गोष्टी लहान आनंद महान (How To Derive Pleasure W...

गोष्टी लहान आनंद महान (How To Derive Pleasure With Family Members)


आनंद ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. अर्थात, प्रत्येक व्यक्तीचा आनंद वेगवेगळ्या गोष्टींत असतो. आपला आनंद कशात आहे, हे कळलं की आनंदी राहणं सोपं होतं. तुम्हाला आनंदी राहायचं आहे, तर मग आनंद शोधू नका, आनंदाची निर्मिती करा.
तुम्ही सुपरमार्केट किंवा मॉलमध्ये जाता, अन् खूपशी खरेदी करता. तेथील रॅक्सवर वस्तू रचून ठेवलेल्या असतात. त्या अशा खुबीने रचल्या असतात की आपल्या डोळ्यांच्या रेषेत महागड्या, आकारानं मोठ्या वस्तू दिसतील. आपण नजरेत भरेल ती वस्तू घेतो आणि खरेदीच्या बास्केटमध्ये टाकतो. आपली नजर जरा खाली-वर करून पाहाल तर लहान साईजमधील तीच वस्तू (उदाहरणार्थ- टूथपेस्ट, पावडर) ठेवलेली तुम्हाला दिसून येईल. तेव्हा नजर व्यवस्थित वळवा, अन् पाहिजे त्या आकारातील वस्तू घ्या, म्हणजे पैसे वाचतील.

पैसे वाचवा, आनंद मिळवा
आपल्यापैकी प्रत्येकाकडे विमा असतोच. आयुर्विमा, मेडिक्लेम किंवा
कार इन्शुरन्स. त्याचा प्रिमियम जर तुम्ही दरमहा भरत असाल, तर तुम्ही 15 ते 20 टक्के पैसे जास्त भरता. त्यापेक्षा वर्षाचा प्रिमियम वर्षातून एकदा भरा. तो तुम्हाला स्वस्त पडेल.
50 टक्के सेल, 60 टक्के सेल (म्हणजे डिस्काऊंट) अशा जाहिरातींची आपल्याला भुरळ पडते. अन् आपण त्या वस्तू विकत घेण्यासाठी धाव घेतो. जरा शांतपणे विचार करून, स्वतःच्या मनालाच प्रश्‍न विचारा की, ही वस्तू, याक्षणी आपल्याला खरोखरीच हवी आहे का? म्हणजे ती घेतली जाणार नाही. अन् आपले पैसे त्यात अडकणार नाहीत.

विरंगुळ्याचे क्षण मिळवा
घरातील लहान मुलांना आपण जे काही करतो, त्यात स्वारस्य नसते. म्हणजे आपण टी.व्ही. वरील ज्या कौटुंबिक मालिका आवडीने पाहतो, त्यात त्यांना काडीचाही इंटरेस्ट नसतो. त्यांना कार्टून नेटवर्क बघायचं असतं. या आवडीनिवडीवरून मुलं हट्टी बनतात. तेव्हा आपली आवड त्यांच्यावर लादू नका. म्हणजेच त्यांनाही कार्टून नेटवर्क पाहण्याचा अतिरेक करू
देऊ नका. यावर तोडगा म्हणून त्यांना आवडतील असे करमणुकीचे, विरंगुळ्याचे कार्यक्रम निवडा.
आपल्याला सिनेमा पाहायचा असतो. पण मुलांना थिएटरात बसायला आवडत नाही. ते 2-3 तास एका जागेवर बसू इच्छित नाहीत. नेलंच तर चुळबुळ करतात, त्रास देतात. त्यांना बाहेर न्यावं लागतं. मग आपल्यालाही सिनेमा धड पाहता येत नाही. मुलांच्या व आपल्या सिनेमा तिकिटाचे पैसे वाया गेल्याचं दुःख होतं. यावर उत्तम तोडगा म्हणजे शुक्रवारी किंवा शनिवारी रात्री आपल्याला एकत्र बसून सिनेमा पाहायचा आहे, अशी घोषणा करा. अगदी सिनेगृहाच्या स्टाईलमध्ये पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंकची आधी तयारी करून ठेवा. अन् टी.व्ही.वर (ऑन डिमांड) नवा सिनेमा बुक करून, सगळ्यांनी एकत्रित बसून सिनेमाचा आनंद घ्या. सुरुवातीला मुलांच्या आवडीचे सिनेमे लावा. या एकत्र बसून पाहण्याच्या आनंदाची हळूहळू सवय लागली की, मग आपल्या आवडीचे म्हणजे सगळ्यांच्या आवडीचे सिनेमे ते लोक पाहायला लागतील. सगळ्यांची घरबसल्या करमणूक होईल. शिवाय महागड्या थिएटर तिकिटांपासून सुटका होईल. बचत होईल. हीच गोष्ट पुस्तकं वाचनाच्या बाबतीतही करता येईल. घरातल्यांना वाचनाची आवड असेल तर अशीच मैफल जमवून चांगल्या पुस्तकांचं, कथेचं वाचन करता येईल. मुलांनाही त्यात सहभागी करून घेतलं, तर त्यांना वाचनाची, वाचनाचा आनंद घेण्याची आवड निर्माण होईल. शिवाय मोबाईल, कम्प्युटर्समुळे ज्या वाचनसंस्कृतीपासून आपण दूर गेलो आहोत, त्याच्या नजीक येता येईल.
पूर्वीची एक पिढी आजीने, आईने सांगितलेल्या गोष्टींवर जगली आहे. सुसंस्कारित झाली आहे. लहान मुलांना गोष्टी सांगून त्यांचं मन रिझवणं, त्यांना संस्कारीत करणं, ही आपली परंपरा राहिली आहे. अजूनही काही लहान मुलं झोपताना आजीच्या तोंडून गोष्टी ऐकताना आढळतात. हाच कार्यक्रम आजीऐवजी आपण – आई किंवा बाबा – नक्कीच करू शकतो. अगदी संस्कारक्षम गोष्टी जर आजच्या मुलांना, बोअरिंग वाटल्या तरी त्या टाळून, वेगळ्या चांगल्या गोष्टी आपण नक्कीच ऐकवू शकतो. टी.व्ही.ला डोळे लावून बसण्यापेक्षा ही गोष्ट खचितच चांगली असल्याचं महत्त्व मुलांना पटेल.

वादनकलेस उत्तेजन द्या
एका विशिष्ट वयात मुलांना एखाद्या वाद्याचं आकर्षण वाटतं. मागल्या पिढीत बुलबूल तरंग, बोंगो, तबला, बासरी वाजविण्याचं आकर्षण असायचं. मुलांनी मनापासून ही आवड जोपासली तर पुढे ते निष्णात वादक व्हायचे. हौस किंवा व्यवसाय म्हणून ही वादनकला पुढे न्यायचे. अन्यथा वयानुरूप त्याचं आकर्षण ओसरलं की ते वाद्य घरात धूळ खात पडायचं. आत्ताच्या पिढीतही हे वाद्याचं आकर्षण आहेच. आत्ताच्या तरुणांना गिटार, ड्रम्स, की बोर्ड, सिंथेसायजर या वाद्यांचं आकर्षण वाटतं. वाद्यवादनात करिअर करायचं की नाही, हा मुद्दा बाजूला ठेवून जवळपास सगळेच पालक मुलांची हौस व हट्ट पुरवतात. तरुणांच्या या हट्टाला किंवा हौसेला गैर न मानता, नावं न ठेवता, ती पुरवा. अन् त्याच्या वादनास प्रोत्साहन द्या. आठवड्यातून एकदा तरी सर्व कुटुंबासह त्याच्या वादनाचा कार्यक्रम ठेवा नि त्याला उत्तेजन द्या, त्याला समाधान वाटेल. अन् कुटुंबीयांना विरंगुळ्याचे वेगळे क्षण लाभतील. या वाद्यांवर लगेच हात बसत नाही किंवा नैपुण्यही येत नाही. त्यामुळे आपण जेवढे शिकलो आहोत, ते घरच्या लोकांसमोर सादर करण्याची, त्या हौशी वादकाला सवय लागेल. अन् आपले कुटुंबीय आपले कौतुक करतात याचा त्याला अभिमान वाटेल. या कौटुंबिक कार्यक्रमाने घरातील वातावरण खेळीमेळीचं राहण्यास मदत होईल.

घरातच पिकनिक करा
विकएण्ड साजरा करण्यासाठी सगळेच उत्सुक असतात, उत्साही असतात. पण त्यासाठी बाहेर निघाले की, ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याने हा उत्साह पुरता ओसरतो. मुलं तर वैतागून जातात. त्यातून सुटका झाली तर ज्या हॉटेलात राहण्यासाठी, मौजमजेसाठी जातो, तेथे गर्दी असते. निवांतपणा नसतो. शहरातील हॉटेलातील, मॉलमधील गोंधळ तेथेही अनुभवण्यास मिळतो. आजकाल सहलीच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. ‘व्हेकेशन’च्या धर्तीवर ‘स्टेकेशन’ ही संकल्पना हळूहळू रुजू होतेय. अर्थात आपल्या घरातच बसून सुट्टी घालवायची. सुट्टीचा, सहलीचा आनंद लुटायचा. ही कल्पना राबवून पाहायला हरकत नाही. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी घरातच पिकनिकचं वातावरण निर्माण करायचं. खेळ खेळायचे, गाणी गायची, नाच करायचे. घरासमोर अंगण असेल वा बगीचा अथवा मोठी गच्ची असेल तर ही सहल अधिकच सार्थ झाली समजा. सुरतमध्ये दर शनिवार-रविवार अथवा सुट्टीच्या दिवशी कित्येक लोक घराबाहेर पडतात. छोटे कुटुंब चक्क स्कूटरवरून अन् मोठे कुटुंब कारमधून निघतात. थंड हवेच्या ठिकाणी किंवा हॉटेल-मॉटेलमध्ये न जाता मोठ्या रस्त्याच्या आयलॅन्डमध्ये किंवा फुटपाथवर चटई अंथरतात, पथारी टाकतात. सहलीला जातो त्याप्रमाणे तेथे घरून खाण्याचा डबा आणलेला असतो. त्यातील पदार्थ व रस्त्यावर लागलेल्या गाडीमधील चटपटीत पदार्थांची मिसळ करून सहभोजनाचा आनंद लुटतात. हा पॅटर्न आपण घरातच राबविला तरी पिकनिक साजरी केल्याचं समाधान मिळविता येईल. अन् कुटुंबातील माणसं या दिवसाची वाट पाहत राहतील.
आताशा आपल्या मोबाईल फोनवर सेल्फी घेण्याचं वेड वाढीस लागलेलं आहे. कोणत्याही प्रसंगी, कुठल्याही जागेवर- अगदी स्मशानातसुद्धा सेल्फी घेण्याचं हे वेड आहे. कोणतंही निमित्त नसलं तरी सेल्फी हवाच, किंवा फोटो काढलाच पाहिजे, अशी मानसिकता जोर धरते आहे. याच वेडाचा सदुपयोग करून घेता येईल. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा घरातल्या लोकांची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठरवा. त्यात विविध प्रकारचे ड्रेस घाला, विविध प्रकारची सोंगे घ्या. चित्रविचित्र वागा. त्याचे फोटो काढा. एरव्हीचे सेल्फी कुणी संग्रही ठेवत नाही. पण अशा प्रकारचे फोटो संग्रही ठेवण्याचा नक्कीच मोह होईल. रटाळ टी.व्ही. मालिका पाहण्यापेक्षा या स्पर्धेसाठी नटण्यामुरडण्यात छान वेळ जाईल. गंमत करता येईल. कुटुंबाला नवा खेळ मिळेल, नवीन विरंगुळा निर्माण होईल. मित्र परिवारांमध्ये हे फोटो शेअर केलेत की, त्यांच्या चौकश्यांनी मनोरंजन होईल. त्यांनाही या गोष्टीचं खूळ लागेल. अन् टॅलेन्टेड फॅमिली आहे, अशी प्रशस्ती त्यांच्याकडून लाभली तर आपल्याला अभिमान वाटेल.

दुःख, तणाव घालवा…
तुमच्यापैकी कैक जणींना हाय हिल्स सॅन्डल्स, चप्पल घालण्याची सवय असेल. अगदी त्याच्यावाचून जमणारच नाही, असं अ‍ॅडिक्शन असेल, तरीपण एकाच उंचीचे हिल्स दररोज घालू नका. वेगवेगळे प्रकार वापरून पाहा. कधी फ्लॅट चप्पल घालून जा, तर कधी कमी-अधिक उंचीचे हिल्स वापरून पाहा. त्यामुळे गुडघे, पाय आणि पाठ दुखीचा त्रास कमी होईल.
होय, हाय हिल्सने हे प्रॉब्लेम होतातच. अन् आपणही हट्टाने त्या घालतच राहतो. त्यात बदल करा नि दुःख घालवा, आनंद मिळवा.
आपल्या मैत्रिणी, ऑफिसातील सहकारी यांचा मत्सर करू नका. त्यांच्याशी ईर्षा करू नका. आपली तुलना इतरांशी करू नका. त्याच्याने फक्त दुःखच पदरी पडेल. आपली स्पर्धा दुसर्‍यांशी नाही, स्वतःशीच आहे, हे ठरवा. म्हणजे दुःख होणार नाही.
आपल्यापैकी काही जण कुत्रा, मांजर, पोपट असे प्राणी घरी पाळतो. त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना माया लावतो. असे जरूर करा. कारण हे प्राणी देखील आपल्यावर प्रेम करतात. आपण त्यांना पोसतो, म्हणून त्यांच्या मूक सदिच्छा आपल्याला लाभतात. शिवाय त्यांच्या सहवासाने आनंदमयी एन्डॉर्फिन्स आपल्या शरीरात निर्माण होतात. ‘फिलगुड’ ही अनुभूती आपल्यास मिळते. स्ट्रेस निर्माण करणार्‍या हॉर्मोन ‘कॉर्टिसॉल’ या घटकाची पातळी कमी होते. अन् आपण तणावमुक्त, आनंदी राहतो.
आता डिजिटल तंत्रज्ञानानं आपलं अवघं जीवन व्यापलं आहे. व्हॉट्स अ‍ॅप, व्हिडिओ, नेटफ्लिक्स, टॅब, लॅपटॉप, कम्प्युटर, पेटीएम, एटीएम, ऑनलाइन शॉपिंग-बँकिंग यांच्या महाजालात आपण पुरते अडकलो आहोत. यासाठी डोकं आणि डोळे सतत कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये खुपसावे लागतात. यातून सुटका मिळविणे क्रमप्राप्त असते. तेव्हा कामाच्या ठिकाणाहून घरी आलात की निदान कम्प्युटरमध्ये तरी डोकं खुपसू नका. आपल्या जिवलग मित्राला फोन करा. त्याची ख्यालीखुशाली घ्या. आपली कळवा. जवळच्या नातेवाइकांपेक्षा सुद्धा जवळचा मित्र असतो. सुखदुःखाच्या गोष्टी त्याच्याशी आपण जास्त चांगल्या शेअर करू शकतो. त्याच्यासाठी वेळ काढा. त्याच्याशी गप्पागोष्टी करा. अन् थकवा घालवा, त्याला आनंद द्या, स्वतःही मिळवा.