मुलाचा अबोलपणा कसा घालवू? (How To Tackle A Rese...

मुलाचा अबोलपणा कसा घालवू? (How To Tackle A Reserved Child)

मी स्वतः होमिओपॅथीची डॉक्टर आहे. व्यापारी समाजातील असूनही मला साहित्य, काव्य यात रूचि आहे. मी स्वतःही कवयत्री आहे. माझ्या कवितासंग्रहाला पुरस्कार मिळालेला आहे. दिसायलाही मी चांगली आहे. या सर्वांमुळे एका श्रीमंत घराण्याकडून मला मागणी आली. त्यांचा मुलगाही डॉक्टर होता, स्मार्ट होता. आमचे थाटामाटात लग्न झाले. पण माझ्या नवर्‍याला प्रॅक्टीस करण्यात अजिबात रुचि नाही. सात पिढ्या आरामात जगू एवढे ऐेशर्य आपल्याजवळ आहे. कशाला हवी प्रॅक्टीस? असे त्याचे म्हणणे असे. आणि तो त्याच्या टोळभैरव मित्रांसोबत पत्ते कुटणे, तीर्थयात्रा करीत फिरणे यात रमलाय. पैशासाठी नव्हे तर आपल्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून तरी त्याने प्रॅक्टीसमध्ये लक्ष घालावे असे मला वाटते. यावरून आमच्यात वादावादीही खूपदा होते. पण नवरा ऐकत नाही.
आता आमचा मोठा मुलगाही मोठा झालाय. इंजिनियर झालाय. श्रीमंती असल्याने आणि डॉक्टर म्हणून माझी समाजात पत-प्रतिष्ठाही मोठी असल्याने, त्याला आमच्या समाजातील अनेक धनाढ्य घरच्या मुली सांगून येताहेत. पण माझ्या मुलाला नोकरीधंद्यात रूचि नाही. व्यापार- कारखानदारी यातही रूचि नाही. लहानपणापासून तो स्वभावानेही अबोल आहे. त्याला कुणी मित्रही नाहीत. कायम त्याच्या खोलीत कॉम्प्युटर घेऊन बसलेला असतो. काय करतोस म्हणून विचारलेलेही त्याला आवडत नाही. माझ्या नवर्‍यासारखा हाही निष्क्रिय आणि कर्तृत्त्वशून्यच राहणार का? या प्रश्नाने मी व्याकूळ होते.

मानसोपचार तज्ज्ञांनाही माझा मुलगा दाद देत नाही. त्याचा बाकी काहीही त्रास नाही. पण त्याची निष्क्रियता व अबोलपणा याने मी परेशान आहे. त्याचे वय वाढत चाललेय. येणारी स्थळेही कमी कमी होत चाललीत. लग्नाबाबत बोललेलेही त्याला आवडत नाही. त्याला काय हवे, त्याला आयुष्यात काय करायचेय याबाबत त्याने घडाघडा बोलावे असे मला वाटते. पण त्याचा अबोलपणा घालविण्यात मला अजुनतरी यश आलेले नाही. आता सहेलीनेच मला सल्ला द्यावा.
– डॉ. माया, औरंगाबाद
डॉक्टरीणबाई, अहो तुमचा मुलगा स्वभावाने अबोल आहे, ही समस्या मोठी आहे. परंतु वेगळी नाही. कारण घरोघरी अशा स्वभावाची मुले आढळतात. याला कारण त्यांचं वय. तुमचा मुलगा वयाने मोठा आहे. इंजिनियर झालेला आहे. म्हणजे तारुण्याच्या ऐन बहरात आहे. या वयात मुले सहसा अबोल होतात. त्यांना आई-वडिलांशी बोलायला आवडत नाही. कुटुंबात मिसळायला आवडत नाही. सणसमारंभाला जायला नको वाटते. कारण ते स्वतःच्या कोषात राहतात. आपल्या भावविश्वात रमतात. मित्रांमध्ये मिसळतात. तुमच्या मुलाला तर मित्रही नाहीत.
कॉम्प्युटर हाच त्याचा मित्र आहे. यातच सगळे आले. तुमची परेशानी समजण्यासारखी आहे. पण हतबल होऊ नका. तुमचे पती, डॉक्टरसाहेब यांना विश्वासात घ्या. तरुण मुलाचा खरा मित्र त्याचे वडीलच असतात. हा सर्वसाधारण पायंडा आहे. तो डॉक्टरांना समजावून सांगा. मुलाची निष्क्रीयता ही तुमच्यापासून आली असेल तर ती धोकादायक आहे, याची कल्पना त्यांना द्या. पत्ते खेळण्यात, तीर्थयात्रा करण्यात जी मौज मिळवली, आनंद घेतला; तसाच आनंद मुलाचे मित्र बनून घ्या, अशी त्यांना समज द्या. तुम्ही स्वतः सुशिक्षित गृहिणी, माता आहात. निष्क्रीय आणि कर्तृत्त्वशून्य नवर्‍यासमोर हात टेकले बुवा; अशी मुळमुळीत भूमिका घेऊ नका. स्वतः कणखर व्हा अन् पतीदेवांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्या. त्याचप्रमाणे तुमच्या मुलाला लग्नाबद्दल बोललेले आवडत नसले तरी, त्यालाही विश्वासात घेऊन त्याला लग्नाची गळ घाला. त्याचे लग्न झाले की स्वभाव बदलेल, वर्तणूक बदलेल, याची खात्री बाळगा.