वाळवीपासून संरक्षण (How To Get Rid Of Termite)

वाळवीपासून संरक्षण (How To Get Rid Of Termite)

वाळवीचा त्रास घरातघरात बघायला मिळतो. मुख्यतः ज्या घरांमध्ये दमटपणा असतो अशाठिकाणी वाळवी लगेच घर करतात. वाळवीचा प्रवेश झाला की साऱ्या लाकडाच्या वस्तू म्हणजेच लाकडी कपाट, खुर्च्या, टेबल हे सर्व अवघ्या काही दिवसांतच पूर्णपणे खराब होऊ शकतात. कागद, लाकूड याचा नाश करणाऱ्या वाळवीचे सामर्थ्य भयानक असते. दप्तरखाने, खासगी कारभाराच्या कागद वह्यांचा संग्रह, ग्रंथ संग्रह यांच्या संबंधातील झाडलोटीकडे जास्त दुर्लक्ष घडले की त्यावर वाळवी लागलीच म्हणून समजावे.

या वाळवीला वेळीच न रोखल्यास ती घरभर पसरण्याची भीती असते. लाकडी फर्निचरवर लहान छिद्रं दिसली किंवा त्याच्याभोवती पावडर सारखं काहीतरी दिसलं तर समजावं की त्या फर्निचरला वाळवी लागली आहे. वाळवी (Termites) व्हाईट अ‍ॅन्ट या नावानेही ओळखली जाते. वाळवी लहान मुंगीच्या आकाराचा एक कीडा असून त्या लाखोंच्या थव्याने आपल्या खाद्यावर ताव मारतात आणि पाहता पाहता कागद- लाकडाचा नाश करतात. यासाठी काही सोपे घरगुती उपाय करून वाळवीपासून सुटका मिळवता येऊ शकते.

उन्हात ठेवा – ऊन हे वाळवीला नष्ट करते. तेव्हा वाळवी लागलेलं फर्निचर वा वस्तू उन्हात ठेवा. तसेच वाळवी लागू नये म्हणून अधूनमधून घरातील लाकडी वस्तूंना ऊन्हामध्ये ठेवा.

मिठाचं पाणी – मिठाचं पाणी हे वाळवी प्रतिबंधक म्हणून अतिशय उपयुक्त असते. वाळवी लागलेल्या फर्निचरवर मिठाचं पाणी शिंपडल्यास वाळवीपासून सुटका मिळते.

व्हाइट व्हिनेगर – एका कापडावर व्हिनेगर घेऊन त्याने फर्निचर पुसून काढा. व्हिनेगरमुळे वाळवी नष्ट होण्यास मदत मिळते.

लाल तिखट – घरात ज्या वस्तूंना वाळवी लागली आहे, त्या ठिकाणी लाल तिखट टाकून ठेवल्यास वाळवी नष्ट होते.

कडुलिंबाची पावडर – कडुलिंबाच्या पानांची पावडरही वाळवीसाठी अतिशय उपयुक्त आहे. वाळवी लागलेल्या ठिकाणी शिंपडल्यास वाळवीपासून सुटका मिळते.

बोरेक्स – बोरेक्स म्हणजे सोडिअम बोरेक्स. हे वाळवी लागलेल्य फर्निचरला लावल्यास वाळवी नष्ट होते.