गुलाबाच्या पाकळीप्रमाणे ओठ कसे होतील? (How To G...

गुलाबाच्या पाकळीप्रमाणे ओठ कसे होतील? (How To Groom Lips Like Rose Petals?)

माझं वय 38 वर्ष आहे. माझे केस खूप गळतात. जास्त करून झोपून उठल्यावर, सकाळी उशीवर 25 ते 30 या प्रमाणात केस असतात. कृपया मला रात्री केसांची निगा कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन करावे?

 • वीणा, डोंबिवली
  केस गळती जर जास्त प्रमाणात असेल तर आपल्या आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे. म्हणजे सकस आहार व वेळेवर आहार घेणे योग्य असते. घरगुती उपायाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे आवश्यक आहे. एका रात्री केसांना कोमट केलेल्या हेअर ऑइलने मसाज करावा व सकाळी सौम्य शाम्पूने केस धुवावे. दुसर्‍या वेळी केस धुताना सकाळपासून मेथी पाण्यात भिजत घालावी. नंतर ते पाणी गाळून त्यात लोव्हेरा जेल चांगले मिक्स करावे व रात्री झोपतेवेळी हा मास्क केसांच्या मुळाशी लावून सकाळी केस धुवावे. केव्हातरी बाजारात छान असे हेअर सिरम मिळतात ते तुम्ही केसांच्या मुळावर लावू शकता. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. मात्र रात्री केसांना जर तुम्ही तेल किंवा मास्कचा वापर करत असाल तर केसांची सैलसर वेणी घालून झोपा म्हणजे केस तुटणार नाहीत. ओले केस बांधून कधीच झोपू नका.
 • मी 42 वर्षांची एक विवाहित स्त्री आहे. अति थंडीमुळे माझ्या चेहर्‍यावरील त्वचा खूप कोरडी आणि निस्तेज झाली आहे. या वातावरणात चेहर्‍याची काळजी कशी घ्यावी आणि माझा चेहरा मुलायम व्हावा आणि त्यावर चमक यावी म्हणून काय उपाय करू ते सूचवा?
 • सुगंधा, नाशिक
  सर्वप्रथम वय आणि वातावरण या गोष्टी मनातून काढून टाका. सगळ्यात सोपे उपाय घरातच असतात. पण आपण कधी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मी जो उपाय सांगेन त्यासाठी वर्षाचे बारा महिने कोमट पाणी प्यायला पाहिजे. तसेच दही हे चेहर्‍यासाठी मस्त टॉनिक आहे. एक चमचा दही घ्या, त्यात एक चमचा साखर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढून हे मिश्रण एकत्र करून चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटं सुकू द्या. नंतर हलक्या हाताने चेहर्‍यावर मसाज करावा. चेहरा धुवून टाका. त्यामुळे तुमचा चेहरा अगदी चमकायला लागेल व मऊ व तजेलदार होईल. थंडीमध्येच नव्हे तर कायम हा उपाय करू शकता.
 • थंडीचे वातावरण चालू झाले की माझ्या ओठांची खूप वाट लागते. ओठ प्रचंड फुटतात, जळजळ होते. कधी कधी रक्तही येते. त्यामुळे मला ओठांसाठी घरगुती उपाय सुचवा.
 • प्रेरणा, रत्नागिरी
  मुळात ओठ फाटणे हे थंडी येण्याचे संकेत असतात. थंडी ही गुलाबी असते. त्यामुळे ओठही गुलाबी असावेत असं वाटणं काही चुकीचं नाही. थंडीचा जास्त परिणाम होतो तो आपल्या ओठांवर. सर्वात जास्त व सर्वांना माहीती असलेला उपाय म्हणजे रोज रात्री झोपण्याआधी ओठांना तूप किंवा लोणी लावावे. तसेच लोणी व मीठ एकत्र करून ते ओठांना चोळावे. म्हणजे ओठांवरील मृत त्वचा निघून जाऊन ओठ तकतकीत व मऊ राहतात. फाटलेल्या ओठांना रोज 3 वेळा मध लावावा. म्हणजे तुमचे ओठ गुलाबाच्या पाकळीप्रमाणे होतील,
  यात शंका नाही.