या गोष्टी शिका, आत्मनिर्भर व्हा (How To Do It Y...

या गोष्टी शिका, आत्मनिर्भर व्हा (How To Do It Yourself And Become Self-Sufficient)

रेखा आज फारच अस्वस्थ आणि चिडली होती. त्यात बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसामुळे  तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. तिने सहज बाहेर डोकावले तर आजूबाजूच्या सर्व घरांमध्ये वीज होती, पण तिच्यात घरात नव्हती. इलेक्ट्रिशियनला फोन केल्यावर तो एवढ्या पावसात यायला तयार नव्हता. त्यात कमी की काय म्हणून ओले कपडे सुकवण्याचा त्रास. त्यावेळी रेखाच्या 8  वर्षाच्या मुलाने घरात दोरी बांधून कपडे सुकवण्याचा सल्ला दिला.  मात्र रेखाला भिंतीवर खिळा मारायलासुद्धा येत नव्हते. तेव्हाच रेखाची चौथ्या मजल्यावरची मैत्रीण माया तिथे आली. घरात अंधार असल्यामुळे रेखा चिडचिड करत असल्याचे मायाला लगेच समजले. म्हणून तिने रेखाच्या घरचा फ्यूज चेक केला. त्यांची शंका खरी ठरली. फ्यूज उडाला होता.  मायाने पटकन वायरने फ्यूज लावला.  त्यानंतर तिने तिच्या मुलाला घरात ठेवलेला टूल बॉक्स आणण्यासाठी पाठवले आणि त्या टूल बॉक्समधल्या ड्रील मशीनने भिंतीला भोक पाडून त्यात खिळे ठोकले. त्यावर दोरी बांधून रेखाला त्यावर कपडे सुकत घालण्यास सांगितले. यामुळे रेखाची कपड्यांची अडचण काही मिनिटांत दूर झाली होती. मायाची हुशारी पाहून रेखा थक्क झाली. 

त्यावेळी मायाने रेखाला समजावले की, मतू वर्किंग वुमनफ असलीस किंवा गृहिणी असलीस तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या शिकल्या पाहिजेत.  जीवन सुलभ आणि सुरळीत बनवण्यास त्या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात.  त्यातील काही कौशल्ये तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी नसतील, परंतु त्यांची गरज कधी ना कधी लागते. जर तुम्ही त्या शिकल्या नाही तर तुम्हाला खूप अडचणींना सामोरे जावे लागू शकते.  आपण महिलांनी छोट्या छोट्या गोष्टींसाठी नवर्‍याची किंवा इतर कोणाचीही मदत घेणे हे काही बरे दिसत नाही.” मायाच्या बोलण्याने रेखा प्रभावित झाली. आणि यापुढे तिने ठरवले की आता ही छोटी कामे शिकून घेऊन कोणत्या कामांसाठी इतरांवर अवलंबून राहणार नाही.
प्रत्येक स्त्रीने ही कामे शिकणे आवश्यक आहे
होम इकोनॉमिक्स
हा विषय परदेशात इतर विषयांप्रमाणे कॉलेजला शिकवला जातो.  या विषयांत घरगुती गरजांशी संबंधित अनेक कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते, परंतु आपल्या देशात विविध क्षेत्रातील लोकांकडून आपण ते शिकू शकतो. त्यात घराचे रंगकाम, प्लंबिंग (नळ बसवणे इ.), सुतारकाम, इलेक्ट्रिकल कामे, घराची देखभाल आणि दुरुस्ती या अनेक छोट्या-छोट्या गोष्टींचा समावेश असतो. यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही शिकणे गरजेचे असते. उदा. फ्यूज उडाला की वायर पुन्हा जोडणे, अचानक नळ खराब झाल्यास प्लंबरची वाट पाहत न राहता नळ स्वतः बसवण्यासाठी ड्रिल मशीनचा वापर करता येणे.भिंतीवर खिळे ठोकणे,  सुतारकामाशी संबंधित छोटी-मोठी कामे करणे. या गोष्टी करता आल्या तर तुमचे आयुष्य सुकर होईल.

प्रथमोपचार
आजार आणि अपघात कधीही होऊ शकतात. अशा परिस्थितीत रडत किंवा ओरडत बसण्यापेक्षा संयमाने वागणे आवश्यक असते. अशा कठीण काळात रुग्णाला किंवा अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथमोपचार देणे आणि नंतर त्याला लवकरात लवकर रुग्णालयात नेणे गरजेचे असते. यासाठी फर्स्ट एड कीट अर्थात प्रथमोपचाराचे साहित्य आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. अँटिसेप्टिकसारखी काही महत्त्वाची औषधे, मलम, मलमपट्टी, वेदनाशामक व रिलीफ स्प्रे, कापूस या गोष्टी त्या किटमध्ये ठेवाव्यात. तसेच त्याचा वापर कसा करावा हे देखील शिकून घेणे गरजेचे आहे.  तसेच कधी कोणाला  हृदयविकाराचा झटका आला किंवा कोणाला उष्माघाताचा त्रास होऊ लागला तर कोणती खबरदारी घ्यावी आणि रुग्णाला कोणते प्राथमिक उपचार द्यावेत या गोष्टी महिलांना आल्याच पाहिजेत.

वाहनांची देखभाल
हल्ली कार किंवा दुचाकी जवळजवळ प्रत्येक घरात असतात. खाजगी वाहने ही आता केवळ मिरवण्याची गोष्ट राहिली नसून ती काम करणार्‍या माणसाची गरज बनली आहेत. किरकोळ बिघाडामुळे गाडी अचानक रस्त्यात अडकते. नेमके तेव्हाच आजूबाजूला दूरवर एकही मेकॅनिक भेटत नाही तेव्हा खूप त्रास होतो.  बरेच लोक कार किंवा बाईक चालवतात परंतु त्यांची देखभाल कशी करावी, त्यांच्यात काही बिघाड झाल्यास तो दुरुस्त कसा करावा हे कोणाला माहीत नसते.  यासाठी वाहनांच्या देखभालीशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी शिकायला हव्यात. त्यांची नियमित साफसफाईची पद्धत, तेल बदलणे, टायरचे प्रेशर तपासणे, किरकोळ तांत्रिक बिघाड दूर करणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी शिकायला हव्यात.  तुम्ही गाडी चालवत असाल तर गाडीचा टायर बदलायला नक्कीच शिका, नाहीतर गाडीत पडलेल्या स्टेफनीचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही.

अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे
आपल्याकडे आजही बहुतांश महिला अनोळखी व्यक्तींशी बोलण्यास कचरतात. आपल्याला नीट बोलता आले नाही तर आपले काम बिघडेल, अशी भीती त्यांना वाटते. अनेकदा महिला या  मुलांच्या शाळेत त्यांच्या प्रवेश प्रक्रियेवेळी, कोणत्याही सरकारी कार्यालयात, न्यायालयात, डॉक्टरांकडे गेल्यावर किंवा अशा इतर कामांसाठी त्यांच्या पती किंवा मुलांना सोबत घेतात किंवा त्यांनाच तिथे पाठवतात. अशा वेळी, प्रत्येक काम करणार्‍या किंवा गृहिणींनी त्यांचे संवाद कौशल्य विकसित करणे, लोकांशी बोलणे आणि संवाद साधण्याची कला शिकून घेणे गरजेचे असते.

सायबर गोपनीयतेचे रक्षण करणे
सर्व जग इंटरनेटशी जोडले जात असताना सध्या सर्वत्र सायबर क्राइम हा प्रकार वाढला आहे. अशा वेळी काही गोष्टी नीट शिकून घेतल्यास आपण अडचणीत सापडणार नाही. जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट ऑनलाइन खरेदी करता तेव्हा वेब अ‍ॅड्रेसच्या सुरुवातीला जर हीींिं नंतर ी येत नसेल, तर तुमच्या क्रेडिट कार्डचा तपशील येथे चोरीला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, आपण आपले फेसबुक अकाउंट सुरक्षित कसे करावे हे देखील शिकले पाहिजे. तुमचा प्रोफाईल फोटो प्रायव्हेट मोडवर ठेवण्याचा ऑप्शन असतो. त्याचा वापर करून तुमच्या मर्जीतल्याच व्यक्तींना तो दिसेल अशी सेटिंग करावी.  फेसबुकवर उगीच तुमचे वैयक्तिक फोटो अपलोड करणे थांबवा. वेळोवेळी तुमच्या ऋरलशलेेज्ञ अकाउंटचा पासवर्ड बदलत राहा.

एकट्याने प्रवास करणे
बर्‍याच महिला अनोळख्या ठिकाणी एकट्याने प्रवास करणे टाळतात. पण एकदा तरी कोणाचीही मदत किंवा सल्ला न घेता संपूर्ण प्रवासाची योजना करून तुम्ही एकट्याने प्रवास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकट्याने प्रवास केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुम्हाला स्वनियोजनाची सवय लागते, लोकांशी संवाद साधताना येणारा संकोच नाहीसा होतो. यामुळे नवीन लोक आणि नवीन ठिकाणांशी ओळख होण्याची संधी मिळते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक प्रकारची मनःशांती मिळते. यासाठी सुरुवातीला तुम्ही जवळपासच्या कोणत्याही ठिकाणाहून सुरुवात करू शकता.

आर्थिक स्थिती नियंत्रित करणे
आजच्या आर्थिक जगात सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे पैसा.  तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तसेच त्यावर तुमचे नियंत्रण असेल तर तुमचा आत्मविश्वासही कायम राहील.  तुमचे उत्पन्न किती आहे, त्यात किती बचत होते. तुमचा महिन्याचा सरासरी खर्च किती होतो या गोष्टी तुम्ही नेहमी जाणून घेतल्या पाहिजे. तुमचा हेल्थ इन्शुरेंस किती रुपयांचा आहे. त्याचा काही फायदा तुम्हाला मिळतो का ? तसेच कोणते म्युच्युअल फंड चांगले आहेत,  कोणते ठिकाण प्रॉपर्टीसाठी चांगले आहे, या गोष्टी जाणून घेणे आवश्यक असते. तुमचे उत्पादन, त्यातून होणारा खर्च, होणारी बचत या सर्व गोष्टींचा हिशोब तुम्हाला एका डायरीत मांडता आला पाहिजे. यासोबतच तुमच्या पतीची संपत्ती किती आहे, शिवाय त्याचे उत्पन्न आणि खर्च काय आहे याचीही माहिती ठेवावी.

ऑनलाइन बिल भरणे
आता कोणत्याही गोष्टी घरबसल्या करता येतात. त्यासाठी बाहेर जाण्याची गरज भासत नाही. कोणतेही बिल भरायचे असेल तर आता बाहेर जाऊन त्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यामुळे घरच्या घरी मोबाइलवर बिल कसे भरावे हे शिकून घेतल्यास तुमचा वेळ आणि कष्ट वाचतात. शिवाय प्रवासाचे तिकीटसुद्धा आता ऑनलाइन काढता येते. म्हणून कोणत्याही प्रवासाचे आयोजन करायचे असेल तर त्याचे तिकीट मोबाइलवर कसे काढावे हे येणे आवश्यक आहे.

सौंदर्यासंबंधीत गोष्टी शिकणे
महिला म्हटले की नटणे आलेच. पण ते करण्यासाठी बरेचदा आपल्याला पार्लरवालीवर अवलंबून राहावे लागते. काही वेळेस त्यांची अपॉइन्टमेंट मिळाली नाही तर हिरमोड होतो. अशावेळी बेसिक मेकअप कसा करावा या गोष्टी शिकल्या पाहिजेत. सध्या यु-ट्यूबवर पार्लर संबंधित अनेक शिकवणीचे व्हिडिओ उपलब्ध असतात. त्यात पाहून शिकल्यास तुमचे पैसे नक्कीच वाचतील.