उटण्यासारखा उत्तम फेस स्क्रब नाही… (How T...

उटण्यासारखा उत्तम फेस स्क्रब नाही… (How To Prepare Homemade Scrub For Diwali Bath)

उटणं हे एक प्रकारचं उत्तम फेस स्क्रब आहे. जे अतिशय साध्या आणि प्रभावी घटकांनी बनवलं जातं. शिवाय उटण्यासाठी लागणारं साहित्य घरात सहज उपलब्ध असतं.
उटण्याचे नाव घेतलं की आपल्या सर्वात पहिले डोळ्यासमोर आणि डोक्यात येते ती म्हणजे त्वचा. उटणं हे अगदी प्राचीन काळापासून वापरण्यात येणारं उत्कृष्ट दर्ज्याचं सौंदर्यप्रसाधन आहे. भारतात दिवाळीला अभ्यंगस्नान करण्यापूर्वी अंगाला उटणे लावण्याची पद्धत आहे.
दिवाळी नेहमी हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवामानातील कोरडेपणा वाढलेला असतो. अशा थंडगार आणि कोरड्या हवेमुळे थंडीत त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. परंतु नियमित उटणं वापरल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येतं. उटणं हे एक प्रकारचं उत्तम फेस स्क्रब आहे. जे अतिशय साध्या आणि प्रभावी घटकांनी बनवलं जातं. शिवाय उटण्यासाठी लागणारं साहित्य घरात सहज उपलब्ध असतं.

घरच्या घरीच उटणं बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बेसन अर्धी वाटी, मसूर डाळीचे पीठ अर्धी वाटी, चंदन पावडर दोन चमचे, मुलतानी माती दोन चमचे, अनंत मूळ पावडर एक चमचा, गव्हला कचरा पावडर एक चमचा, आंबेहळद पाव चमचा, स्वयंपाकातील हळद पाव चमचा आणि दारुहळद पाव चमचा, वाळा पावडर एक चमचा, गुलाबाची पावडर, आवळा पावडर एक चमचा, नागरमोथा पावडर एक चमचा, बावची पावडर एक चमचा, कडुलिंबाची पावडर एक चमचा. यातील जे साहित्य घरात उपलब्ध असेल आणि ज्याची तुम्हाला अॅलर्जी नसेल ते साहित्य उटणं तयार करण्यासाठी घ्यावे.
उटणे अंगाला लावण्याची योग्य पद्धत
सर्व प्रथम कोमट अभ्यंगतेल अथवा शुद्ध नारळाचे तेल संपूर्ण अंगाला लावून त्याने त्वचेवर हळूवार मसाज करा. त्यानंतर अंगाला उटणं लावा. तेल लावल्यामुळे कोरडी त्वचा मऊ होईल आणि उटणं लावल्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होईल.

उटण्याचे फायदे
मिळवा चमकदार त्वचा
उटणं हा एक नैसर्गिक फेसमास्क आहे. ज्यामध्ये अत्यंत गुणकारी घटक आहेत. ह्याचा नियमितपणे वापर केल्यास तुमची त्वचा नेहमी तजेलदार आणि हायड्रेटेड राहते. उटण्यात साधारणतः वापरले जाणारे बेसन, चंदनाची पावडर किंवा चंदन हे त्वचेला मऊ बनवतात. दुधामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेवरील काळे डाग कमी होऊन त्वचा गोरी, डागविरहीत आणि चमकदार होते. 
नितळ त्वचेसाठी
आपल्यापैकी बऱ्याच जणांना असंतुलित त्वचा, पिगमेंटेशन किंवा पिंपल्सचे व्रण अशा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ह्या सगळ्यांवरील एकमेव उपाय म्हणजे उटणं. जे डागविरहीत त्वचा देतं. अन्‌ नियमितपणे उटण्याचा वापर केल्यास त्वचेचे सूर्याच्या किरणांपासूनही संरक्षण होतं. 
तरुण दिसण्यासाठी
हळद हे कोणत्याही जखमेवर अत्यंत गुणकारी घटक असून, उटण्यात ही मुख्यतः याचा वापर होतो. ह्या अत्यंत गुणकारी घटकामध्ये ज्वलनशामक, अॅंटी एजिंग आणि अॅंटी ऑक्सिडेटीव्ह गुणधर्मांमुळे त्वचा अधिक तरुण वाटते.

चेहऱ्यावरील केसांपासून मुक्तता
नियमित आणि कोमल फेशिअल स्क्रबचा उटण्यासकट वापर केल्यास चेहऱ्यावरील नको असलेले केस जाऊ शकतात. चेहऱ्यावरील नकोशा केसापासून सुटका करून घेण्याचा हा अत्यंत कमी खर्चात होणारा गुणकारी उपाय आहे. जुन्या काळात आणि काही ठिकाणी आजही बाळांना विशेष उटण्याने मालीश करण्यात येते, ज्यामुळे त्यांच्या शरीरावरील लव कायमची निघून जाते. 
पिंपल्सपासून मुक्ती
उटणं फक्त तुमच्या त्वचेला मऊ आणि मुलायमच बनवत नाही तर यातील औषधी घटकांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपलसुध्दा कमी होतात. हळद आणि चंदनामध्ये असलेले जंतूविरोधी आणि बुरशीविरोधी घटकांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम कमी होत जातात आणि कोणताही रोगसंसर्गसुद्धा टळतो.
त्वचा सैल पडू देत नाही
चंदनाची पावडर किंवा चंदन हे नैसर्गिक अॅस्ट्रीजंट म्हणून ओळखले जातात. नियमितरित्या वापर केल्यास तुमच्या त्वचेवरील पोर्स कमी होऊन त्वचेला तजेलदार आणि तारुण्यपूर्ण लूक मिळतो.
तर मग या दिवाळीला घरीच उटणं बनवून अभ्यंगस्नान करणार ना?