लाजिरवाणी स्थिती आणि उपाय (How To Tackle Embarr...

लाजिरवाणी स्थिती आणि उपाय (How To Tackle Embarrassing Moments)

दैनंदिन जीवनात काही विकार आपल्याला लाज आणतात. त्यामुळे कित्येकदा अशी स्थिती निर्माण होते की आपली अवस्था लाजिरवाणी होते. त्याबद्दल बोलताना संकोच वाटतो. त्यावर डॉक्टरी उपचार आहेत. पण त्याआधी काही उपाय स्वतः करून थोडाफार दिलासा देता येईल.

– श्‍वासाची दुर्गंधी
काही लोकांच्या श्‍वासाला दुर्गंधी येत असते. त्यांनी तोंड उघडलं की नको वाटणारा कुबट, कुजका वास येतो. मात्र त्याची त्या माणसाला कल्पना नसते. ही दुर्गंधी समोरच्या माणसाला येते. अन् त्याची जाणीव करून देताच ज्याच्या तोंडाला हा वास येतो, त्याला लाज वाटते. आपल्या दातांच्या फटीत किंवा जिभेवर अन्नाचे अति बारीक कण अडकतात. त्यातून बॅक्टेरिया निर्माण होतो. हा बॅक्टेरिया दुर्गंधी निर्माण करतो. शिवाय दात किडतात. हिरड्यांचे विकार बळावतात. अति मसालेदार पदार्थ खाणारे तसेच धूम्रपान करणारे व तंबाखू खाणारे जे लोक असतात, त्यांचे तोंड असेच दुर्गंधीने भरलेले असते व समोरच्याला बेजार करते. अन् त्या माणसालाही लाज आणते.

उपचार : या दुर्गंधीचे मूळ, अडकलेल्या अन्नकणातून निर्माण होणार्‍या बॅक्टेरियामध्ये असल्याने त्याचा नाश करणे ही आपली प्राथमिकता ठरते. दातांच्या फटीत अन्न अडकून राहू नयेत म्हणून सकाळच्या प्रमाणेच रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे – अर्थात् ब्रश करणे; ह्याची सर्वांनीच सवय लावून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे जीभ साफ केली पाहिजे. बोटाने घासून करावी अथवा फार्मसीत मिळणार्‍या टंग स्क्रॅपरने करावी. याशिवाय माऊथवॉशने चूळ भरून तोंडातील दुर्गंधी घालवावी. एव्हढं करूनही जर तुमच्या हिरड्यांना सूज येत असेल, ब्रश करताना दात किंवा हिरड्यातून रक्त येत असेल, तर दंतवैद्याकडे जाणे इष्ट.

– गॅसेस्चा त्रास
आपली बैठी जीवनशैली, अरबट चरबट खाण्याच्या सवयी आणि वातूळ पदार्थ खाण्याची हौस यामुळे कित्येकांना गॅसेस्चा त्रास होतो. चारचौघात आवाज करून पादल्याने काय लाजिरवाणी स्थिती होते, ते त्याचे त्यालाच ठाऊक असते. शिवाय आपल्या आजूबाजूची माणसे नाकावर हात किंवा रुमाल धरतात तेव्हा लाजेने त्यांची मान खाली जाते. अपचन, अ‍ॅसिडिटी आणि जेवण झाल्यावर लगेच झोपणे, या कारणांनी पोटात वायू धरतो, पोट फुगते, आणि मोठा आवाज करून अथवा फुसका बार सोडून तो वायू गुदद्वाराने बाहेर पडतो व पादणार्‍याला लाज आणतो.

उपचार : अन्नपदार्थ घाईघाईने खाणे टाळा. अन्नाचा प्रत्येक घास नीट चावून घ्या. अति मसालेदार पदार्थ, शीतपेये, वातूळ पदार्थ (बेसन, कडधान्ये, कोबी, मुळा) वर्ज्य करा. (अर्थातच ज्यांना गॅसेस्चा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे पथ्य) मैद्याचे पदार्थ (ब्रेड, पाव, मैद्याची रोटी), च्युईंगम, बिस्किटे यांचे सेवन करू नका. दिवसातून थोडे थोडे पदार्थ चार वेळा खा. एकाच वेळी पोटाला तड लागेस्तोवर जेवण नका. जेवणानंतर ओवा, बडीशेप खा. एव्हढं करूनही गॅसेस्चा त्रास कमी झाला नाही किंवा पोटदुखी, मळमळ अशी लक्षणे दिसत राहिली तर डॉक्टरांकडे जाण्याचा कंटाळा करू नका. ज्यांची पचनक्रिया क्षीण आहे त्यांनी श्रीखंड, बासुंदी व दुधाचे पदार्थ टाळावेत.

– मूळव्याधीचे दुखणे
मूळव्याधीचे दुखणे असलेला माणूस सदैव त्रस्त असतो. चिडचिडा होतो. कारण गुदद्वाराच्या तोंडाशी असलेली ती सूज सदैव ठसठसत असते. शौचास करताना मूळव्याधीचा अडसर होत असल्याने होणार्‍या वेदनांनी कण्हत राहावे लागते. मूळव्याधीचा आकार वाढला तर गुदद्वारातून रक्त येऊ लागते. शौचास करताना रक्त पडते. एरव्हीसुद्धा रक्त आल्याने कपडे खराब होतात. शिवाय त्या भागास खाज सुटणे, वेदना होणे; या प्रकारांनी माणूस हैराण होऊन जातो. पुढे पुढे तर त्या सुजलेल्या भागास काटे येतात. तेव्हा खुर्चीत बसणेसुद्धा अवघड होऊन बसते.

उपचार : अति तिखट पदार्थ, मिरची चवीने खाणे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते व मूळव्याधीची व्याधी जडते. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठ असणार्‍यांना ही समस्या निर्माण होते. त्यामुळे या सर्व गोष्टी टाळणे, हा मूळव्याधीवरचा प्राथमिक उपचार म्हणता येईल. आहारात तंतुमय पदार्थांचा जास्त वापर करावा. तसेच पाणी जास्त प्यावे. घरगुती दह्यापासून तयार केलेले पातळ ताक, दिवसातून तीन वेळा तरी प्यावे. दुधाचे पदार्थ खाऊ नये. मूळव्याधीची सूज व त्याला सुटणारी खाज यावर डॉक्टरी सल्ल्याने औषधी क्रीम लावावे. बर्फाचे तुकडे (आईस क्यूब्ज्) जुन्या टॉवेलात किंवा पातळ कापडात लपेटून ते मूळव्याधीवर किमान 10 मिनिटे तरी दाबून ठेवावे. मूळव्याधीचा त्रास मोठ्या प्रमाणावर झाल्यास डॉक्टर ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. तो पुष्कळ जणांना पटत नाही. त्यांची कारणे वेगवेगळी असू शकतात. शस्त्रक्रियेऐवजी चांगल्या होमिओपॅथी डॉक्टरांकडून उपचार करावेत. होमिओपॅथीच्या औषधाने मूळव्याधीस आराम मिळतो.

– जननेंद्रियास खाज
काही स्त्रियांच्या जननेंद्रियास अतिशय खाज सुटते. तिथे सूज येते. ती खुपते. परिणामी तिथे हात जाऊन खाजविल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. ही खाज, खुपणे मधूनच उद्भवत असल्याने चार लोकांत असताना, तिथे खाजविणे; ही अतिशय लाजिरवाणी बाब होऊन बसते. ही खाज अतिशय तीव्र असते अन् लोकलज्जा देखील तशीच तीव्र असते. विविध इन्फेक्शन्स्मुळे ही स्थिती निर्माण होते. त्यामध्ये साबणाची, कपडे धुण्याच्या पावडरची, पॅन्टी लायनर्सची अ‍ॅलर्जी यांचा समावेश असतो. अतिशय स्कीन टाईट जीन्स्, नायलॉनच्या पॅन्टीज् किंवा त्वचारोग यामुळे योनीमार्गास खाज सुटते व लोकांमध्ये स्त्रियांना लाज आणते. योनीमार्गावरील केसांनी घाम येतो व त्यामुळे ही स्थिती येते. तसेच फंगल इन्फेक्शन, गजकर्ण किंवा मेनोपॉज्नंतर शरीरातील हार्मोन्सची पातळी कमी होणे, यामुळे देखील ही अवस्था येते.

उपचार : अति तंग कपडे घालू नयेत. नायलॉनच्या पॅन्टीज् ऐवजी सुती पॅन्टीज घालाव्यात. हवा खेळती राहील, असे आतील व बाहेरील कपडे घालावेत. अंगाचे व कपड्याचे साबण बदलून पाहावेत. योनीमार्गावरील केस नियमितपणे काढावेत. मात्र फंगल इन्फेक्शन, गजकर्ण, गुप्तांगावर सूज यामुळे ही अवस्था आली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्याने अ‍ॅन्टी फंगल क्रीम लावावे. योनीमार्गाच्या खाजेव्यतिरिक्त संपूर्ण शरीरास जेव्हा खाज येते, तेव्हादेखील चार लोकांत लाजिरवाणे वाटते. सर्वांगास येणारी खाज ही अस्वच्छता, फंगल इन्फेक्शन, हार्मोन्सचे असंतुलन, अ‍ॅलर्जी यामुळे येऊ शकते. त्यावर डॉक्टरी सल्ल्याने उपचार करावेत. अ‍ॅलर्जी कशाने होते, याचा स्वतः शोध घेऊन त्या गोष्टी टाळाव्यात.

– मूत्रविसर्जनाची घाई
काही लोकांना वारंवार लघवी लागते. शिवाय ती नियंत्रित करता येत नाही. घाईची लागल्यास चारचौघात शोभा होते. प्रवासात, ऑफिसात, समारंभात अशा वेळी फार पंचाईत होते व लाज वाटते. काही लोकांमध्ये ही मूत्रविसर्जनाची घाई अशा अवस्थेत पोहचली असते की खोकल्याने, हसण्याने मूत्र ठिबकू लागते. वृद्धापकाळाने मूत्रपिंड, मूत्रमार्ग अशक्त झाल्याने ही घाईची लागते. परंतु मधुमेही रुग्ण, युरीनरी इन्फेक्शन व स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर ओटीपोट व योनीमार्ग यातील स्नायू अशक्त व ढिले झाल्याने ही घाईची लागते व चारचौघात लाज आणते. मूत्र थेंबथेंब ठिबकल्याने आपल्या आतील कपड्यास वास येतो. त्यालाही लोक नाकं मुरडतात व आपल्याला संकोच वाटतो.

उपचार : मूसविसर्जनाची अशी घाई होत असल्यास आहारात मिठाचा वापर कमी करावा. पाणी कमी प्यावे. त्याचप्रमाणे स्त्रियांनी ओटीपोटास उपयुक्त असे व्यायाम करावेत. तज्ज्ञांकडून ते शिकून मगच करावेत. मधुमेहाची तीव्रता नियमितपणे तपासावी. त्याचबरोबर डॉक्टरी उपचार अवश्य करावेत. त्यामध्ये मूत्राची तपासणी, योनीमार्गाची तपासणी, अल्ट्रासाऊंड स्कॅन, सिस्टोस्कोपी (मूत्रपिंडाची टेलिस्कोपने तपासणी) अशा तपासण्या केल्या जातात व औषधोपचार सुचविले जातात.