घरातील गरजेच्या वस्तूंना कसे कराल सॅनिटाइज? (Ho...

घरातील गरजेच्या वस्तूंना कसे कराल सॅनिटाइज? (How To Sanitize Essential Commodities)

कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगाला हलवून सोडलेले आहे. कोरोनाचे विषाणू घरात येऊ नये यासाठी सर्वजण सर्वतोपरी काळजी घेताना दिसत आहेत. बाहेरून घरात आणल्या जाणार्या खाण्याच्या चीजवस्तू ते घरातील प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करून घेत आहेत. फळं, भाज्या, औषधं सॅनिटाइज केल्यानंतर त्यातील विषाणू मरून जातात, असं त्यांनी मनात पक्क केलेलं आहे. परंतु, हे सत्य नाही. चला तर मग घरातील गरजेच्या वस्तूंना कशाप्रकारे सॅनिटाइज करायचं ते पाहुया.

फळं आणि भाज्या
दुकानातून खरेदी केल्या जाणार्‍या फळं आणि भाज्यांवर सहा ते सात तासापर्यंत कोरोनाच्या विषाणूंचा प्रभाव असतो. ही फळं आणि भाज्या एखाद्या गरम ठिकाणी वा उन्हामध्ये जरी ठेवल्या तरीही त्यावर चार तासापर्यंत कोरोना विषाणूंचा प्रभाव राहतोच. म्हणून दुकानातून आणलेली फळं आणि भाज्यांची पिशवी चार तास बाल्कनीमध्ये किंवा उन्हामध्ये ठेवा आणि त्यानंतरच फळं आणि भाज्या स्वच्छ धुऊन फ्रिजमध्ये ठेवा.
पिशवीतून सामान काढून घेतल्यानंतर पिशवी जर कागदाची असेल तर ती घराबाहेर ठेवा. पिशवी कापडाची असेल तर ती 1-2 तास पाण्यात भिजवून ठेवून मग साबणाने धुऊन सुकत घाला.
फळं, भाज्या किंवा इतर खाण्याच्या वस्तू गरम पाण्यात घालून ठेवून मग स्वच्छ धुऊन घ्या.
खाण्याच्या वस्तू बेकिंग सोडा घातलेल्या गरम पाण्यातून स्वच्छ धुऊन घ्या.
फळं आणि भाज्यांवर सॅनिटाइज करणं योग्य आहे का?
बरेचसे लोक कोरोनाच्या विषाणूंना मारण्यासाठी फळं आणि भाज्यांवर सॅनिटायजर मारतात. परंतु सॅनिटायजर हे रासायनिक पदार्थांपासून बनवलेले असते. ते खाण्याच्या वस्तूंवर मारल्यास त्यामुळे आपलं आरोग्य बिघडू शकतं. शिवाय सॅनिटायजरच्या वापराने फळं व भाज्यांवरील विषाणू मरतात, असं आपण ठामपणे सांगूही शकत नाही.
सॅनिटायजरचा वापर केवळ शारीरिक अंग (हात, पाय), तसेच धातू आणि स्टीलच्या वस्तूंवर करणे योग्य आहे.
ज्या वस्तू एकदा वापरल्यानंतर नष्ट करायच्या असतात, अशाच वस्तूंवर सॅनिटायजरचा वापर केला जातो.
खाण्याच्या वस्तूंवरील विषाणूचा नाश करण्यासाठी गरम पाण्याचा पर्याय एकदम उत्तम आहे. गरम पाण्यामध्ये जे घटक असतात त्यामुळे विषाणूंचा सहज नाश होतो. तुम्ही गरम पाण्यात एक थेंब पोटॅशिअम परमॅगनेटही टाकू शकता. पोटॅशिअम परमॅगनेट घरात नसल्यास बेकिंग सोडा गरम पाण्यामध्ये टाका. परंतु हे करताना मास्क लावायला विसरू नका.
फळं आणि भाज्यांना सॅनिटायजर करण्यासाठी व्हेजिटेबल सॅनिटायजरचा वापर करता येऊ शकतो, परंतु त्या व्हेजिटेबल सॅनिटायजरमध्ये पोटॅशिअम परमॅगनेट असावयास हवं.

केळी आणि कांदे
केळी आणि कांदे यांचं सॅनिटायजर करायचं असल्यास ते गरम पाण्यात घालता येत नाहीत. तेव्हा अशा वस्तू जेथे ऊन येणार नाही अशा बंद ठिकाणी ठेवा.
अशा वस्तू वापरण्याच्या 3-4 तास आधी मोकळ्या हवेत पसरवून ठेवा. अशा भाज्या लगेच शिजवू नयेत, तसेच फळंही लगेच खाऊ नयेत.

औषधं
औषधाची स्ट्रीप सॅनिटाइज केल्यानंतर त्यावरील विषाणू मरतात, असं काही आढळून आलेलं नाही. तेव्हा त्यास सॅनिटाइज करण्याची गरज नाही.
औषधाची स्ट्रीप सॅनिटाइज करण्यापेक्षा एका बॉक्समध्ये घरातील सामान्य तापमानाला ठेवा.
औषधाच्या स्ट्रीपला बर्याच जणांचे हात लागलेले असतात, तेव्हा औषधं आणल्या आणल्या लगेच घेऊ नका.
औषधं ऊनामध्ये ठेवू नका, कारण त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल.

दूध आणि पनीर
दूध, पनीर सारख्या वस्तू जर पॅक्ड असतील तर बाहेरून साबणाचं पाणी लावून धुऊन घ्या. नंतर त्या बॉक्समधून काढून भांड्यात ठेवा आणि बॉक्स घराबाहेर ठेवा. मात्र हे करताना चेहर्‍यास मास्क लावा.
पॅक्ड वस्तूंचे बॉक्स कचर्‍याच्या डब्यात टाका, परंतु त्या कचर्‍याच्या डब्यास झाकण लावा. नाहीतर त्यात विषाणू असल्यास दुसर्‍या व्यक्तीस त्याची लागण होऊ शकते.
प्लास्टिक, धातू आणि कोल्ड ड्रिंक्स यांच्या कॅनमध्ये विषाणू 24 ते 48 तास तसेच राहतात. म्हणून दूध, पनीर यांसारख्या वस्तू दुकानातून आणल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये ठेवू नका. तर घरातील तापमानावर अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी कोणीही जाणार नाही.
हॉटेल वा रेस्टॉरंटमधून मागवलेले आणि बॉक्समध्ये पॅक्ड केलेले अन्नपदार्थ
आपण जेव्हा बाहेरून शिजवलेले अन्नपदार्थ मागवतो, तेव्हा लक्षात घ्या, असे पदार्थ मोठ्या आचेवर शिजवलेले असतात. त्यामुळे त्यात विषाणू जिवंत राहण्याची शक्यताच नसते.
अन्नपदार्थांच्या पॅकिंग आणि वितरणाच्या वेळी मात्र त्यास अनेकांचे हात लागत असतात, तेव्हा शक्यतो बाहेरून अन्नपदार्थ मागवणे टाळाच. मागवायचेच झाल्यास त्याची पॅकिंग कशी आहे ते तपासा.
खाण्याचे पदार्थ बॉक्समधून काढून लगेचच बॉक्स बाहेर असलेल्या कचरापेटीत टाका.

नवीन कपडे आणि चपला
घरामध्ये आणि घराबाहेर वापरावयाच्या चपला वेगवेगळ्या असाव्यात. बाहेर गेल्यानंतर कधी आपला चपलेचा पाय विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या थुंकीवर पडल्यास आपल्यालाही त्याची लागण होऊ शकते.
नवीन कपडे आणि चपला घरी घेऊन आल्यानंतर त्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणात 48 तास ठेवा.

पत्र आणि कुरिअर
पोस्टातून पत्र किंवा कुरिअर आल्यास ते उघडून पाहण्यापूर्वी उन्हामध्ये ठेवा. डॉक्युमेंटचे पेपर असतील तर ते तीन ते चार तास उन्हामध्ये ठेवा.
कुरिअरने प्लास्टिक किंवा धातूचं काही सामान आलं असल्यास ते सॅनिटायजरने साफ करा.
कुरिअर घेतल्यानंतर पोस्टमनने दिलेल्या पावतीवर सही करण्यासाठी स्वतःचं पेन वापरा.
पैसे, वर्तमानपत्र, पुस्तकं आणि स्टेशनरीचं सामान
पैसे, वर्तमानपत्र, पुस्तकं, स्टेशनरी सामान यांसारख्या वस्तूंवर फार वेळ जंतू राहू शकत नाहीत आणि जिवंतही राहत नाही. तेव्हा या वस्तूंना सॅनिटाइज करण्याची आवश्यकता नाही.
परंतु सुरक्षितता म्हणून या वस्तू वापरण्यापूर्वी 2-3 तास आधी बाहेर काढून ठेवा.
प्लास्टिक किंवा धातूच्या (पेन, पेन्सिलचा बॉक्स इत्यादी) वस्तूंना मात्र सॅनिटाइज जरूर करा.

बाहेर जाताना या गोष्टी लक्षात ठेवा
बाहेर कँटींगमध्ये खायला जात असाल तर स्वतःचा वैयक्तिक कप, ग्लास, चमचा आणि ताट वापरा.
ऑफिसमध्ये दुसर्‍यांचा चार्जर किंवा पावर बँक वापरू नका.
सहकार्‍याची स्टेशनरी जसे पेन, पेन्सिल, रबर, स्टेपलर वापरू नका.
घर-ऑफिसच्या ठिकाणी पायर्‍या चढताना रेलिंग आणि लिफ्टच्या बटणाला स्पर्श करू नका. आणि केल्यास घरी आल्यानंतर आधी साबणाने हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायजर लावा.
घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या सोबत सॅनिटाइज केलेला टिश्यू किंवा वाइप्स ठेवायला विसरू नका.
मास्क लावूनच घराबाहेर पडा.


बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदा काय कराल?
बाहेरून आल्यावर आधी चपला बाहेरच काढा नि घरात या.
मग आपला चष्मा, पेन, मोबाईल सॅनिटायजरने स्वच्छ करा.
आपले कपडे एक-दोन तास साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्यातून काढून उन्हामध्ये वाळत घाला.