टोमॅटो फेशियल कसं करतात? (How To Make Tomato Fa...

टोमॅटो फेशियल कसं करतात? (How To Make Tomato Facial)


बिकनी एरिया व्हॅक्स करण्याची योग्य पद्धत काय आहे? या भागात घरातल्या घरातच सामान्य व्हॅक्सही करता येईल का?

 • तेजश्री दातखिळे, पुणे
  बिकनी एरिया व्हॅक्स करून स्वच्छ राखता येतो. व्हॅक्स व्यतिरिक्त हेअर रिमूव्हिंग क्रीम किंवा रेझरचा वापर करूनही या भागातील अनावश्यक केसांपासून सुटका करून घेता येते. व्हॅक्सिंगचा फायदा म्हणजे, त्यामुळे केसांची वाढ कमी होते. मात्र बिकनी एरियाचं व्हॅक्सिंग करण्यासाठी दुसर्‍याची मदत घ्यावी लागते. ते स्वतःचं स्वतः करता येत नाही. बिकनी व्हॅक्सिंग घरच्या घरी करायचं असल्यास, अनुभव असलेल्या अशा एखाद्या ब्युटिशियनचीच मदत घेणं योग्य ठरतं.
 • त्वचेसाठी ताज्या फळांच्या किंवा भाज्यांच्या गराचा वापर करून केलेली फेशियल्स उत्तम परिणाम देतात, असं म्हणतात. त्यातही टोमॅटो फेशियल त्वचेसाठी अतिशय चांगलं असतं, असं ऐकलं आहे. कृपया टोमॅटो फेशियल कसं करतात, हे सांगाल का?
 • सायली कोरे, अलिबाग
  ताजी फळं किंवा भाज्या यांच्या गराचा वापर करून तयार केलेली नैसर्गिक फेशियल्स त्वचेवर उत्तम परिणाम देतात हे खरंच आहे. मुख्य म्हणजे, अशा नैसर्गिक फेशियल्सचे कोणतेही दुष्परिणाम नसतात. त्यामुळे विनाचिंता त्यांचा वापर करता येतो. तर टोमॅटो फेशियल करण्यासाठी, 2 चमचे टोमॅटोचा गर, 1 चमचा मध आणि 1 चमचा साखर एकत्र करून घ्या. या मिश्रणाने चेहर्‍यावर 5 मिनिटं हलका मसाज करावा आणि नंतर चेहरा धुऊन घ्या. चेहर्‍यावर वाफारा देऊ नका. आता टोमॅटो गरामध्ये 1 चमचा बदाम तेल घालून एकजीव मिश्रण तयार करा. या मिश्रणाने चेहर्‍यावर 20 मिनिटं मसाज करा आणि नंतर चेहरा पुसून घ्या. यानंतर चेहर्‍यावर चंदन पॅक लावून, 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा.
 • माझं कपाळ मोठं असून, केस सरळ आणि मध्यम लांबीचे आहेत. मला कोणता हेअर कट शोभून दिसेल?
 • विनया कुलकर्णी, रत्नागिरी
  तुमच्या चेहर्‍याला समोरून कपाळावर आलेले फ्रिंज किंवा वन साइडेड फ्लिक्स शोभून दिसतील. हेअर कट शॉर्ट किंवा लाँग हवा तसा करण्यास हरकत नाही; फक्त स्टेप कट करू नका. ते सोडून तुम्हाला कोणताही हेअर कट शोभून दिसेल.
 • मेकअप करताना, चेहर्‍यावर ग्लो येण्यासाठी काय करू?
 • करुणा परब, सोलापूर
  थंडीचे दिवस असल्यामुळे मेकअप करण्यापूर्वी चेहर्‍यावर मॉइश्‍चरायझर लावणं आवश्यक असतं. मात्र या दिवसांत मेकअपपूर्वी पॅन केक लावणं टाळा!