किडनीची व्यवस्थित काळजी घ्या (How To Keep Your ...

किडनीची व्यवस्थित काळजी घ्या (How To Keep Your Kidneys In Order?)


आपण व्यक्तीशः हृदय, पोट, मेंदू, दात या अवयवांची जेवढी काळजी घेतो, तेवढी काळजी किडनीची घेत नाही. कारण या महत्त्वाच्या अवयवाबाबत आपले असलेले अज्ञान. परंतु लक्षात घ्या की किडनीचे कार्य बिघडले, तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? अन् त्यांची काळजी घ्या.
आपल्या शरीरात 2 किडनी अर्थात् मूत्रपिंडं असतात. हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. म्हणूनच कोणत्याही लहानमोठ्या आजारपणात डॉक्टर्स या किडनीची टेस्ट करायला लावतात. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपण व्यक्तीशः हृदय, पोट, मेंदू, दात या अवयवांची जेवढी काळजी घेतो, तेवढी काळजी किडनीची घेत नाही. कारण या महत्त्वाच्या अवयवाबाबत आपले असलेले अज्ञान. आपल्या शरीरातील रोजच्या क्रिया नियंत्रित करणार्‍या या किडनी आहेत.
घेवड्याच्या किंवा कॉफी बियांचा आकार या किडनीला असतो. त्यांचं प्रत्येकी वजन 135 ते 150 ग्रॅम इतकं भरतं. प्रत्येक किडनीत नेफ्रॉन्स नावाचे लाखो फिल्टर्सचे जाळे असते. हृदयाकडे रक्त पाठविण्यापूर्वी या फिल्टर्सनी ते गाळले जाते. रक्तातील कचरा काढून टाकण्याचे व अतिरिक्त पाणी काढण्याचे कार्य किडनी करतात. अन् सोडियम, पोटॅशियम व कॅल्शियम हे शरीरास आवश्यक असलेले रासायनिक पदार्थ संतुलित ठेवण्याचे कार्यही त्यांचेच आहे. लाल रक्तपेशी तयार करणार्‍या बोन मॅरोला उत्तेजित करण्याचं महत्त्वाचं काम देखील किडनी करतात. आपण जे अन्न खातो त्यातील अनावश्यक घटक, औषधांमधील अनावश्यक घटक आणि विषद्रव्ये काढून टाकण्याचं काम देखील किडनीचं आहे. रक्तातील खनिज पदार्थ गाळण्याचं आणि त्यांना नियमित करण्याचं कार्य देखील किडनी करतात.

लक्षणे आणि दुष्परिणाम
अशा या किडनी जर काही कारणांनी अकार्यक्षम झाल्या, तर त्याचे दुष्परिणाम त्वरित दिसून येतात. लघवीचा त्रास होणे, उच्च रक्तदाब, पायांवर आणि डोळ्याखाली सूज, किडनीच्या आसपास वेदना, आळस येणे, भूक मंदावणे, निद्रानाशाचा विकार जडणे, डोकेदुखी, एकाग्रता कमी होणे, श्वास घेण्यास त्रास, मळमळ किंवा ओकारीची भावना, श्वासाला दुर्गंधी, स्नायू आखडणे इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात. किंबहुना ही लक्षणे आढळताच, डॉक्टर्स किडनी टेस्ट करायला सांगतात. या किंवा अन्य विकारांनी किडनीचा आकार कमी होतो किंवा वाढतो. अन् आपल्या शरीराचे कार्य चांगलेच बिघडते. त्यामुळे किडनीच्या बिघाडावर वेळीच उपचार केले नाही, तर त्यांचे कार्य मंदावते किंवा बंद पडते. अन् किडनी फेल्युअर या विकाराने माणूस दगावतो. त्यामुळे किडनीचे कार्य व्यवस्थित राखण्यासाठी खालीलप्रमाणे काळजी घेणे इष्ट आहे

.
भरपूर पाणी प्या
तहान लागताच पाणी प्या. दिवसाला किमान 2 लिटर तरी पाणी प्यायला हवे. त्याच्याने किडनीची कार्यक्षमता नियंत्रित राहते.

नियमित व्यायाम करा
दररोज किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करा. व्यायामाने शरीर तंदुरुस्त राहते. अन् किडनीचे कार्य व्यवस्थित राहते.

रक्तदाब तपासा
आपला रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तरी, त्याचा परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे डॉक्टरी सल्ल्यानुसार रक्तदाब नियंत्रणात ठेवा. अन् त्याची नियमितपणे तपासणी करा.

रक्तशर्करा नियंत्रित ठेवा
आजकाल मधुमेहाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे रक्तातील शुगर लेव्हल वाढलेली दिसते. या वाढीमुळे किडनी नादुरुस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली ब्लड शुगर नियंत्रित ठेवा. आहाराचे पथ्य आणि औषधांनी ती नियंत्रणात राहते.

पेनकिलर्सचा मारा कमी करा
पेनकिलर्सचा मारा सतत केल्याने किडनीवर त्यांचा परिणाम होतो. तेव्हा गरजेपुरते ते घ्या. अतिरेक टाळा.

मद्यपान मर्यादेत करा
अती मद्यपान केल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयविकार होतो. अन् किडनीवर परिणाम होतो. तेव्हा मुळातच नियमित मद्यपान करू नका. अन् केल्यास मर्यादेत करा, अती मद्यपान टाळा.