करोनाच्या लसीकरणासाठी नोंदणी कशी कराल? ही आहे न...

करोनाच्या लसीकरणासाठी नोंदणी कशी कराल? ही आहे नोंदणीसाठी योग्य पद्धत… (How To Register For Corona Vaccination, This Is The Correct Method Of Registration)

करोनासाठीच्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा आपण कसा लाभ घेऊ शकता? करोनाच्या लसीकरणासाठी आपण नोंदणी कशी कराल? आपल्याला करोनाच्या लशीचा फायदा केव्हा आणि कसा मिळेल यासंबंधीच्या संपूर्ण माहितीसाठी जरूर वाचा, करोनाच्या लशीच्या नोंदणीची योग्य पद्धत….

सरकारने बहुतांशी राज्यांमध्ये कोविड-१९ लसीकरणाचं ड्राय रन सुरू केलं आहे. लवकरच आपल्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी बहुतांशी लोकांना या करोना लसीचा लाभ मिळणार आहे. ठिकठिकाणच्या व्हॅक्सीनेशन सेंटर्समध्ये यासंबंधीची तयारी जोरात सुरू आहे. एवढेच नव्हे तर, पुढच्या दोन आठवड्यांच्या काळात देशव्यापी लसीकरणाची मोहीम सुरू होणार आहे. भारतात आतापर्यंत दोन लशींना मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही लशी भारतातच बनवलेल्या आहेत. यापैकी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ‘कोविशील्ड’ लस जी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मदतीने बनवली आहे आणि दुसरी भारत बायोटेकची स्वदेशी विकसित लस ‘कोव्हॅक्सिन’.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अलिकडेच ट्वीट वरून अशी घोषणा केली की – पहिल्या टप्प्यातील कोविड – १९ लसीकरण हे मोफत केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी असं म्हटलं आहे,” कोविड-१९ लशीच्या सुरक्षा आणि प्रभावाबाबत कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. सदर लशीला मंजूरी देण्याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही.” हर्षवर्धन यांनी यापूर्वी विरोध असतानाही सुरू केलेल्या पोलियो प्रतिबंधक लशीला कसं यश मिळालं, ते याठिकाणी नमूद केलं.

करोना लसीकरणासाठी नोंदणी कशी कराल?
करोना प्रतिबंधक सर्वात मोठ्या लसीकरणाच्या मोहिमेचा सर्वांना लाभ कसा मिळेल आणि त्यासाठीची नोंदणी कशी करता येईल यासंबंधीची संपूर्ण माहिती आम्ही आपणास देत आहोत.
भारत सरकारने सुरुवातीला ३० करोड लोकांची प्राथमिक सूची बनवली आहे. यामध्ये सर्वप्रथम आरोग्याशी निगडीत कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, करोना विरुद्ध लढा देणाऱ्या इतर व्यक्ती, ५० हून अधिक वयाच्या वयस्कर व्यक्ती आणि ज्यांना गंभीर आजार आहेत अशा व्यक्तींचा समावेश आहे. यावरून असं स्पष्ट होतंय की, ही लस व्हॅक्सिन हेल्थवर्कर, सुरक्षा कर्मचारी आणि करोना विरुद्ध लढा देणाऱ्या इतर व्यक्ती यांना देण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबियांस नाही.
करोनाची लस टोचण्यासाठी जिल्हा, खेडोपाडी उपलब्ध असलेल्या इस्पितळांमध्ये तसेच इतर ठिकाणी सेंटर्स बनवली जात आहेत. या ठिकाणी नियमितपणे माहिती देऊन करोना लस दिली जाणार आहे. त्या त्या ठिकाणच्या रहिवाशी लोकांना आपापल्या सेंटरवर जाऊन ही लस घ्यावी लागणार आहे.

भारत सरकारने को-विन असं मोबाईल अप्लिकेशन बनवलं आहे, जे लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीस लसीकरणाचा डोस दिला जाईल, त्याला आधीच फोनवर संदेश मिळणार आहे. तुम्हाला डोस दिला जाणार असल्यास त्यासंबंधीची तारीख, वेळ आणि जागेची माहिती तुम्हाला तुमच्या फोनवर मिळणार आहे.

तुम्हाला लस टोचायची आहे किंवा नाही, हे सर्वस्वी तुमच्या इच्छेवर अवलंबून असेल. यासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. परंतु, करोनाचं संकट अजूनही जायचं नाव घेत नसल्याचं पाहता, सर्व तज्ज्ञ मंडळी लस घेण्याचाच सल्ला देत आहेत. करोनाच्या दुष्परिणामांबाबत म्हणाल तर, आम्ही सर्व नियमांचं पालन केल्यानंतरच लशीला परवानगी दिली आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. लस बनवताना हरतऱ्हेची दक्षता घेण्यात आलेली आहे, तरीही प्रत्येक लसीशी संबंधित काही दुष्परिणाम असतात. सर्व राज्यांना याबाबतची दक्षता घेण्यास सांगितले जात आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लोकांना ही लस दिली जाणार आहे, त्यांच्या नावाची यादी जाहीर केली जाईल. त्या आधारावर सगळ्यांना आपली नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला संदेश मिळेल.
लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंटरवर जाऊन तुम्हाला तुमची काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे दाखवावी लागतील, त्या आधारावर तुम्हाला लस दिली जाईल. लशीच्या नोंदणीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स/ निवडणूक ओळखपत्र/ पॅनकार्ड/आधार कार्ड/ पासपोर्ट, बँकतील खात्याचे पासबुक, मनरेगा कार्ड?, आरोग्य मंत्रालयाच्या हेल्थ आयडी कार्डमधील कोणत्याही डॉक्युमेंटच्या मदतीने आपण नोंदणी करू शकतो.
भारतामध्ये ही लस मोफत दिली जाणार की नाही याबाबत अजूनही निश्चित कळलेलं नाही.
अलिकडेच आरोग्य मंत्र्यांनी संपूर्ण देशामध्ये ही लस मोफत मिळेल असं म्हटलं होतं परंतु नंतर त्यांनी असं म्हटलं की, सुरुवातीला आरोग्याशी निगडीत कर्मचाऱ्यांनाच ही लस मोफत मिळेल. यावर प्रत्येक राज्यातील सरकारने स्वतःचे नियम लागू केले आहेत. अशा परिस्थितीत ही लस मोफत असेल की नाही यावर अजूनही देशव्यापी निर्णय घेतला गेलेला नाही आहे.

व्हॅक्सीन सेंटरवर जाऊन लस टोचून घेतल्यानंतर तुम्ही अर्धा तास तेथेच आराम केला पाहिजे. कारण त्या दरम्यान जर तुम्हाला काही त्रास झालाच तर तेथे उपस्थित डॉक्टर तसेच अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.
भारतामध्ये लशीचे एकूण दोन डोस दिले जातील. पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या मध्ये किमान २८ दिवसांचं अंतर असेल. म्हणजे तुम्हाला दोन वेळा व्हॅक्सीन सेंटरवर जावं लागेल. संशोधकांच्या मते सर्वांनी पूर्ण डोस घेणं आवश्यक आहे. तुम्ही एक डोस घेतला आहे, तर तुम्हाला दुसरा डोस घेणंही गरजेचं आहे. तेव्हाच करोनाचा इलाज पूर्ण होईल आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती कायम राहील. करोना प्रतिबंधक औषध घेतल्यानंतर आपली करोनासोबतची लढाई अजून मजबूत होईल. करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच ही शक्ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. तेव्हा दोन्ही डोस घ्या परंतु दोन्ही डोसमधील अंतराबाबत दक्ष राहा. एवढेच नाही तर आतापर्यंत करोनासंदर्भात जी काही काळजी घेत आलोत त्याबाबतही दक्ष राहा. त्याबाबत कोणताही हलगर्जीपणा केल्यास लशीचा परिणाम कमी होईल. अशा परिस्थितीत मास्क, दोन हाताचं अंतर आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुणे या सूचनांचा अवलंब करायलाच हवा.
एक गोष्ट लक्षात असू द्या की करोनाची लस टोचल्यानंतरही पूर्वीसारखंच सर्व नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. लसीकरणानंतर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित झालात, असं नाही. फार फार तर काही ठराविक काळापर्यंत ही लस तुम्हाला स्वरंक्षण देऊ शकेल. तरीही तुम्ही सावध असलं पाहिजे आणि आत्तापर्यंत जे नियम पाळत आलात ते तसेच पुढेही पाळले पाहिजेत. मास्क, दोन हातांचं अंतर आणि हात वारंवार धुणे या सवयी कायम राहिल्या तरी हिताच्याच आहेत.

ही लस सध्या तरी बाजारात उपलब्ध होणार नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्येच ही लस द्यावी अशी परवानगी मिळालेली आहे. जेव्हा लसीकरणाचं काम सुरु होईल, त्यानंतर ड्रग रेग्युलेटरकडून दर आठवड्याला डेटा काढला जाईल आणि त्याच्या आधारावर पुढची तयारी असेल.
करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली, ही भारतासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की करोनाचं सकंट पूर्णतः शमलं आहे. तेव्हा करोना लसीकरणानंतरही आपणा सर्वांना सुरक्षेच्या सर्व नियमांचं तितक्याच काटेकोरपणानं पालन करायचं आहे. हे नियम आपण पाळू तेव्हाच सर्व मिळून आपण करोनाला हरवू शकू.