडेपणा स्वभाव की; असू शकतो मानसिक आजार (How To Tackle Irritating Children : Tips To Parents)

लहान मुलं मस्तीखोर असतातच ते स्वाभाविक आहे. मात्र एखादी गोष्ट मनाप्रमाणे न झाल्यास चिडचिड करणं, जास्त आक्रमक बनणं म्हणजे त्यांना एखादा मानसिक आजार असू शकतो. वैद्यकीय भाषेत याला अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर म्हणतात. ही एक मेंदूशी संबंधित समस्या आहे. ही समस्या लहान मुलांमध्ये प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे मुलांच्या चिडचिडेपणाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. बर्‍याचदा मुलं या आजाराने ग्रस्त असल्याचं पालकांना कळत नाही.
मुलांचा चिडचिडेपणा ही पालकांना अनेकदा न सुटणारी समस्या वाटते. एखादं चॉकलेट देऊन त्यांना समजावणं अशावेळी सोपं वाटतं. त्यापेक्षा मुलांची मानसिकता समजून घेऊन ही परिस्थिती हाताळली, तर तुम्ही मुलांचा चिडचिडेपणा कमी करू शकता. पालकांनी मुलांच्या स्वभावातील बदल लक्षात घेऊन तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. जेणेकरून मुलांना या आजारातून बाहेर काढण्यास मदत होऊ शकते.

लक्षणं काय आहेत?
– मूड बदलणं
– एका जागी स्थिर न बसणं
– बसल्यावर सतत हलत बसणे किंवा काहीतरी करत राहणे
– कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देणे
– शांत न राहणे
– सतत विनाकारण बडबड करणे
– एक काम करत असताना ते सोडून दुसर्‍या कामाकडे लक्ष देणे
– राग आल्यावर वस्तू फेकून देणे
– चिडचिडेपणा

नैराश्य
अशा मुलांना सांभळणं पालकांसाठी आव्हानात्मक असतं. अशा मुलांना आवरणं अवघड असतं. पालकांना खूप संयम ठेवावा लागतो. लहान मुलांची मानसिकता समजून घेत सांभाळणं, हे हल्ली पालकांसाठी एक कौशल्याचं काम झालं आहे. मुलांचा चिडचिडेपणा आणि राग हाताळताना पालकांना त्यांच्या वयाचं होऊनच विचार करावा लागतो. अशावेळी त्यांना आणखी दटावून आणि दरडावून चालत नाही.
वय वर्षे एक ते पाच या वयोगटातील मुलामुलींमध्ये स्वाभाविक चिडचिडेपणा दिसून येतो. अशावेळी ही मुलं रडारड, आरडाओरडा, मारणं, आदळआपट इथपासून ते स्वतःचा श्वास रोखून धरण्यापर्यंत टोकाच्या गोष्टीही करत असतात. अशावेळी त्यांचं लक्ष हळूवारपणे दुसरीकडे वळवणं गरजेचं असतं.
मुलांचा राग व्यवस्थितपणे सांभाळून त्यांना पुन्हा हसतं-खेळतं करण्याची जबाबदारी पालकांची असते. म्हणूनच मुलानं चिडचिडेपणा केला, झोपायला जाताना रडारड केली की, प्रत्येक वेळी तुम्ही त्याला चॉकलेटचं आमिष किंवा एखाद्या गोष्टीची भीती दाखवण्यापेक्षा त्याचं लक्ष दुसरीकडं वळवणं अधिक गरजेचं असतं. अशावेळी सुजाण पालकांनी काय करावं यासाठीच्या काही टीप्स :
दुर्लक्ष करणं
काहीवेळा मुलांच्या चिडचिडेपणाकडे दुर्लक्ष करणं हा एक चांगला उपाय ठरतो. त्यामुळे त्यांचा राग हा दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं, तर ती अधिक चिडचिडेपणा करतात. तुम्ही दुर्लक्ष करायला सुरुवात केल्यावर मुलांचा चिडचिडेपणा थांबण्यापूर्वी काही दिवस तो वाढू शकतो. लाथा मारणं, चावणं, बोचकारणं अशा गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करू नका.

मन वळवणं
मुलांनी चिडचिडेपणा करत एखाद्या गोष्टीची मागणी केलीच, तर ती पूर्ण न करता कौशल्यानं त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवा. मुलींनी चिडचिडेपणा केल्यावर त्यांना शिक्षा करण्याचा उद्योग आजिबात करू नका. चिडचिडेपणात मुलाला अथवा मुलीला उद्देशून बॅड बॉय’ किंवा बॅड गर्ल’ असे शब्दप्रयोग कटाक्षानं टाळा.
नकारात्मकता हाताळणं
मुलांना विविध प्रकारच्या मानसिक अवस्था आणि तणावांना कसं सामोरं जायचं हे छोट्या छोट्या गोष्टीतून समजवा. स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी काय करायचं हे त्यांना हसतखेळत, गमतीदार उदाहरणं आणि गोष्टी सांगून शिकवा. मुलं बोलायला शिकली असतील, तर त्यांना हावभाव किंवा इशारे यांपेक्षा बोलण्यातून व्यक्त व्हायची सवय लावा.
आदर्श पालक
पालक म्हणून तुम्ही मुलांसमोर पहिले आदर्श असणं गरजेचं असतं. मुलं नेहमीच त्यांच्या पालकांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे तुमचे ताणतणाव व्यवस्थित सांभाळून तुम्ही त्यांच्यासमोर याचं उदाहरण ठेवू शकता.

संवाद साधणं
तुमच्या मुलांशी नियमित संवाद साधा. मुलांनी आइस्क्रीम अथवा तत्सम पदार्थांसाठी हट्ट धरला, तर त्यांना ते न देण्यामागची कारणं शांतपणे पटवून द्या. मुलांशी सततचा संवाद ठेवलात, तर त्यांच्या रागाशी तुम्ही व्यवस्थित डिल करू शकता.
छान पर्याय द्या
मुलांच्या रागावर ताबा मिळवताना तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांचं मन वळवणं खूप सोपं असतं. जेव्हा मूल चिडचिड करणार हे तुमच्या लक्षात येईल, तेव्हा एखादी छानशी गोष्ट वाचून दाखवा किंवा छानपैकी त्याला वॉकला घेऊन जा, एखादा खेळ खेळा. मुलांना एखाद्या छानशा कलेत गुंतवा. काहीवेळा विनोद करणंही त्या परिस्थितीला हाताळण्यासाठी उत्तम ठरतं. त्यासाठी विनोदी चेहेरा करा, छानसा विनोद सांगा. यामुळे मुलाच्या मनाला त्रास देणारी गोष्ट ते विसरून जातील.

आपल्या मुलांशी बोला
आपल्या मुलांना राग येईल तेव्हा त्यांना चिडवू नका. यामुळे त्यांचा राग आणखी तीव्र होऊ शकतो. त्यांच्याशी बोला आणि त्यातून आक्रमकतेमागील खरे कारण जाणून घ्या. आपल्या मुलांबरोबर मित्रांप्रमाणे वर्तन करा. यामुळे मुलांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यास मदत मिळते. जेणेकरून मुलांच्या मनातील नकारात्मक भावना तुम्ही दूर करू शकता. मुलाला मानसिक आजार असल्याचे लक्षात आल्यावर समाज काय बोलेल याचा विचार करून आजारपण लपवू नका. यामुळे समस्या अधिक बिकट बनू शकते.

मुलांना मारू नका 
जेव्हा मुलं आक्रमक वागतात, त्यावेळी अनेक पालकांची चिडचिड होते. बरेच लोक मुलांना मारतात. असे करणे चुकीचं आहे. मुलं आक्रमक होत असेल तर त्यांच्यावर न चिडता त्यांची समजूत घातली पाहिजे. जेणेकरून मुलांचा राग शांत होईल.
राग शांत झाल्यावर समजूत काढा
जर मुलाने नकारात्मक वागणूक दर्शवली तर त्यांना लगेच रोखायला जाऊ नये. मुलाचा राग शांत झाल्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा.

तोडगा काढण्याचा प्रयत्न करा 
तुमच्या मुलाबरोबर बसा आणि त्याला जे वाटते त्याबद्दल मोकळे करा. समस्येवर उपाय शोधा. आपल्या मुलास ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाच्या व्यायाम करण्याची सवय लावा. ज्यामुळे मुलाच्या मनावर नियंत्रण राहिलं. आपल्या मुलामध्ये ज्या परिस्थितीत आक्रमक होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
पडद्यावरील वेळ कमी करा 
दूरदर्शन पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे किंवा टॅब्लेट वापरण्यात घालवलेल्या वेळेमुळे मुले आक्रमक किंवा हिंसक होऊ शकतात. आपल्या मुलास सामोरे जाणार्‍या सामग्रीचे नियमन आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे. टीव्ही पाहण्यासाठी किंवा व्हिडिओ गेम खेळण्यासाठी वेळापत्रक सेट करा. मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. आपल्या मुलांसाठी माहितीपूर्ण प्रोग्राम निवडा किंवा त्यांच्याबरोबर मैदानी किंवा घरातील खेळ खेळा.
मुलांना प्रोत्साहन द्या
आपल्या मुलास बक्षीस देणे खूप महत्वाचे आहे. आपल्या मुलामध्ये सकारात्मक वर्तनात्मक बदल लक्षात घेतल्यास, चांगल्या वर्तनासाठी त्याचे कौतुक करा. जेणेकरून मुलाला प्रोत्साहन मिळेल.

मुलांच्या विकासात मानसिक आरोग्याला सर्वाधिक महत्त्व आहे, पालकांनी मुलांच्या वर्तन व भावनिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अंधश्रध्देच्या आहारी न जाता योग्य वेळी मानसतज्ञाची मदत घ्यावी.