परीक्षेची तयारी अशी करा (How To Prepare Your Ch...

परीक्षेची तयारी अशी करा (How To Prepare Your Child For Exams?)

बोर्ड परीक्षा असोत वा शाळा-कॉलेजच्या, परीक्षा म्हटलं की ताण येतोच. परीक्षेची तयारी करत असताना या ताणामुळेच बरेचदा मुलांचा आत्मविश्‍वास कमी होतो. मात्र योग्य नियोजन करून परीक्षेची तयारी केल्यास आपल्याला अपेक्षित यश मिळवता येतं.
हा  महिना म्हणजे घराघरात परीक्षेचा ज्वर चढलेला असतो. शाळा-कॉलेजातील मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्या असतात. अन् त्यांचं जबरदस्त टेन्शन मुलांना व त्यांच्या पालकांनाही येतं. बोर्डाची परीक्षा असो वा शाळकरी मुलांची, त्याची तयारी करताना बालक आणि पालक दोहोंचीही मोठी कसोटी असते. आपल्या पाल्याला चांगले मार्क्स मिळावेत, अशी तीव्र इच्छा पालकांची असते. कित्येक मुलांचीही असते. मग त्यासाठी काय काय तयारी करावी, याबाबत ह्या काही सूचना आहेत.

सकारात्मक वागा
परीक्षा, त्यातही बोर्डाची परीक्षा असली की मुलं अतिशय तणावाखाली येतात. कित्येक मुलांचा अभ्यास चांगला झाला असतो, पण पेपर्स चांगले लिहिता येतील का? याचं मनावर दडपण असतं. त्यांना एक प्रकारची भीती वाटत असते. काय होईल, कसं होईल; या प्रश्‍नांनी त्यांना ग्रासलं असतं. तेव्हा आधी त्यांच्या मनातील ही भिती दूर करा. तू पासच होणार, तू चांगलेच मार्क्स मिळविणार, असा सकारात्मक विचार त्यांच्या मनात पेरा. मुलांनीही स्वतःच्या मनाची अशीच समजूत घालून दडपण दूर करावं. काही लोक म्हणतील, बोलणं सोपं आहे, पण करणं कठीण. ते मान्य करून हे सांगावसं वाटतं की, अशी अवस्था आलीच तर ध्यानधारणा करायला प्रोत्साहित करा. ध्यानधारणा केल्यास मन शांत होतं. एकाग्रता वाढते. या कृतीने तणाव दूर होतो. अन् सकारात्मक विचार येऊन तशी मनोभूमिका तयार होते.

चांगली जागा निवडा
मुलांना अभ्यासासाठी त्यांची वेगळी खोली असेल तर चांगलेच. पण महानगरातील घरांमध्ये अशी जागा मिळणं कठीण असते. तरीपण घरातील एखाद्या खोलीत मुलांना टेबल-खुर्ची टाकून द्यावी व ती त्यांच्या अभ्यासाची जागा निश्‍चित करावी. तिथे खेळती हवा असावी. निदान तसा प्रयत्न करावा. चांगली प्रकाशयोजना असावी. ती होत नसल्यास टेबल लॅम्प जरूर द्यावा. पलंगावर किंवा सोफ्यावर झोपून अभ्यास करण्याची परवानगी त्यांना देऊ नये. या ठिकाणी अभ्यास करायचा म्हणजे सुस्तीला आमंत्रण. म्हणूनच  टेबल-खुर्ची ही उत्तम व्यवस्था होय. या खोलीत गाणी वाजवू नयेत. टी. व्ही. तर अजिबात असू नये. या गोष्टींचं मुलांनी स्वतःहून पालन करणं तितकंच अगत्याचं आहे.

गॅजेट्स दूर ठेवा
अभ्यासावरून आपलं लक्ष विचलित होऊ नये, म्हणून पुष्कळशी स्कॉलर मुले परीक्षेच्या तयारी दरम्यान टी. व्ही. वरील कार्यक्रम पाहत नाहीत. तेच सर्वांनी आचरणात आणा. टी. व्ही. चे कार्यक्रम आणि रेडिओवरील गाणी ही करमणूक करायला पुढे पुष्कळ वेळ मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा टी.व्ही. सह मोबाईल गेम्स्, सोशल मिडिया यांच्या विळख्यातून बाहेर पडा. अगदीच आवश्यक असेल, मित्रमैत्रिणींशी अभ्यासाबाबत देवाणघेवाण करायची असेल तरच त्यांना हात लावा. त्याचीही एक वेळ ठरवून घ्या. सकाळी किंवा संध्याकाळी अमुक एक वाजताची वेळ आणि कालावधी निश्‍चित करा. त्यामध्ये जास्त वेळ रमायचे नाही, ही खूणगाठ बांधा.

लक्ष्य ठरवा
आपण अभ्यासाला सुरुवात करतो, त्या दिवसापासून परीक्षेच्या तारखेपर्यंत आपल्याकडे किती दिवस आहेत, ते मोजा आणि त्यानुसार टार्गेट सेट करा. एका दिवसात किती अभ्यास करायचा ते आपल्या क्षमतेनुसार ठरवा. उद्या बघू, असं म्हणून आजचं काम उद्यावर अजिबात ढकलू नका. अभ्यासाचं जे लक्ष्य ठरवलं असेल, ते त्या दिवशी पूर्ण करा. अभ्यासाचे धडे वाचून झाल्यावर, त्यावर परीक्षेत विचारले जाणारे प्रश्‍न स्वतःच तयार करा आणि लिहून काढा. कारण पुष्कळदा आपल्या मनाला असे वाटते की, आज अभ्यास खूप झालाय्. लिहून काढल्यावर तो जास्त झालेला नाही, हे लक्षात येतं. हे सर्व टाळण्यासाठीच लक्ष्य ठरवा, ते पूर्ण करा. अन् ते आपण गाठले की नाही, त्याची लिहून खातरजमा करून घ्या.

लक्ष केंद्रित करा
अभ्यास करताना एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करा. आपला जो विषय कच्चा आहे, त्याची तयारी आधी सुरू करा. कारण आपल्याला हा अवघड विषय आहे, तेव्हा नंतर करू या, असं ठरवलं तर त्याबद्दलचे दडपण राहते. वाढत जाते. त्याचबरोबर एका कच्च्या विषयाची भरपाई, दुसरा विषय पक्का करून भरून काढू, असा विचार देखील मनात आणू नका. म्हणजे असं बघा की, तुमचा इंग्रजी हा विषय पक्का आहे नि त्या मानाने गणित हा विषय कच्चा आहे. तर गणिताची भरपाई इंग्रजीने होऊ शकत नाही. गणित कच्चं असेल, तर ते पक्कं करण्यासाठी व्यवस्थित, चिकाटीने अभ्यास करण्याचा चंग बांधा, अन् तो निश्‍चय तडीस न्या.

वेळापत्रक बनवा
आपल्याला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आपलं एक वेळापत्रक तयार करा. प्रत्येक विषयाची दररोज किती वेळात तयारी करायची, ते निर्धारित करा. आपला जो विषय कच्चा आहे, त्याला अर्थातच जास्त वेळ द्या. त्याचबरोबर तुमचा विषय चांगला आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याचा सराव करण्यासाठीही विशिष्ट वेळ राखून ठेवा. हे वेळापत्रक लिहून ठेवा आणि डोळ्यासमोर राहील, असे ठेवा. मात्र त्याचे मनापासून पालन करा. म्हणजे चांगले मार्क्स मिळविणं, अवघड जाणार नाही.

सराव करा
अभ्यासाची पुस्तकं वारंवार वाचा. त्यासाठी वेळ मिळावा म्हणूनच अभ्यास खूप आधीपासून सुरू करा. ऐन वेळेवर केलेल्या अभ्यासाने फारसा फायदा होत नाही. व्यवस्थित वेळापत्रक आखून केलेल्या अभ्यासाने चांगल्या मार्कांचे उद्दिष्ट गाठता येते. म्हणून आपली पुस्तकं वारंवार वाचा. नमुना प्रश्‍नपत्रिका घरीच सोडवा. 3 तासांची प्रश्‍नपत्रिका सोडवण्याचा सराव घरीच करा. असे सराव अधिक झाले तर पेपर सोडवण्याचा आत्मविश्‍वास वाढेल, दडपण कमी होईल. परीक्षेची भीती नष्ट होईल. अन् प्रत्यक्ष परीक्षा देताना तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल.
लिहून काढा
काही मुलांना वारंवार वाचून लक्षात राहत नाही. कारण त्यांची एकाग्रता कमी पडते. अशा मुलांनी रफ वहीवर लिहून काढत अभ्यास करावा. एक तर लिहिल्याने लक्षात राहते. लिहिण्याचा सराव होतो. आपण प्रश्‍नांची उत्तरे किती वेळात लिहू शकतो, याचा अंदाज घेता येतो. अन् मुख्य म्हणजे व्याकरणदेखील सुधारते. नाटकात काम करणारी कित्येक नटमंडळी आपले संवाद वारंवार लिहून काढतात. त्यामुळे पाठांतर चांगले होेते, असा त्यांचा अनुभव आहे. हाच अनुभव लिहिते झाल्याने, अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला येईल.

ब्रेक घ्या
खूप वेळ एकाच जागी बसून राहिल्याने पाय, पाठ, कंबर दुखते. डोळे दुखतात. सुस्ती येऊ शकते अन् शरीराच्या ऊर्जेची पातळी घटते. त्यामुळे तासन् तास अभ्यास करताना ‘ब्रेक’ घेेणे आवश्यक ठरते. अगदी घड्याळ लावून नव्हे, तरी पण साधारणतः तासाभरानं जागेवरून उठा अन् 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. तसेच दर 2 तासांनी 15 ते 20 मिनिटांचा ब्रेक घ्या. या विश्रांतीच्या काळात आपल्या आवडीचे काम करायला हरकत नाही. गाणे ऐकणे, कॅरम खेळणे किंवा घरातील लोकांशी गप्पा मारणे. घरातल्या घरात चालणे अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग एक्सरसाइज आणि श्‍वसनाचे व्यायाम जरूर करा. म्हणजे शरीराला व्यायाम आणि मेंदूला विश्रांती मिळून तरतरी वाटेल. या विश्रांतीच्या काळात मैदानी खेळ, पझल्स् किंवा बुद्धिबळ यांसारखे खेळ अजिबात खेळू नका. यामध्ये मेंदूला पुन्हा काम दिल्यासारखे होईल. मेंदूला विश्रांती द्यायची आहे, हे लक्षात ठेवा.

पुरेशी झोप घ्या
काही विद्यार्थी जाग जाग जागून अभ्यास करतात. किंबहुना अभ्यास हा जागरण करूनच करायचा असतो, अशी त्यांची धारणा झाली असते. म्हणून ते दिवसभर बाकीचे उद्योग करतात किंवा झोपा काढतात. हा रात्रीच्या जागरणाचा परिणाम असतो. तेव्हा दिवसभर मन लावून अभ्यास केल्यास रात्री जागण्याची गरज उरणारी नाही. जागरणाने आरोग्य बिघडते. अ‍ॅसिडिटी, उष्णता वाढते; जी शरीराची हानी करते. तेव्हा जागरण न करता दिवसभर अभ्यास करा. अन् रात्रीची 6 ते 7 तास शांत झोप घ्या.