रेझ्युमे कसा असावा? (How To Prepare Resume?)

रेझ्युमे कसा असावा? (How To Prepare Resume?)

नोकरी शोधताय? मग सगळ्यात पहिली पायरी आहे तुमचा रेझ्युमे. रेझ्युमे व्यवस्थित असेल, तर पुढचं ऑल इज वेलच असणार. तेव्हा रेझ्युमे तयार करण्यापूर्वी या काही गोष्टी नक्की पडताळून पाहा.
तुम्ही उच्च शिक्षित आहात वा एखाद्या मोठ्या कंपनीत काम केल्याचा तुम्हाला अनुभवही आहे, परंतु तुमच्या सीव्हीमध्ये थोडी जरी चूक दिसून आली तर तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरू शकतं. कारण तुम्ही काय शिकलात, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कामाचा अनुभव आहे हे तुमचा सीव्ही वाचल्यानंतर कळणार असतं. तेव्हा सीव्ही आकर्षक असावा एवढंच पुरेसं नाही, तर त्यात व्याकरणाच्या चुकाही नसाव्यात.

स्पेलिंगच्या चुका
बहुतांश व्यक्ती सीव्ही बनवताना स्पेलचेकर वा ट्रान्सलेटर टुलवर अवलंबून राहतात. तुम्हीदेखील असं करत असाल तर लक्षात घ्या, कोणत्याही सॉफ्टवेअर टुल्सवर पूर्णतः अवलंबून न राहता स्वतःचा सीव्ही स्वतः वाचा. किंवा स्वतःबद्दल ठाम विश्‍वास नसेल तर आपल्या मित्रांची वा प्रोफेशनल व्यक्तींची मदत घ्या.

भाषा व फॉन्टची योग्य निवड
रेझ्युमे बनवताना अगदी लहान वा फार मोठ्या साइजचा फॉन्ट निवडू नये. सर्वत्र ती साइज एकसारखी असावी. उगीच नको ते डिटेल्स देऊ नये, वा कोणत्याही माहितीखाली अंडरलाइन करू नये. रेझ्युमेमध्ये कोणत्याही प्रकारची कलाकारी दाखवायची नाही, तर आपली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दर्शवायची आहे. तेव्हा त्यासाठी कोणतीही फ्लॉवरी भाषा वा फॅन्सी फॉन्ट वापरण्याच्या मोहात पडू नका. तसेच फॉन्ट्स बोल्ड वा इटॅलिक करण्याच्याही फंदात पडू नये.

लक्ष देऊन वाचा
कधीही सीव्ही पाठविण्यापूर्वी शांत चित्ताने दोन-तीन वेळा वाचा. काही वेळा रेझ्युमे हा अपडेट केलेला नसतो वा कधीकधी लवकर देण्याच्या गडबडीत खूपच डिटेल्स दिले जातात. काही जण आपल्या मेल बॉक्समधून परस्पर सीव्ही दुसर्‍या ठिकाणी फॉरवर्ड करतात. त्यामुळे मेल रिसिव्ह करणार्‍या व्यक्तीला हे देखील माहीत असते की तुमचा सीव्ही तुम्ही पूर्वी कोठे कोठे पाठवला आहे. शिवाय सीव्हीसोबत ज्याला पाठविला गेला आहे, त्याचे नाव वा त्याला लिहिलेला मजकूर तसाच राहून गेला असेल तर सीव्ही फारसा प्रभावी ठरत नाही. तेव्हा सीव्ही मेल करताना आधीची माहिती तशीच न ठेवता ती अपडेट करा. नीट वाचा. नवीन ठिकाणी सीव्ही पाठविताना गरजेप्रमाणे नवा मजकूर लिहा. आणि सर्व खात्री झाली की मगच पाठवा.

कमीत कमी शब्दात मांडा
रेझ्युमे 3-4 पानांचा असेल तर वाचणारा दमतो. तेव्हा तो दोन पानांपेक्षा जास्त वाढवू नका. अनावश्यक पात्रता आणि माहिती लिहू नका. तुम्ही पत्रकाराच्या जागेसाठी अर्ज करणार आहात आणि तुमचा शिक्षक म्हणून असलेला अनुभव लिहिलात तर फार परिणामकारक ठरणार नाही. सगळ्यात पहिले आपण ज्या पदासाठी अर्ज करत आहोत, त्यासंबंधी काय काय केलं आहे, त्याचा तपशील द्या.
ज्यांच्या करियरची सुरुवात अजून झालेली नाही त्यांनी तसेच ज्या व्यक्तींनी करियर करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनीही प्रथम आपला अत्यंत परिणामकारक असा सीव्ही तयार करून ठेवावा. आणि गरजेनुसार अपडेट ठेवावा. कारण तुम्ही बोलण्याआधी तुमचा सीव्हीच तुमचं निम्मं काम करणार असतो.  ऑल दि बेस्ट!