स्वयंपाकघर ठेवा स्वच्छ अन् सुंदर (How To Keep K...

स्वयंपाकघर ठेवा स्वच्छ अन् सुंदर (How To Keep Kitchen Neat And Tidy)


स्वयंपाकघर हा आपल्या घरातील महत्त्वपूर्ण भाग असतो. आपलं शरीर हे पोटावर चालतं. आणि या उदरभरणाची सोय स्वयंपाकघरात केली जाते, ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो. तेव्हा स्वयंपाकघर कसं असायला हवं किंवा कसं ठेवायला हवं, याबाबतचे नियम वा टीप्स आपण जरुर पाळायला हवेत. बरेचदा घाईगडबडीत काम उरकताना स्वयंपाकघरात आपण स्वयंपाक करायचं काम नेमाने करतो परंतु तेथील स्वच्छतेकडे आपल्याला हवे तसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे स्वयंपाकघर अस्वच्छ दिसते. असे होऊ नये म्हणून उपयुक्त ठराव्यात अशा काही टीप्स –

 • स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्म नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी, काम करताना प्लॅटफॉर्मवर प्लास्टिकची पिशवी लटकवून ठेवा आणि काहीही कापल्यानंतर त्या पिशवीत त्याचा कचरा टाका. असे केल्याने प्लॅटफॉर्म नेहमी स्वच्छ राहील.
 • स्वयंपाकघरात हात पुसण्यासाठी वापरलेले नॅपकिन्स बदलत राहा. दिवसभर एकाच नॅपकीनचा वापर करू नका. हात पुसण्यासाठी कोरडे टॉवेल्स किंवा शक्य असल्यास डिस्पोजेबल पेपर नॅपकिन्स वापरले तरी चालतील.
 • किचनचा दरवाजा, किचनमध्ये केबिनेट असेल तर त्याचे हँडल आणि फ्रीजचे हँडल स्वच्छ करण्यासाठी एक मग पाण्यामध्ये एक टीस्पून क्लोरीन ब्लीच मिसळा आणि स्वच्छ कापडाने घासून घ्या.
 • स्वयंपाकघरात शेडवाले बल्ब लावू नका, कारण त्यामुळे स्वयंपाकघरात प्रकाश पूर्णतः पसरत नाही.
 • किचन कॅबिनेटला आतून वार्निशने रंगवा. असे केल्याने किटक आणि झुरळे येणार नाहीत.
 • किचन कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी एक चतुर्थांश कप गरम पाण्यात समप्रमाणात लिंबाचा रस मिसळून कॅबिनेट स्वच्छ करा. गंज वा तेलाचे चिकट डागही लिंबाच्या रसाने साफ होतात.
 • तुमच्या किचनमध्ये मायक्रोवेव्ह, कुकिंग रेंज, ओव्हन इत्यादी वस्तू असतील तर त्यांच्या एका बाजूला किमान 40 सें.मी. जागा सोडा.
 • किचन सिंकमधून येणारा वास टाळण्यासाठी, त्यात रंगीत आणि सुगंधित नॅप्थालीन बॉल्स घाला.
 • किचन सिंकमधील डाग साफ करण्यासाठी अर्धा कप पाण्यात 3-4 चमचे व्हिनेगर मिसळा आणि सिंकमध्ये लावून थोडावेळ असेच राहू द्या. नंतर ते वर्तमानपत्राने पुसून टाका.
 • किचनमधील सिंक जाम झालं असल्यास, मीठ आणि सोडा समप्रमाणात मिसळून सिंकच्या होलमध्ये टाका. नंतर 1 टीस्पून डिटर्जंट घाला. 15 मिनिटांनंतर गरम पाण्याचा एक तीक्ष्ण प्रवाह घाला आणि नंतर थंड पाणी घाला. सिंक पूर्णपणे स्वच्छ होईल.
 • सिंकमधील डाग इत्यादी साफ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरा.
 • किचनच्या टाइल्सवर साचलेली घाण साफ करण्यासाठी स्पंज किंवा मऊ कापडावर थोडी डिटर्जंट पावडर टाकून त्याने टाइल्स घासून कोमट पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर त्या पुसून कोरड्या करा.
 • स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कपड्यांचा चिकटपणा दूर करण्यासाठी, डिटर्जंटमध्ये अर्धा कप अमोनिया घालून कपडे धुवा.
 • स्वयंपाकघरातील खिडक्या स्वच्छ करण्यासाठी, एक तृतीयांश कप व्हिनेगरमध्ये एक चतुर्थांश कप अल्कोहोल मिसळा आणि या मिश्रणाने खिडक्या स्वच्छ करा.
 • गॅस सिलेंडर जिथे ठेवला आहे तिथे जमिनीवर खुणा राहतात. त्यामुळे सिलेंडर ठेवण्याआधी त्याजागी मेण वितळवून टाकून ठेवा. मेणावर सिलेंडर ठेवल्याने कोणत्याही खुणा राहत नाहीत.