त्वचा आणि केस चमकदार होण्यासाठी काय करू? (How T...

त्वचा आणि केस चमकदार होण्यासाठी काय करू? (How To Gain Shiny Skin And Hair)


माझ्या मुलीची त्वचा निस्तेज आहे. त्यामुळे बरेचदा ती निराश असते. तिचा आत्मविश्‍वासही कमी होतोय, असं मला वाटतं. तिची त्वचा तजेलदार, उजळ दिसावी, यासाठी काही घरगुती उपाय करता येईल का?

  • ज्योती, लातूर
    प्रियदर्शन पॅक हा तुमच्या मुलीच्या समस्येवर रामबाण उपाय आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हा पॅक तयार करण्यासाठी अर्धा वाटी बेसन, 2 चमचे ग्लिसरीन, 1 चमचा चंदनाची पूड, 1 चमचा हळद पूड, 1 चमचा गुलाबजल, अर्धा चमचा दूध आणि 5-6 थेंब लिंबाचा रस यांचं एकजीव मिश्रण तयार करा. पॅक जास्त दाट झाल्यास त्यात ग्लिसरीनची मात्रा वाढवा आणि पॅक पातळ झाल्यास त्यात बेसनाची मात्रा वाढवा. हा पॅक मुलीच्या सर्वांगाला लावा. पॅक सुकू लागला की, तो त्वचेवरच हळूहळू चोळून काढून टाका. नंतर कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचा मुलायम आणि सतेज तर होईलच, सोबत हळूहळू त्वचेचा रंगही उजळत जाईल.

माझ्या मुलीच्या चेहर्‍यावर मुरुमं आली आहेत. मुरुमं आली की, ती फोडून टाकते आणि मग पुन्हा मुरुमं येतात. ही मुरुमं का येत आहेत? ती येऊ नयेत म्हणून काय करता येईल?

  • सरिता, नागपूर
    आपल्या त्वचेच्या बाहेरील थरामध्ये सिबेशियस ग्रंथी असतात. त्या ग्रंथींमधून सिबम नामक चिकट स्राव स्रवत असतो. कधी कधी हा सिबम प्रमाणाबाहेर स्रवतो. मात्र ग्रंथींना जोडलेल्या नलिका हा पदार्थ बाहेर फेकू शकत नाहीत, त्यांना अडथळा होतो आणि मुरुमं तयार होऊ लागतात. योग्य व्यायाम, चालणं-फिरणं, कमी तेलकट आहार घेतल्यास मुरुमांवर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. मात्र ही मुरुमं मुळीच फोडू नयेत. तसं केल्यास ती अधिक प्रमाणात पसरू लागतात. त्यापेक्षा या मुरुमांवर कडुनिंबाचं जेल लावा. सकाळ-संध्याकाळ कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ करा. म्हणजे मुरुमांचं प्रमाण हळूहळू कमी होईल.

माझ्या चेहर्‍यावर अ‍ॅक्ने आहेत. केस राठ आहेत. त्वचाही रूक्ष झाली आहे. बरेचदा कामाच्या व्यापात पार्लरमध्ये जाणं शक्य होत नाही. अशा वेळी या सर्व समस्यांवर घरच्या घरी करता येईल, असा परिणामकारक उपाय सांगा.

  • मंजिरी, नवी मुंबई
    अ‍ॅक्ने, राठ केस, काळवंडलेली रूक्ष त्वचा या सर्व समस्या केसांची आणि त्वचेची नियमित काळजी न घेतल्यामुळे सतावतात. नियमितपणे योग्य ती काळजी घेतल्यास या समस्या दूरही होऊ शकतात. त्यासाठी केस आणि त्वचेला ग्लो पॅक लावता येईल. त्यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात 2 चमचे कोरफडीचा जेल, 2 चमचे मध आणि 2 चमचे गुलाबजल घेऊन एकजीव मिश्रण तयार करा. ओल्या कापडाने चेहरा पुसून घ्या. केसांची पेनिटेल बांधून, तीही ओली करा. तयार केलेला हा ग्लो पॅक चेहरा आणि केसांवर लावा. साधारण 20 मिनिटांनी चेहरा आणि केसांना पाच मिनिटं मसाज करा. नंतर अंघोळ करा. अशा प्रकारे आठवड्यातून एकदा नियमितपणे केल्यास, त्वचा आणि केस दोन्हींना छान चमक येईल.
  • भक्ती खातू