हेकेखोर सासू लस घेत नाही...

हेकेखोर सासू लस घेत नाही…(How To Convince Mother-In-Law For Vaccine?

माझे नुकतेच लग्न झाले आहे. घरात वयोवृद्ध सासू-सासरे, दीर, नणंद असा आमचा परिवार आहे. आता सरकारने वयोवृद्ध लोकांना कोविड विरोधी लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. ती आनंदाची गोष्ट आहे. परंतु आमच्या घरात मात्र लसीकरणावरून मनःस्ताप वाढलेला आहे. कारण माझ्या सासूबाई ही लस टोचून घ्यायला तयार नाहीत. एकतर त्यांना भीती वाटते आहे. लस घेतल्याने ताप येईल का? आम्हाला म्हणजे सासू-सासर्‍यांना ती सोसेल का? त्याचे साईड इफेक्टस् होतील का? अशा नाना शंका सासूबाई उपस्थित करीत आहेत. माझ्या मिस्टरांनी या सर्व शंका घालवल्या तरी त्यांचं समाधान होत नाहीये. अन् मी लस टोचून घेणार नाही, असा आपलाच हेका त्या लावत आहेत. माझे दीर व नणंद यांनीही समजावून सांगितले. अन्य ज्येष्ठ नागरिकांनी, आमच्या नात्यागोत्यातील ज्येष्ठ नातेवाईकांनी लस घेतली, त्यांना काहीही झाले नाही. ताप वगैरे काही आला नाही, असं खुद्द त्यांच्या मुलांनी समजावून सांगितले, तरी ते त्यांच्या मनाला पटत नाहीये. विशेष म्हणजे माझे सासरे लस घ्यायला तयार आहेत. त्यांनाही त्या घेण्याची मनाई करत आहेत. मी घेणार नाही व नवर्‍यालाही घेऊ देणार नाही, अशीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळे झालंय काय की, आमच्या घरात दररोज हा विषय निघतो. सासूबाईंची मनधरणी केली जाते. पण त्या ऐकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मला या गोष्टीचा खूप मनःस्ताप होतो आहे. आपण काही तोडगा सुचवू शकाल का?
-प्रणिता, ठाणे
प्रणिता, खरं सांगायचं तर जी समस्या तू पाठविली आहेस, ती या मंचासाठी योग्य नाही. तरीपण, तुझी मानसिकता, तुला होणारा मनःस्ताप लक्षात घेऊन, मी माझ्यापरीने ती सोडविण्याचा प्रयत्न करते. तुझ्या सासूबाईंचा हट्टी स्वभाव, हा या वयातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा गुणधर्मच आहे. ज्याचा सहसा काही इलाज नसतो. कारण म्हातारी माणसं सहजासहजी आपला हेका सोडायला तयार नसतात. तेव्हा सासूबाईंचा हेकेखोर स्वभाव लक्षात घे. तो क्षणभर बाजूला ठेवायचा झाला तर त्यांना इंजेक्शनची वाटणारी भीती लक्षात घ्यायला हवी. जी सहसा उतारवयात, अन् विशेषतः महिलांमध्ये आढळून येते. म्हणूनच आपले माननीय पंतप्रधान श्री. मोदीजी, यांनी पहिल्याच दिवशी, ज्येष्ठ नागरिक या नात्याने करोना विरोधी लस टोचून घेतली व त्याला व्यापक प्रमाणात प्रसिद्धी दिली. या लसीची भीती बाळगणार्‍या ज्येष्ठांना आपल्या या कृतीने प्रेरणा मिळावी, असा त्यांचा उद्देश होता. मी स्वतः ही लस घेतली व त्यालाही सोशल मीडियावरून प्रसिद्धी दिली. ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी नव्हे, तर साठी ओलांडलेल्यांना प्रेरित करण्यासाठी होती. आमची उदाहरणे तुझ्या सासुबाईंना दे. शिवाय तुमच्या परिवारातील लोकांनी निर्भयपणे लस घेतल्याची उदाहरणे आहेतच. इतःपर त्यांचा लस न घेण्याचा हेका कायम असेलच, तर त्यांच्या अपरोक्ष तुमच्या फॅमिली डॉक्टरना ही समस्या सांगा. अन् सदर लस घेणं किती गरजेचं आहे, हे त्यांच्या तोंडून वदवा. अन्यथा करोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे, असे त्यांना सांगायला लावा. कधी कधी सोनारानं कान टोचले की बरं असतं, नाही का?