ऑफिसात काम करताना पाळा हे रीतिरिवाज (How To Mai...

ऑफिसात काम करताना पाळा हे रीतिरिवाज (How To Maintain Etiquette At The Work Place)

सध्याचं युग स्पर्धेचं आहे. त्यामुळे ऑफिसात काम करताना आपण स्पर्धेत नकळत ओढले जातो. अन् आपल्या सहकार्‍यांपेक्षा जास्त वेगाने पुढे जाण्याची मानसिकता तयार होते. त्यातून मग हेवेदावे, मत्सर निर्माण होतात. श्रेष्ठत्त्व सिद्ध करण्याची वृत्ती फोफावते. या गोष्टी आपल्या करिअरच्या दृष्टीने चांगल्या नाहीत. त्या टाळून आपली प्रगती कशी साधावी, याचा डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी काम करताना काही रीतिरिवाज (Maintain Etiquette) पाळणे तितकेच आवश्यक ठरते.


वक्तशीर असावे
मुंबईसारख्या महानगरात ट्रॅफीकची समस्या असते. लोकल ट्रेन वर अवलंबून असणार्‍या चाकरमान्यांना गर्दीचा, रेटारेटीचा सामना करावा लागतो. तर अन्य शहरांमध्ये लोकलच्या समस्या नसल्या तरी ट्रॅफीक जामची समस्या असते. त्यामुळे ऑफिसात वेळेवर पोहचण्यास अडचण असते खरी. पण काही लोकांना घरीच टाइम पास करण्याची सवय असते. आळस अंगात असतो. त्यामुळे घरून निघतानाच उशीर होतो. हा आळस, वेळकाढूपणा अंगवळणी पडल्याने असे लोक ऑफिसात नेहमीच उशीरा पोहचतात. आपणही अशांपैकी एक लेट लतीफ असाल तर यावर मात करा. कारण नेहमीच उशीरा येणार्‍याकडे बॉसचे, एच आर प्रमुखाचे लक्ष असते. अन् जो वक्तशीर नसतो, त्याला प्रमोशन व इतर उन्नतीमध्ये डावलले जाते. तेव्हा ट्रॅफीक व अन्य समस्या येणारच, हे गृहित धरून वेळेआधीच घरून निघावे. कारण उशीराने ऑफिसात गेल्याने कामावर परिणाम होतो. हाती असलेले काम वेळेत पूर्ण होत नाही.

सारख्या रजा नको
ऑफिसात नित्यनेमाने उशीरा येणार्‍या कर्मचार्‍याचे नाव बदनाम असते. त्याचप्रमाणे एकसारख्या रजा घेणार्‍याचे पण नाव तेवढेच बदनाम असते. लहानसहान कारणावरून रजा घेणार्‍याकडे वरिष्ठांची वक्रदृष्टी असते. शिवाय त्याच्या कामावर, उत्पादकतेवर आणि करिअरवर एकूणच परिणाम दिसतो. कारण वारंवार रजा घेतल्याने कामे पेन्डिन्ग राहतात. तो कर्मचारी वरिष्ठांचा, सहकार्‍यांचा विश्वास गमावून बसतो. तेव्हा प्रत्येकाने योग्य त्या कारणासाठीच रजा घ्याव्यात व आपली ऑफिसात पत राखावी. रजा संपविण्याच्या हेतुने त्या घेऊ नयेत.


घाईगर्दी टाळा
चहा आणि लंच घेण्यासाठी ऑफिसने वेळेचे बंधन घालून दिलेले असते. पण काही लोक त्या वेळेपेक्षा जास्त काळ चहा-जेवण घेतात. आपण कार्यक्षम आहोत, आपला बॉस मवाळ आहे किंवा तो काही बोलणार नाही, म्हणून असे काही लोक नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ या कामात खर्ची करतात. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या व त्यांच्यावर अवलंबून असणार्‍याच्या कामावर परिणाम होतो. अन् मग हाती असलेले काम संपविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ते झटत राहतात. घाईगर्दीने काम उरकतात. त्याच्याने कामाच्या दर्जावर परिणाम होतोच. शिवाय शेवटच्या क्षणापर्यंत खटपट करावी लागल्याने, मनावर-शरीरावर दडपण येते, ते वेगळेच. तेव्हा ही घाईगर्दी टाळा. शिस्त पालन करा.

उखाळ्यापाखाळ्या नको
काही मंडळी कामाच्या वेळात जास्त गप्पा मारतात. एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढतात. त्यांना जो सहकारी आवडत नाही, त्याच्या चुगल्या करतात. यामुळे काम बाजूला राहते, अन् गप्पा रंगतात. त्यात स्वत: व त्यात भाग घेणार्‍या सहकार्‍याचा पण वेळ वाया जातो. अन् काम पेन्डिन्ग राहते. या गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घालून तुमचे नाव खराब करणारे व आपण कसे चांगले आहोत, अशी छाप मारणारे चुगलखोर असतातच, हे लक्षात घ्या. अन् कार्यालयीन वेळात, असे गप्पांचे फड रंगविणे बंद करा.

नव्या कल्पना राबवा
करिअरमध्ये तुमची प्रगती ही कार्यक्षमता आणि कल्पकता यांच्यावर अवलंबून असते. कामामध्ये नव्या कल्पना रुजू केल्या तर स्वतःची व ऑफिसची प्रगती होते. त्यासाठी मन शुद्ध, गतिमान हवं. गॉसिप करून, कामात टाळाटाळ करून, जास्त रजा घेऊन, शिस्त मोडून मन गंजतं. कल्पना सुचत नाहीत. कामाच्या पाट्या टाकणे, ही प्रवृत्ती फोफोवते. ह्या सर्व गोष्टी टाळा; अन् स्वतःची प्रगती, उन्नती करा. म्हणजे आवश्यक ते लक्ष्य गाठता येईल.