पावसाळ्यात करोनापासून कसा कराल स्वतःचा बचाव? (H...

पावसाळ्यात करोनापासून कसा कराल स्वतःचा बचाव? (How To Prevent Corona Infection In Rainy Season)

सध्या सर्वजण करोनाशी झुंज देत असतानाच पावसाळा देखील तोंडावर आला आहे. पण ऋतू कोणताही असो आपण सावध असणं किंवा आपली योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे. म्हणून सदर लेखात दिलेल्या टिप्स वापरुन तुम्ही स्वत:चा करोनापासून बचाव करु शकता.
गेल्या वर्षी हिवाळा सुरु असताना करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला, पुढे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात करोनाने भारतात प्रवेश केला. तेव्हा अनेक जणांनी असं मत मांडलं की, भारतात आता उन्हाळा आहे, जास्त उष्णता आहे त्यामुळे करोना जास्त वेळ भारतात टिकणार नाही. मात्र मे महिन्यातच करोनाने भारतभर धुमाकूळ घातला. यंदा आलेल्या करोनाच्या दूसर्‍या लाटेने तर सुरुवातीपासूनच थैमान घातलं आहे, संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात करोना संसर्गाचं प्रमाण वाढेल की काय, अशी भिती व्यक्त करण्यात येतेय. परंतु मागील वर्षाचा अनुभव पाहता करोनावर कोणत्या ऋतूचा प्रभाव पडतो या गैरसमजातून आपण बाहेर पडायला हवं आणि कोणताही ऋतू असला तरी स्वत:ची शक्य तितकी काळजी घ्यायला हवी.


तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची लागण होण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. पहिला आहे डायरेक्ट ट्रान्समिशन. यात करोनाग्रस्त व्यक्ती शिंकली किंवा खोकली आणि त्यावेळी तिच्या जवळ कोणी उभे असेल तर तिच्या शरीरातून बाहेर पडणार्‍या शिंतोड्यांच्या माध्यमातून करोना विषाणू जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होतो. दुसरा मार्ग इनडायरेक्ट ट्रान्समिशन. म्हणजे करोनाग्रस्त व्यक्तीच्या शरीरातून शिंतोड्यांच्या माध्यमातून बाहेर पडलेला विषाणू ज्या पृष्ठभागावर पडतो त्या पृष्ठभागाला इतर कुणी स्पर्श केल्यास पृष्ठभागावरचे विषाणू त्या व्यक्तीच्या हाताला चिकटून त्याद्वारे त्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण होऊ शकते.
दुसर्‍या प्रकारातलं ट्रान्समिशन तापमानावर अवलंबून असतं. डायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये हवामानाचा काही संबंध नसतो. मात्र इनडायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये हवेतल्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू एखाद्या पृष्ठभागावर दीर्घकाळ टिकून राहू शकतो. त्यामुळे त्याची लागण होण्याची शक्यता वाढते. मात्र, याचा अर्थ पावसाळी वातावरणामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढेल असं नाही. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, असे काही पुरावे नसले तरी तो पावसाळ्यात कमी होईल, याचेही पुरावे नाहीत. त्यामुळे काळजी ही घ्यावीच लागणार आहे.
पावसाळ्यामध्ये कोरोना विषाणूला पूरक वातावरण मिळून त्याचा फैलाव वाढेल, अशी शक्यता नसली तरी पावसाळ्यात डोकं वर काढणार्‍या इतर आजारांचं मोठं आव्हान असणार आहे. पावसाळ्यात हवेत दमटपणा वाढतो. त्यामुळे दमा आणि इतर श्वसनाचे आजार बळावतात. अशात जर कोविड -19 ची लागण झाली तर गुंतागुंत अधिक वाढेल आणि म्हणूनच दमा किंवा श्वसनाचे इतर आजार असलेल्यांना पावसाळ्यात विशेष काळजी घ्यायला हवी. औषधं वेळेवर घ्या. फिजिकल डिस्टंसिंग पाळा. विशेषतः घरातल्या वयोवृद्धांनी सर्व ती काळजी घेतली पाहिजे.
पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचं प्रमाण वाढल्याने कॉलरा, जुलाब, कावीळ असे दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढतात. तसंच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू यासारखे साथीचे आजाराही डोकं वर काढतात. मात्र, सध्या कोव्हिड-19 वर सगळ्यांचं लक्ष केंद्रीत आहे. त्यामुळे कोव्हिड-19 व्यतिरिक्तच्या आजारांकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि तसं झालं तर त्यांचीही साथ पसरण्याची मोठी भिती आहे.
एवढंच नव्हे तर मागील वर्षीच्याच अनुभवाप्रमाणे लॉकडाऊन जसजसं उघडेल; तशी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसणार आहे. लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, कामाच्या ठिकाणी एकत्र येतील. मग शारीरिक संपर्क वाढून हा आजार अधिक वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
सध्या सर्वजण करोनाशी झुंज देत असतानाच पावसाळा देखील तोंडावर आला आहे. पण ऋतू कोणताही असो आपण सावध असणं किंवा आपली योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे. म्हणून खाली दिलेल्या टिप्स वापरुन तुम्ही स्वत:चा करोनापासून बचाव करु शकता.

पाणी उकळूनच प्या


पावसाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज भासत नाही. पावसाळ्यात घाम येण्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी स्थिर राहते. मात्र पावसाळ्यात पाणी शुद्ध आणि उकळूनच प्यावे. अशुद्ध पाणी आजारी पाडू शकते. त्यात या करोनाच्या संकटाच्या काळात उकळलेलेच पाणी पिणेच उत्तम!

घराच्या आसपास स्वच्छता ठेवा


स्वच्छता राखणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोरोना विषाणू हा कुठूनही कसाही आपल्यापर्यंत पोहचू शकतो. म्हणूनच केवळ स्वत:ची नाही तर संपूर्ण घराची आणि आसपासच्या परिसराची सुद्धा स्वच्छता राखावी लागणार. जमल्यास सर्व गोष्टी सॅनीटाइझ करा. घराच्या आवारात अडगळ असेल तर योग्य सुरक्षा राखून ती अडगळ साफ करा. आठवड्यातून किमान 2-3 वेळा तरी घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा. असं केल्याने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा बसेल.

योग्य आहार घ्या

पावसाळ्यात आपला आहार पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असायला हवा, जेणेकरून शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढेल. थंड पदार्थ आणि थंड पेये घेणे टाळा, यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमजोर होईल. घरचे सात्विक अन्न खाण्यावर भर द्या. पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे काही काळ बंद करा. यामुळे करोनापासून तर तुमचा बचाव होईलच, पण सोबत अन्य आजारांपासून सुद्धा तुम्ही दूर राहाल.

शक्यतो घरात राहा


पावसाळ्यात करोनाचे विषाणू वाहून जातील आणि आपल्याला त्याचा संसर्ग होणार नाही; आपण बिनधास्त बाहेर फिरू शकू या अविर्भावात राहू नका. उलट या काळात शक्य तितके घरात राहा. तुम्ही घरात जास्त सुरक्षित आहात. पावसाळ्यात वाहत्या पाण्यासोबत अनेक गोष्टी वाहून येतात. या वस्तूंमध्ये, कचर्‍यामध्ये करोना विषाणूचे संक्रमण अडकलेले असू शकते. अशा वस्तूंच्या संपर्कात आल्याने करोनाची बाधा होऊ शकते. म्हणून शक्य असेल तर घरीच राहा. गरज असेल तर स्वत:च्या सुरक्षेची पूर्ण तयारी करूनच बाहेर पडा.