ब्रह्मतत्त्व म्हणजे घराचे हृदय (How To Locate B...

ब्रह्मतत्त्व म्हणजे घराचे हृदय (How To Locate Brahmatatva Of Your House According To Fengshui?)

लवकरच आम्ही भाड्याच्या घरात राहायला जाणार आहोत. तेथील वन रुम किचनमध्ये ब्रह्मतत्त्व कोठे आहे हे कसे ओळखावे? याबाबत माहिती द्याल का?
– करुणा, चिपळूण
फ्लॅटच्या ब्ल्यू प्रिंट नकाशावर बरोबर चौकोन किंवा आयताकार (जशी फ्लॅटची रचना असेल) रेघ ओढून घ्यावी. त्याचा बरोबर मध्य काढून घ्यावा. जिथे मध्य येईल ती जागा आपल्या फ्लॅटमध्ये कोठे येते ते पाहावे. हे मध्य म्हणजेच ब्रह्मतत्त्व होय. लक्षात ठेवा, ब्रह्मतत्त्वावर कुठलीही जड वस्तू किंवा भिंत असू नये. कारण ब्रह्मतत्त्व घराचे हृदय समजले जाते. तेथे वस्तू ठेवल्या असतील तर त्या त्वरित हलवाव्यात. भिंत असल्यास त्याला खालून 3 फूट बाय 3 फूट तोडून ब्रह्मतत्त्वाची जागा मोकळी करावी.

आमच्या घरात सतत कोणी ना कोणीतरी आजारी असतं. त्यामुळे घरात सतत तणावाचं वातावरण असतं. घरात आनंद, सुख-समृद्धी टिकून राहण्यासाठी काही उपाय सुचवावे.
– प्रगती, सोलापूर
घरातील नातेसंबंधाची दिशा म्हणजे नैऋत्य दिशेत काही दोष आढळल्यास आपल्याला अशा गोष्टींचा त्रास जाणवू शकतो. तुमच्या घरात नैऋत्य दिशेचा कोपरा कापला गेला असावा. त्यासाठी नैऋत्य दिशेत जमिनीत बफर पिरॅमिड घालावे. ज्यामुळे हा दोष काढून टाकण्यात येईल. तसेच माती तत्त्वाच्या वस्तू या भागात ठेवाव्यात. घरात आनंद, सुख-समृद्धी टिकून राहण्यासाठी कुटुंबातील सर्वांचा एकत्रित असा हसरा फोटोग्राफ नैऋत्य दिशेला लावावा. त्यावर दोन रोझ क्वार्टझ पेंडंट टांगा.

मुलांच्या शिक्षणात, नोकरीत आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतीसाठी काय करता येईल?
–  नयना, कल्याण
घरातील ईशान्य दिशेला शिक्षणाचा मनोरा, पृथ्वीचा गोल तसेच आठ क्रिस्टल बॉल्स टांगून ठेवावे. यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती होते. नोकरीत नवीन संधी चालून येतात तसेच आर्थिक प्रगतीही होते.

मागील दीड वर्षापासून मला व माझ्या पतींना आर्थिक व आरोग्य विषयक तक्रारींना सामना करावा लागतोय. तसेच दोघांनाही मनासारखी नोकरीही मिळत नाही. आमचा वन बीएचके फ्लॅट आहे. मात्र या घरात आल्यापासून कोणत्याही नवीन कामात यश नाही. शिवाय घरात आनंदी, उत्साही वातावरणही नाही. सर्वकाही सुरळीत होण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.
– उषा, मालवण
तुमच्या घराबाबतच्या एवढ्या सार्‍या तक्रारी पाहता तुमचे नवीन घर (त्याचे मुख्य द्वार) तुमच्या कुआ नंबरप्रमाणे चांगल्या दिशेला नसावे. तसेच घरातील इतर दिशा व कोपर्‍यांमध्ये सुद्धा दोष असू शकतात. तेव्हा चांगल्या वास्तुतज्ज्ञांना घर दाखवून घ्यावे. व्यवस्थित तपासणीनंतर तुम्हाला योग्य उपाय सुचविले जातील व योग्य सल्ला व मार्गदर्शनही मिळेल.