मुलांसोबत कसं वागाव? (How To Interact With Chil...

मुलांसोबत कसं वागाव? (How To Interact With Children?)

आपल्या मुलांसोबत कसं वागावं, बोलावं हा आजच्या पिढीच्या आई-वडिलांना पडणारा एक सामान्य प्रश्न आहे. काही पालक आपल्या मुलांकडून डोंगराएवढ्या अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम नातेसंबंधावर होतो.
पालक आणि मुलांमधील अंतर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लॉकडाऊन दरम्यान मुलांसोबत बराच वेळ घालवायला मिळाल्यानंतर पालकांना याचा चांगलाच प्रत्यय आलेला आहे. तेव्हा पालकांनी मुलांसोबत कसं वागावं हे सांगणार्‍या या टिप्स –
1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय स्वतःला लावा.
2. घरात मुलांसमोर आदळआपट करू नका, त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो.
3. मुलांना रोज एका चांगल्या कामाची सवय लावा. त्याबद्दल मुलांसोबत बोला.
4. मुलांना घालून पाडून बोलू नका, मुलं तुम्हाला हळूहळू दुर्लक्षित करतील.

5. मुलांनी चूक केलेली असेल तर त्यांना लगेच माफ करून समजावून सांगा. चांगलं काम केलेलं असेल तर कौतुक करा.
6. मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा, कितीही काम असले तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत, पैसे नाही.

7. आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे.
8. मुलं ही गुंतवणूकदार नाहीत, आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका.
9. मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका.
10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या, मूल वयानं लहान असलं तरी! त्यासंबंधीत पद्धती समजून सांगा. यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल.
11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा.

12. आपल्या मुलांची गरज समजून घ्या.
13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना नवरा म्हणून या.
14. मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही. नालायका, गधडा सारखे शब्द वापरणे टाळा.
15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई. मुलांना काही साध्या जोखीमही घेऊ द्याव्या. यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल. जसे – झाडावर चढणे.

16. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत. उलट मुलं खोटं बोलायला शिकतात. प्रेमापोटी देखील त्यांना मारू नका.
17. तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन, तुला एकटं सोडून देईन असं मुलांशी कधीही बोलू नका.
18. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कृतज्ञ असावं.
19. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं.
20. मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा.
21. समाजात तरुण मुलांच्या हातून ज्या अपराधाच्या गोष्टी घडतात, याची मुळं लहान वयातील संस्कारांवर बव्हंशी अवलंबून असतात. यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी कुटुंबासोबत शेअर करावयास हवा. यात मुलंही असावीत… कितीही वयाची असली तरीही ! यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्यास मदत होईल.

22. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले तर तुम्ही बदलू शकता, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे. त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा.
23. आपल्या मुलांचे आदर्श बना.