नोकरीसाठी मुलाखत देताना (How to Prepare for Job...

नोकरीसाठी मुलाखत देताना (How to Prepare for Job Interview?)

नोकरीविषयक मुलाखत देताना उमेदवाराला स्वतःची योग्यता दाखवून द्यायची असते. त्यासाठी त्याची देहबोली, भाषा, संवादकौशल्य, विचारातील स्पष्टता, आत्मविश्‍वास या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
नोकरीसाठी मुलाखत म्हटलं की एक प्रकारचं दडपण मनावर उगाचच येतं. ही एक वेगळीच परीक्षा असते. अनोळखी लोकांशी आपल्याला संवाद साधायचा असतो. उमेदवाराची कठीण परीक्षा घेण्यापेक्षा रिक्त जागेकरिता सर्वांत चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी मुलाखत कर्त्यावर असते. म्हणूनच उमेदवारास मुलाखतीत बहुदा स्वतःबद्दल बोलावं लागतं. थोडक्यात त्या जागेकरिता ‘आपणच कसे योग्य आणि उपयुक्त आहोत’ हे कळत नकळतपणे दाखवून द्यायचं असतं. 
अजूनपर्यंत समोरासमोर बातचीत करून मुलाखती होत असत. त्यात आता काही नव्या पद्धतींचा अंतर्भाव झाला आहे. फोन इंटरव्ह्यू आणि डिनर इंटरव्ह्यू असे दोन नवे प्रकार उदयाला आले आहेत. या नव्या इंटरव्ह्यूमध्ये केवळ एकाच व्यक्तीचा नव्हे, तर गटाचाही इंटरव्ह्यू एकत्र घेतला जातो. त्यातून केवळ ज्ञान आणि कौशल्यच नव्हे, तर आपलं वागणं आणि शिष्टाचार यांचीही परीक्षा घेतली जात असते.

डिनर इंटरव्ह्यू
नोकरीसाठी एखाद्या उमेदवाराचं त्याच्या क्षेत्रातलं ज्ञान आवश्यक असतंच, शिवाय त्याचा चाणाक्षपणा, लवचिकता, इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती, भावनिक सक्षमता या बाबीही तपासल्या जातात. त्याच्या वागण्या-बोलण्यामध्ये जर शिष्टाचाराचा अभाव असेल, तर तो कंपनीसाठी फारसा उपयुक्त ठरत नाही. कंपनी या शिष्टाचारालाही खूप महत्त्व देत असते. त्यामुळे आपल्यावर कधीही डायनिंग इंटरव्ह्यूची वेळ येऊ शकेल याचा विचार करून टेबल मॅनर्सही आत्मसात केले पाहिजेत. डायनिंग इंटरव्ह्यूमध्ये एकाच वेळी अनेक उमेदवारांना सहभागी केलेलं असतं. त्यामुळे उमेदवाराच्या मनावरचा ताण थोडा कमी झालेला असतो.

फोन इंटरव्ह्यू
हल्ली फोन इंटरव्ह्यू हा एक नवा प्रकार पुढे आला आहे.  मुलाखतीच्या या प्रकारामुळे उमेदवाराचा आणि कंपनीचा वेळ वाचावा हा हेतू असतो. यामध्ये नेमके प्रश्‍न विचारले जात असतात. अर्थात, ज्या गोष्टी विचारण्यासाठी समोरासमोर येण्याची गरज नाही अशा गोष्टी. उदाहरणार्थ- वय, आधीचा अनुभव, पगाराची अपेक्षा, बॉण्ड द्यायला तयार आहे की नाही, असे औपचारिक प्रश्‍न फोनवरून विचारले जातात. तेव्हा फोन इंटरव्ह्यूचं एक वेगळंच तंत्र निर्माण होतं. यात फोनवरून बोलताना काही तांत्रिक अडचणी आल्या, तर संवाद अर्धवट राहण्याची शक्यता असते. अशा वेळी आपलं बोलणं पुरेसं स्पष्ट असलं पाहिजे.

मुलाखत देताना…
–     उत्तम आत्मविश्‍वास असावा लागतो.
–     आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे, तसंच वर्तन केलेलं योग्य असतं. यामुळे मुलाखतही सहजतेने होते.
–     उमेदवाराला, त्यानं ज्या कामासाठी अर्ज केला आहे, त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत, हे पटवून देता आलं पाहिजे.
–     मुलाखतीत संभ्रमित करणारे प्रश्‍न येऊ शकतात. कोणत्याही प्रश्‍नांची उत्तरं किती शांतपणे आणि विचारपूर्वक देतो, त्यावर उमेदवाराची हुशारी दिसून येते.
– उमेदवाराचा स्वभाव आणि एकंदरीत वागण्याची पद्धत यांचं निरीक्षण मुलाखत घेणारा करत असतो. म्हणूनच मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी अशी तयारी करा.
–    आरशासमोर उभं राहून स्वतःबद्दल सांगण्याची तयारी करा. हे वारंवार करून त्यात नैसर्गिकता आणा.

–  हसरा चेहरा महत्त्वाचा असतो. चेहर्‍यावर प्रसन्नता असू द्या. हसर्‍या चेहर्‍याची सवय करा.
–  मुलाखतीसाठी जाताना तुम्हाला उठाव देणारा योग्य व्यावसायिक पेहराव असावा.
–     ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे, असाच विचार करा.
–  मुलाखतीच्या ठिकाणी जाणवणार्‍या गंभीर वातावरणामुळे भांबावून जाऊ नका. निवांत राहण्याचा प्रयत्न करा.
–  तुमच्या अवगत कौशल्यांबाबत सांगताना उत्साहानं त्यामध्ये केलेलं कार्य सांगा. उदाहरणं द्या.
–     मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
–     मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्तानं प्रश्‍नांची उत्तरं द्या.
–     प्रश्‍न न समजल्यास विनयानं परत विचारा, यात काही चुकीचं नाही.
–     मुलाखत कर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल, याची काळजी घ्या.
–     मुलाखतीनंतर विनम्रतेनं आभार माना.

स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्याकरिता स्वतःचं वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःचा बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिटे वेळोवेळी वर्तमान करत राहणं गरजेचं असतं.