तंत्रज्ञानाचं बाळकडू द्यावं की देऊ नये? (How To...

तंत्रज्ञानाचं बाळकडू द्यावं की देऊ नये? (How To Keep Your Children Away From Excessive Use Of Digital Devices)

Children, Keep Away, Excessive Use Of Digital Devices


मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट, फेसबुक यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं बाळकडू पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी त्याला देऊ केलं. परंतु, त्याच्या अति वापरानं त्यांचं नुकसान केलंय. असं असताना तंत्रज्ञानाचं बाळकडू द्यावं की देऊ नये?…
मुलं जेवतच नाहीत, खूप हट्टीपणा करतात कधी कधी हिंसक बनतात, उलट बोलतात अशा तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाणार्‍या पालकांची संख्या वाढत आहे. मुलांच्या शाळेतील मिटिंगला जा, तिथेही शिक्षकांची बर्‍याचशा विद्यार्थ्यांबाबत तक्रार असते की, मुलं एका जागेवर स्थिर बसत नाहीत. त्यांचं शिकवण्याकडे लक्ष नसतं. स्वतःच्या जगात वावरत असतात. आणि मग शाळेत आरोग्य तपासणीसाठी येणारे डॉक्टर मुलांना तपासल्यानंतर अशा निष्कर्षावर येतात की, मुलांच्या घरातील आणि शाळेतील वर्तणुकीसाठी, तसंच त्यांच्या आरोग्याबाबतच्या ज्या काही तक्रारी आहेत, त्यासाठीही दुसरं तिसरं काही नाही, तर मोबाईलचं वेड जबाबदार आहे.
काय! मोबाईल!… खरं तर पालकांना हे कारण पटत असतं; पण मान्य करायचं नसतं. पालकांची स्थिती पाल्यांपेक्षा फार वेगळी नसते. उलट मोबाईल वापरण्याचं बाळकडू मुलांना आईवडिलांच्या अनुकरणातूनच मिळतं. सध्या अगदी वयाच्या दोनेक वर्षांपासून मुलं इतक्या सहजतेनं मोबाईल हाताळतात की, ही पिढी गर्भातूनच मोबाईल वापरण्याचं शिक्षण घेऊन येते की काय, असं वाटू लागतं. पूर्वी घरातील आजी-आजोबा, आई-वडील प्रार्थना, स्त्रोत्र, अंगाईगीतं, गोष्टी सांगून आपल्या नातवंडांवर, मुलांवर (सु)संस्कार करायचे. आता आई-वडील दोघंही नोकरीसाठी घराबाहेर आणि वयस्कर माणसं किंवा त्यांच्या जुन्या विचारांचे संस्कार हल्लीच्या उच्चशिक्षितांना आपल्या मुलांवर व्हायला नको असतात. मग अशा विचारांचे पालक आपल्या मुलांवर मोबाईलच्या मदतीनं संस्कार घडवायला जातात.

Children, Keep Away, Excessive Use Of Digital Devices


मोबाईलचा हट्ट
जन्मानंतर अगदी मान सावरायच्या आधीच पालक आपल्या मुलांना मोबाईल पकडायला देतात. सकाळपासून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी भक्तिगीतं लावून ठेवतात. त्यानंतर टीव्हीवर कार्यक्रम लावून ठेवतात. मुलांना त्या वयात काही कळत नसतं; पण आवाज आणि रंगीत चलचित्रांकडे ती कुतूहलानं पाहत राहतात. याचा परिणाम असा होतो की, मूल बसायला लागलं की खाताना, झोपताना, खेळताना मोबाईलसाठी हट्ट करू लागतं. मुलांच्या चेहर्‍यावर हसू राहावं यासाठी पालकही त्यांच्या इच्छा पूर्ण करत राहतात. मग शिक्षणाच्या वयात त्यांना मोबाईलवरून अभ्यासातील गाणी लावून देऊ लागतात. हळूहळू आपण अनवधानानं का होईना मुलांना मोबाईलचं व्यसन लावत आहोत, हे त्यांच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. कारण मोबाइलची फक्त चांगलीच बाजू त्यांनी पाहिलेली आहे.
मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान करून देण्याच्या उद्देशानं काही पालक मुलांना टीव्हीवरील काही अभ्यासपूर्ण चॅनल्सही पाहायला लावतात. मनोरंजनासोबत मुलांना त्यातून चांगलं घेता यावं, असा त्यांचा उद्देश असतो. पण आपलं मूल त्याच उद्देशासाठी या गॅजेट्सचा वापर करत आहे, हे कळायला कधी कधी वेळ लागतो. हल्ली मोबाईल गेम्समुळे होणार्‍या आत्महत्या किंवा हिंसक कृत्य करणार्‍या मुलांच्या वर्तनाचं वृत्त आपण वाचतो. अर्थात, हे सरसकट सर्वच मुलांसाठी नाही. त्याला अपवाद आहेतच.

सद्गुणांवर मात
विविध वयोगटातील मुलांची लक्षणं, वागणं वेगवेगळं असतं. त्यांचं वय, मानसिकता, विचार करण्याची पद्धत या घटकांवरून त्यांचं मोबाईलशी असलेलं नातं वेगवेगळं असतंं. फोन करणं, फोटो काढणं, गाणी ऐकणं, इंटरनेट सर्फिंग, चॅटिंग करणं, गेम्स खेळणं, व्हिडिओ बघणं अशा वेगवेगळ्या कारणांनी आज मोबाईल वापरला जातो. याचप्रमाणे गुगल, यु-ट्यूब, अ‍ॅमेझॉन अशा वेगवेगळ्या अ‍ॅप्सनाही उत्तम प्रतिसाद लाभतो. घरात बसल्या जागी आपणास अनेक गोष्टी करता, शिकता येतात. जसं- मुलांना चित्रकला, हस्तकला, गृहिणींना पाककला, शिवणकला, विणकाम, रांगोळी, मेंदी अशा अनेक गोष्टी अगदी सुलभतेने इंटरनेटच्या वापरातून शिकता येतात. पुरुषांनाही आपापल्या क्षेत्रातील नवनवीन संधींची माहिती वेबसाइट्सवरून मिळवता येते. ऑनलाईन शॉपिंग करता येऊ लागलंय. ही या तंत्रज्ञानाची जमेची बाजू झाली. याउलट सतत गेम्स खेळणं, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष, फेसबुकवरून चुकीचे मित्र जोडणं, त्यातून फसवणूक होणं, सततच्या वापरानं स्वभावात चिडचिडेपणा येणं या सगळ्या दुर्गुणांनी मोबाईलच्या सद्गुणांवर मात केली आहे.
आज भारतात इंटरनेट वापरणार्‍यांचा आकडा 420 दशलक्षापर्यंत पोहोचला आहे. आपल्याकडे 70 कोटी लोक मोबाईलचा वापर करतात. त्यातही 70 टक्के तरुण इंटरनेटसाठी मोबाईलचा वापर करतात. यामुळे मोबाईल कंपन्यांचं चांगलच फावलं आहे. शिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वचनबद्ध असल्याप्रमाणे मोबाईलमध्ये नवनवीन प्रयोग होत असतात. आणि आपणही त्यांकडे खेचले जातो.

Children, Keep Away, Excessive Use Of Digital Devicesसंवाद कमी झाला
सुरुवातीला जेव्हा मोबाईलचा शोध लागला तेव्हा दूरच्या व्यक्तींशी संवाद साधण्यासाठीच्या टेलिफोनच्या तुलनेत, अधिक उपयुक्त आणि वापरण्यास सोपा म्हणून या छोट्याशा गॅजेटचं मोठं कौतुक झालं. आज दूरच्या तर दूरच राहिल्या, कुटुंबातील व्यक्तींमधील संवादही कमी झालेला आहे. त्यावेळेस त्याचा वापरही मर्यादित होता. खरं म्हणजे ‘मर्यादा’ हा शब्दच महत्त्वाचा आहे. कारण ती आपण पाळत नाही. मग आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. मोबाईल वापरण्याचं बाळकडू जसं आपण दिलेलं आहे, तसंच मोबाईल वापरण्यासाठीची पथ्यंही सांगायची वेळ आता आली आहे.
नाण्याला दोन बाजू असतात. त्या तशा नसतील तर ते नाणं खणखणीत नाही, असं आपण म्हणू. तसंच आजच्या आधुनिक तंत्रज्ञानानं नवनवीन साधनांची रास रचली. आपली कामं कमी वेळेत अगदी सुलभतेने व्हावीत, यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. खरं तर देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं हे कौतुकास्पद आहे. हे सर्व करताना केवळ देशाच्या प्रगतीचा विचार झालेला नाही. तर देशातील प्रत्येक नागरिकाचा त्यासोबत विकास अपेक्षित होता आणि आहे. पण झालंय काय,
तर काही जणांनी खरोखर यामधून आपली प्रगती केली, तर काही जणांनी दुरुपयोग करून
स्वतःची अधोगती साधली आहे. यात तंत्रज्ञानाला दोष देऊन फायदा नाही. तंत्रज्ञानाचा अति वापर, अतिरेक माणसानं केला तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागणार, हे ठरलेलं आहे. तेव्हा
वाईट संस्कार करायला जेवढ्या वाईट गोष्टी आहेत, त्याहून जास्त प्रमाणात चांगले संस्कार करणं एवढं एकच पालक करू शकतात.