राहो अभंग नातं… (How To Maintain Family B...

राहो अभंग नातं… (How To Maintain Family Bonding?)

नाती टिकली, तरच जीवनात आनंदीआनंद राहील. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून नातीगोती कशी टिकवाल, त्याविषयी-

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नातेसंबंध सांभाळायला वेळ नाही, अशी तक्रार आपण करतो. त्यामुळे नाती बिघडतात, संबंध दुरावतात. हे टाळण्यासाठी वेळात वेळ काढून नातीगोती कशी टिकवाल, ते पाहूया. कारण नाती टिकली, तरच जीवनात आनंदीआनंद राहील.

चाय पे चर्चा
हा सध्या परवलीचा शब्द आहे. पण तो हसण्यावरी नेण्यासारखा नाही. खरोखरच या ‘चाय पे चर्चा’ने दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते आणि नात्यांना वळणही लागू शकतं. घरातील प्रत्येकाच्या कामाच्या वेळा कदाचित वेगळ्या असू शकतील, प्रत्येकाचं दैनंदिन वेळापत्रक वेगवेगळं असू शकेल; परंतु कुटुंबातील सर्वांची सकाळची सुरुवात मात्र एकत्र व्हायला हवी. त्यासाठी घरातील सर्व लोकांनी सकाळचा चहा एकत्र घेण्याची सवय, शिस्त लावून घ्या. सकाळी चहा पिता पिता आपल्या योजना, कामाची आखणी, महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार, या विषयांवर चर्चा होऊन जाऊ द्या. दिवसभराच्या आपल्या कामाची रूपरेषा, भविष्यातील कार्यक्रमाचं नियोजन (सहल, लग्नसमारंभ, नातेवाइकांच्या भेटीगाठी) यावर चर्चा करता येईल. एकमताने सहमती मिळवता येईल.

संपर्कात राहा
मोबाईल फोनमुळे जग छोटं झालं आहे. त्याचे फायदे खूप आहेत. अन् तोटेही आहेत. उठसूठ फोन करून ‘कुठे आहेस?’, ‘काय करतेस?’, ‘जेवण झालं का?’ असे प्रश्‍न विचारण्यापेक्षा महत्त्वाच्या कामासाठी एकमेकांशी संपर्क साधा. कधी कधी नवरा किंवा बायको किंवा घरातील अन्य कुणी खूप कामात असतात, अशा वेळी आपण निरर्थक प्रश्‍न विचारले की, ती व्यक्ती चिडते. मग आपल्यालाही राग येतो. या गोष्टी टाळण्यासाठी असे कॉल टाळा. मात्र दिवसातून एकदा तरी आपल्या प्रिय व्यक्तीशी फोनवरून जरूर संवाद साधा. त्यासाठी संगनमताने वेळ निश्‍चित करून घ्या. हा संवाद खूप मोठा, समोरच्या व्यक्तीला अडचणीत आणणारा नसेल, याचं भान ठेवा. थोडक्यात आणि महत्त्वाचं तेच बोला.

वाटणी करा
आपल्याकडे दोन प्रकारची कुटुंब आढळतात. छोटे परिवार आणि जॉइंट फॅमिली. या दोन्ही प्रकारात सर्वसाधारणपणे, कामांचा भार जास्त करून बाईमाणसावर पडतो. हे टाळून, कामाची वाटणी करून घ्या. कामं सगळ्यांनाच असतात. अन् वेळही कमी पडतो. तेव्हा कामाची वाटणी करून घेतली, तर सगळ्यांच्याच हाताला काम आणि मनाला आराम मिळेल. अंथरूण-पांघरूण आवरण्यापासून मुलांना शाळेच्या बसपर्यंत किंवा शाळेत सोडण्याची कामं घरातल्यांनी वाटून घ्यायला हवीत. भाजी आणणं, चिरून देणं, वॉशिंग मशीन लावणं, कपडे सुकायला टाकणं अशी लहानमोठी कामं आपापसात वाटून घ्या. सुट्टीच्या दिवशी तर पुरुष मंडळींनी स्वयंपाकातही मदत करावी. या वाटणीमुळे प्रत्येकाचा कामाचा भार हलका होतोच; पण एकमेकांविषयी प्रेम, आदरभावही वाढीस लागेल.

दिवस राखून ठेवा
स्पर्धेच्या या युगात कामाच्या वेळा निश्‍चित नाहीत. नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा स्वतंत्र उद्योग करणारी असो, घरी उशिरानेच येणं होतं. फार कमी उद्योगी माणसं वेळेत घरी पोहोचत असतील. ते सुदैवी. ‘फॅमिली लाइफ राहिलंच नाही,’ अशी उशिरा रात्री घरी परतणार्‍यांची कुरबुर असते. त्याची भरपाई करा. आठवड्यातून किमान दोन दिवस तरी कुटुंबासाठी राखून ठेवा. दोन अगदीच शक्य नसतील, तर एक दिवस नक्कीच राखून ठेवा. त्या दिवशी एकत्र राहा, एकत्र हिंडा, एकत्र जेवा आणि एकत्र बसून (आठवडाभरात झाले असतील तर) रुसवे-फुगवे दूर करा. त्या दिवशी टीव्हीचा रिमोट कंट्रोल लपवून ठेवा. टीव्ही पाहायचाच असेल तर सर्व एकत्र बसून, सर्वांना आवडेल असं काहीतरी पाहा. शक्य तेवढा फोनही टाळा. मग बघा, नात्यांची वीण कशी घट्ट राहील.

नाटक-सिनेमा पाहा
कोणी काहीही म्हणोत, परंतु नाटक-सिनेमासारखी उत्तम करमणूक नाही. कौटुंबिक चित्रपटांपेक्षा अ‍ॅक्शन, कॉमेडी हिंदी चित्रपट आवडणार्‍यांची संख्या जास्त आहे. अलीकडे तर वेगळी, चांगली कथावस्तू असलेले चित्रपट येत आहेत. ते पाहून मनोरंजन होतं. ताणतणाव दूर होतो. तेव्हा कुटुंबासाठी राखून ठेवलेल्या दिवसात चांगला, मनोरंजक चित्रपट अवश्य पाहा. मनोरंजक चित्रपटाच्या कथावस्तूशी, पात्रांशी समरस होण्याची मजा काही औरच असते. शिवाय जगभरातील प्रेक्षणीय स्थळं त्यामधून पाहायला मिळतात. आपला मराठी चित्रपट तर आता बॉलिवूडला जोरदार टक्कर देत आहे. विषयाची विविधता असलेले आणि करमणूकप्रधान असे दोन्ही प्रकारचे मराठी चित्रपट दर महिन्याला प्रदर्शित होत आहेत. त्यांचा आस्वाद घ्या.
नाटक हे तर मराठी माणसाचं पहिलं वेड आहे. मराठी नाटकातही नवनवीन विषय हाताळले जात आहेत. प्रयोग होत आहेत. त्यांचा सर्व कुटुंबासह आस्वाद घ्या. मनोरंजनाची मौज मिळवा. अन् तणावमुक्त राहा. कुटुंबास आनंदी ठेवा. सर्व नाती मधुर होऊन जातील.

खेळ खेळा
डिजिटल तंत्रज्ञानाने आबालवृद्धांना वेड लावलंय. तासन्तास त्या उपकरणांशी खेळ खेळण्यात ते रंगून जातात. या नादापायी लहान मुलं आणि तरुण पिढीही मैदानी खेळांना मुकली आहे. मैदानीच नव्हे, तर हल्ली मुलं बैठे खेळही खेळताना दिसत नाहीत. खेळत असलेच तर त्याचं प्रमाण अल्प आहे. जुन्या जमान्यात जेव्हा टेलिव्हिजन नव्हता, तेव्हा मुलं आणि मोठी माणसंही खेळात दंग व्हायची. आता त्यांच्या मित्रपरिवारास खेळामध्ये रस राहिला नसल्यामुळे त्यांच्यात मरगळ आली आहे. आपण यावर मात करावी. कुटुंबासाठी राखून ठेवलेल्या दिवसात मैदानी खेळांसाठी मैदानावर उतरावं. अगदीच नाही तर बॅडमिंटन, टेबल टेनिस, लगोरी, यांसारखे चौकोनी कुटुंबास योग्य असे खेळ जरूर खेळावेत. मैदानावर जाणं शक्य नसेल तर घरात कॅरम, पत्ते, लुडो असे खेळ जरूर खेळावेत. असे खेळ खेळल्याने मन रमतं. एकमेकांमध्ये मिळून मिसळून वागण्याची सवय लागते. एकोपा निर्माण होतो. ईर्षा जागृत राहते.
आपण किंवा आपल्यापैकी कुणी योगा क्लासला जात असेल, जिममध्ये जाऊन वर्कआऊट करत असेल किंवा एरोबिक्स क्लासला जात असेल, तर त्यांना उत्तेजन द्या. त्यांच्यासोबत त्या क्लासला जा. अन् व्यायामाने आपलंही आरोग्य उत्तम राखा. खेळ, व्यायामाचा आनंद एकत्रपणे घेतल्याने नातीगोती खेळकर राहतील.