प्रसूती सामान्य होण्यासाठी… (How To Prepa...

प्रसूती सामान्य होण्यासाठी… (How To Prepare For Normal Delivery?)

माझी वहिनी सात महिन्यांची गर्भवती आहे. तिची प्रसूती सामान्य व्हावी, यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत?
प्रसूती सामान्य होणं, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं आणि त्यातील बर्‍याच गोष्टी आपल्या हातात नसतात. उदाहरणार्थ, बाळाची स्थिती, वारेची स्थिती, स्त्रीची शरीर रचना, गर्भारपणातील गुंतागुंत, प्रसूतीदरम्यान होणारी गुंतागुंत इत्यादी. तरीही गर्भार स्त्रीने आपलं आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करावा. आहारविहारावर नियंत्रण ठेवावं, जेणेकरून रक्तदाब, मधुमेह इत्यादी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. तसंच सुलभ प्रसूतीसाठी उपयुक्त ठरणारी योगासनं आणि इतर शारीरिक व्यायाम, श्‍वसनाचे व्यायाम, प्राणायाम इत्यादी नियमित करा. या सर्वांमुळे सामान्य प्रसूती होण्यास नक्कीच मदत होईल.

माझ्या मामीची प्रसूती होऊन 10 वर्षं झाली. तिला प्रसूतीनंतर खूप रक्तस्राव झाला होता. तिला चार-पाच बाटल्या रक्त द्यावं लागलं होतं. त्यानंतर तिची पाळी आलीच नाही. असं होऊ शकतं का?
प्रसूतीनंतर स्वाभाविक पेक्षा जास्त रक्तस्राव होणं, याला ‘पोस्टपार्टम हिमरेज‘ असं म्हणतात. यामुळे स्त्रीचा रक्तदाब खूप कमी होऊ शकतो. त्यामुळे पियूषिका ग्रंथीला होणार्‍या रक्त पुरवठ्यात अधिक प्रमाणात घट होऊन, तिचं कार्य बिघडू शकतं. याला ‘शीहॅन्स सिंड्रोम’ असं म्हणतात. यामुळे मासिक पाळीवर परिणाम होऊन, ती बंदही होऊ शकते.

माझ्या मैत्रिणीचं नुकतंच लग्न झालं आहे. काहीच महिन्यात तिला नको असताना गर्भधारणा झाली आहे. तिला आता गर्भपात करायचा आहे. हे योग्य आहे का?
गर्भधारणा नको असल्यास ती टाळण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्व जोडप्यांनी ती वापरावीत. कारण नको असणारी गर्भधारणा टाळणं सर्वांत उत्तम. गर्भपात म्हणजे ‘भ्रूणहत्या’. ती काही गंभीर कारण असल्याशिवाय (उदाहरणार्थ, मातेच्या आरोग्यास धोका इत्यादी) करणं अयोग्य आहे.

वारंवार गर्भपात करण्यामुळे स्त्रीच्या आरोग्याला काही धोका असतो का?
­­वारंवार गर्भपात करण्याने स्त्रीच्या आरोग्यास नक्कीच हानी पोहोचते. गर्भाशयामध्ये जंतुसंसर्ग होऊ शकतो. गर्भनलिका बंद होऊ शकतात. गर्भाशयाला इजा होऊ शकते. गर्भाशयाच्या आतील आवरणास इजा पोहोचून, तिथे अनेक बंध निर्माण होऊन गर्भाशयाची पोकळी बंद होऊ शकते. त्याला ‘अ‍ॅशरमन सिंड्रोम’ असं म्हणतात. या सर्व कारणांमुळे पुढे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होऊ शकते.