प्रभावी व्हा! (How To Develop Your Personality?)

प्रभावी व्हा! (How To Develop Your Personality?)

इतरांवर आपला प्रभाव पडावा असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते आणि असा प्रभाव प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही प्रमाणात पडत असतोच. या प्रभावाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उपयोगही होत असतो. उदाहरणार्थ – विक्रेत्याचे वागणे-बोलणे चांगले असेल तर त्याची विक्री चांगली होऊन त्यास नफा होतो. म्हणजेच प्रभाव पाडण्याचे महत्त्वाचे अंग म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व. आपण दिवसभर अनेक व्यक्तींना भेटतो त्यातील काही व्यक्ती ह्या अनोळखी असूनही आपलं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतात. याचं कारण प्रभावी व्यक्तिमत्त्व…
म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जागरूक बनणे गरजेचे झाले आहे. यासाठी काय करावे?

सकारात्मक राहा
आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तिच्याबद्दलचं एक मत बनवून टाकतो. हे मत सकारात्मक, नकारात्मक वा तटस्थ असंही असू शकतं. परंतु आपल्याला जर स्वतःचं व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल तर आपण प्रयत्नपूर्वक ते सकारात्मकच बनवलं पाहिजे.

नेहमी हसत राहा
पहिल्या भेटीत आपण एकमेकांकडे पाहून हसतो. हास्यामुळे कळतं की आपण समोरच्या व्यक्तीस पसंत करतो. हीच बाब प्रत्येक नात्यातही लागू पडते. नात्यातील व्यक्तींनाही भेटल्यानंतर प्रथम तुमच्या चेहर्‍यावर हास्य उमटले पाहिजे.

नावाला महत्त्व द्या
कोणत्याही व्यक्तीस स्वतःचं नाव महत्त्वपूर्ण वाटत असतं. तेव्हा कोणत्याही व्यक्तीशी बोलताना, मधेमधे त्याच्या नावाचा उल्लेख करा. मग ती व्यक्ती तुम्हाला सिनियर असो वा ज्युनिअर.

’आय’ च्या आधी ’यु’ लावा
तुम्ही कोणाचं म्हणणं ऐकणार? जो स्वतःच्या हिताचा विचार करतोय की, तो जो तुमच्या हिताचा विचार करतोय? अर्थात तुम्ही दुसराच पर्याय निवडणार. प्रत्येक व्यक्ती आधी स्वतःचा विचार करणार. उदाहरणार्थ – मी असा आहे, मला हे आवडतं… आपल्या बोलण्यातील मी बाजूला काढून त्याऐवजी दुसर्‍यांचा विचार करा.

शब्दांचा योग्य वापर करा
तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही ते कसे बोलता हे विशेष महत्त्वाचे आहे. जसे – तुमच्याकडून चूक झाली आणि तुम्ही चिडून सॉरी बोललात, तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही सॉरी हा शब्द कसा बोलता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही स्वतःची चूक मान्य करत आहात असं समोरच्याला वाटलं पाहिजे.

निःस्वार्थीपणे मदत करा
फळाची अपेक्षा न करता कर्म करावे. त्याप्रमाणे कोणालाही मदत करताना मनात स्वार्थीपणा येऊ देऊ नका. मदत करणे म्हणजे आपलं काम सोडून दुसर्‍यांच्या सेवेत रुजू व्हायचं असंही करायचं नाही.

स्वतःचं व्यक्तिमत्त्व घडवा
आपलं पहिलं इंप्रेशन हे लास्ट आणि म्हणूनच खास असतं. तेव्हा आपलं व्यक्तिमत्त्व सुधारा. त्यासाठी मुलांनी जिममध्ये मुलींनी पार्लरमध्येच जायला हवे, हे गरजेचे नाही.

प्रशंसा करा
प्रत्येक व्यक्तीला स्वतःची प्रशंसा ऐकायला आवडते. तेव्हा एखाद्या व्यक्तीचा गूण, स्वभाव आवडला तर त्याचं नक्की कौतुक करा आणि तेव्हाच्या तेव्हा करा. एखादी गोष्ट सकाळी पाहिल्यानंतर आवडली आणि त्याबद्दल तुम्ही त्या व्यक्तीस जर संध्याकाळी सांगितलं तर काही उपयोग नाही. उलट तुमचं हसं होऊ शकतं.

निरिक्षणशक्ती वाढवा
सतत निरीक्षण करत राहा. त्यातून प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी सापडत जातील. स्वतःला परिपूर्ण न समजता सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहा, तर प्रगती होईल.