गर्भारपणात मधुमेह झाल्यास काय धोके संभवतात? (Ho...

गर्भारपणात मधुमेह झाल्यास काय धोके संभवतात? (How To Control Diabetes In Pregnancy?)

माझी मैत्रीण २ महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या रक्त तपासणीत तिला मधुमेह असल्याचे समजले. तिला इंशुलिनचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. तो योग्य आहे का? 
गर्भारपणाच्या दुसऱ्या महिन्यातच जर मधुमेहाचे निदान झाले असेल तर तुमच्या मैत्रिणीला गर्भारपणाच्या अगोदरपासूनच मधुमेह असण्याची शक्यता आहे. गर्भारपणामुळे जो मधुमेह होतो तो साधारणतः २० आठवड्यानंतर होतो. मधुमेहावर इंशुलिनचे इंजेक्शन अथवा गर्भारपणात चालणाऱ्या गोळ्या हे उपाय आहेत. रक्तशर्करेच्या प्रमाणानुसार इंजेक्शन की गोळ्या हे ठरविता येते. तुमच्या मैत्रिणीची रक्तशर्करा खूपच जास्त असल्यामुळे इंजेक्शनचा सल्ला दिला असावा.

गर्भारपणात मधुमेह झाल्यास स्त्रीला काय धोके असतात?  
गर्भारपणातील मधुमेहामुळे रक्तदाब वाढणे, युरेनरी इंन्फेक्शन होणे, योनी मार्गात जंतुसंसर्ग होणे, सामान्य प्रसूतीस त्रास होणे, प्रसूतीनंतर जंतुसंसर्ग होणे, कमी दिवसांची प्रसूती होणे, गर्भजलाचे प्रमाण जास्त असणे इत्यादी धोके असतात.

गर्भारपणातील मधुमेहामुळे गर्भावर काही परिणाम होतो का? 
गर्भारपणातील मधुमेहामुळे गर्भपात होणे, कमी दिवसाचे मूल जन्मणे, गर्भाचे वजन जास्त वाढणे, सामान्य प्रसूतीस त्रास झाल्याने बाळाला दुखापत होणे, बाळामध्ये व्यंग निर्माण होणे, अचानक बाळ पोटात दगावणे इत्यादी धोके संभवतात.

मधुमेह असताना प्रसूत झालेल्या नवजात बालकाला काही धोके असतात का? 
नवजात बालकाचे वजन जास्त असणे, त्याची रक्तशर्करा कमी होणे, श्वसनास त्रास होणे, रक्ताची घनता जास्त असणे, कावीळ होणे इत्यादी धोके असतात. अशा बालकांना जास्त देखरेखीची आवश्कता असते.