गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवा (How To Regai...

गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवा (How To Regain Self-Confidence?)

घरामध्ये वायव्य कोपरा असणं गरजेचं आहे. प्रार्थनेसाठी किंवा ध्यानधारणेसाठी हा कोपरा अतिशय उत्तम असतो. मंत्रोच्चारणासाठी अतिशय वेगाने परिणाम देणारा हा कोपरा आहे. या ठिकाणी दोष निर्माण झाल्यास फेरफार करून गमावलेला आत्मविश्‍वास पुन्हा मिळवता येतो.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एक गृहस्थ स्वतःच्या घरातील परिस्थितीला अतिशय कंटाळलेले होते. अनेकदा आत्महत्येचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला होता. घरात बायकोशी पटत नव्हतं. रोजच्या नवरा-बायकोच्या भांडणात त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाचेही हाल होत होते. स्वतःच्या घरात परक्यासारखी वागणूक मिळत होती. त्यामुळे आयुष्याबाबत सुरक्षितता वाटत नव्हती. स्वतःचा व्यवसाय असूनही तिथे लक्ष लागत नव्हतं. अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी घडत असतानाच एक गोष्ट मात्र त्यांच्याबाबत चांगली घडली, ती म्हणजे त्यांना फेंगशुई शास्त्राची मदत घ्यावीशी वाटली. या गृहस्थांच्या समस्येचं मूळ शोधण्यासाठी त्यांच्या घरी गेलं असता, त्या घरात पाच गोष्टी चुकीच्या आढळल्या.

पाच चुकीच्या गोष्टी
–    पहिली गोष्ट म्हणजे, त्यांच्या फ्लॅटमध्ये वायव्य कोपराच नव्हता. घरामध्ये हा कोपरा नसल्यास घरातील पुरुष अतिशय कमकुवत होतात.
–    दुसरी गोष्ट म्हणजे, या कोपर्‍याचा काही भाग हा स्वयंपाकघरात आला होता. शिवाय त्या ठिकाणी गॅसची शेगडी ठेवली होती. या कोपर्‍यात अग्नितत्व असल्यास, ते घरातील वडिलांना अतिशय धोकादायक असतं. हा कोपरा धातू निर्देशक आहे आणि अग्नी धातू नष्ट करतो. त्या गृहस्थांच्या मनात आत्महत्येचे विचार येण्याचं हेच मुख्य कारण होतं.
–    तिसरी गोष्ट म्हणजे, ते गृहस्थ दिवाणखान्यात जमिनीवर झोपत होते, तेही मुख्य दरवाजाकडे पाय करून. हे एकप्रकारे मृत्यूलाच आमंत्रण होतं. मुख्य दरवाजाकडे कधीही पाय करून झोपू नये. यामुळेच त्यांच्या मानसिक तणावामध्ये आणखी भर पडत होती आणि त्यांना जगण्याचा कंटाळा आला होता.
–    चौथं कारण अगदी उघड होतं. नातेसंबंधाच्या कोपर्‍यात टॉयलेट होतं. त्यामुळे घरातील पुरुषाला वैवाहिक जीवनाचा आनंद मिळत नव्हता.
–    पाचवं कारण म्हणजे, कारकिर्दीचा कोपरा. या कोपर्‍यातील 50 टक्के भाग हा गळलेला होता. कारण त्यांनी दरवाजाच्या मागे चपलांचा रॅक ठेवला होता. ज्यामुळे मुख्य दरवाजा पूर्ण उघडतच नव्हता आणि या कारणामुळे त्यांची कारकीर्दही खुंटली होती.
त्या गृहस्थांचा फेंगशुई शास्त्रावर विश्‍वास असल्याने त्यांना घरामध्ये जे काही फेरबदल करायला सांगितले, ते त्यांनी करून घेतले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आत्मविश्‍वास निर्माण झाला, तसंच फेंगशुई शास्त्राबद्दलचा विश्‍वासही वृद्धिंगत झाला. यावरून आपल्या लक्षात येईल की, आपल्या दैनंदिन जीवनातील लहानमोठ्या समस्या सोडवण्यासाठी आपण फेंगशुई शास्त्राची मदत घेऊ शकतो.

मध्यवर्ती वायव्य कोपरा
या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यवर्ती होता, तो घरातील वायव्य कोपरा. आपण या कोपर्‍याबद्दल अधिक जाणून घेऊया.
–    हा कोपरा धातू तत्त्वाचा निदर्शक आहे. त्याचा क्रमांक 6 असून, रंग पांढरा आहे. हा कोपरा घरातील वडिलांशी निगडीत असतो. या कोपर्‍याची ऊर्जा शांत असते, त्यामुळे प्रार्थनेसाठी किंवा ध्यानधारणेसाठी हा कोपरा अतिशय उत्तम असतो. मंत्रोच्चारणासाठी अतिशय वेगाने परिणाम देणारा हा कोपरा आहे.
–    या कोपर्‍यात अग्नी ठेवणं धोक्याचं असतं. कारण अग्नीमुळे या कोपर्‍यातील धातू वितळतात आणि घराच्या पोशिंद्या व्यक्तीला नुकसान पोहोचतं.
–    या कोपर्‍यात लाकडी फर्निचर किंवा लाकडी वस्तूही ठेवू नये. कारण धातू लाकडाला नियंत्रित करतो. लाकडाच्या अति वापरामुळे धातू ऊर्जा संपून जाईल. ज्यामुळे घरातील वडील नेहमी थकलेले किंवा आजारी राहतात.
–    मोडकी, न चालणारी घड्याळं या कोपर्‍यात ठेवू नका. कोणतीही नादुरुस्त वस्तू इथे ठेवू नका.
–    वन्य प्राण्यांचे पुतळे, चित्रं, लढाईचं चित्र या कोपर्‍यात ठेवणं घातक आहे. तुमचा नवरा किंवा घरातील अन्य पुरुष रागीट, संतापी वा बंडखोर असेल, तर प्रथम हा कोपरा तपासण्याची आणि चुकीच्या वस्तू तिथून हलवण्याची गरज असते.
–    घरात वायव्य कोपरा नसेल, तर तो निर्माण करण्याचा उत्तम उपाय म्हणजे तिथे पाच इंचाचा गोल आरसा लावा. त्यामुळे भिंत विस्तारल्यासारखी वाटते. तुमचा स्वतःचा उद्योग असल्यास तुम्ही या कोपर्‍यात फोन अवश्य ठेवा. तुम्हाला उत्तम परिणाम अनुभवायला मिळतील. टेलिफोन हे मैत्रीचं प्रतीक आहे. त्यामुळे मित्र आणि मदतगारांची संख्या वाढेल.


–    या कोपर्‍यात विविध रंगांची फुलं किंवा फळांची टोपली ठेवून येथील ऊर्जा वृद्धिंगत करता येते. या भागात सहा नळ्यांची धातूची विंड चाईम लावा. उडणार्‍या पक्ष्यांचं चित्र या कोपर्‍यासाठी उत्तम. मात्र ते घराच्या आतील दिशेला उडणारं हवं. दरवाजाच्या दिशेनं उडणारं नको.

–    धातूचं फर्निचर, पुतळे आणि धातूची इतर वस्तू ठेवून या दिशेची ऊर्जा वृद्धिंगत करा आणि या कोपर्‍याचा भरपूर लाभ घ्या.