आक्रस्ताळी बायकोला कसं आवरू? (How To Control Ag...

आक्रस्ताळी बायकोला कसं आवरू? (How To Control Aggressive Wife)

आमच्या लग्नाला सात-आठ वर्षं झाली आहेत. अन् माझ्या पत्नीच्या वागणुकीत मोठा बदल झाला आहे. ती क्षुल्लक कारणावरून भांडते. त्यावर मी काही बोलायला गेलो की, तिला अधिकच चेव येतो. ती आणखी जोरात भांडते. भांडताना काय बोलते, याचं तिला भान राहत नाही. एखादा मुद्दा धरून बसते किंवा त्या मुद्यावरून जुन्या गोष्टी आठवून आणखी भांडण उकरून काढते. तिचा आक्रस्ताळी स्वभाव लक्षात आल्यापासून मी गप्प राहतो. परंतु, तेही तिला पसंत पडत नाही. तेव्हा कधी कधी सहन होत नाही म्हणून नाइलाजानं माझा आवाज वाढतो. तेव्हा तर तिचा आवाज इतका वाढतो की, शेजार्‍यापाजार्‍यांनाही ऐकू जातो. कधी कधी ती रागाच्या भरात भांड्यांची आदळआपट करते. हाती लागेल ती वस्तू फेकून देते. एखादी वस्तू मोडली तर? आता महागाईच्या दिवसात ती पुन्हा घेणं परवडतं का? पण हे तिच्या डोक्यात शिरतच नाही. तिचा आक्रस्ताळीपणा चालूच असतो. आम्हाला पाच वर्षांची लहान मुलगी आहे. ती बिचारी घाबरून जाते. रडते. मला मिठी मारून बसते. एकीकडे मला तिची समजूत घालावी लागते. अन् दुसरीकडे बायकोची. तिच्या या स्वभावाचा मला अगदी कंटाळा आला आहे. जीवन नकोसं झालं आहे. यातून सुटकेचा काही मार्ग निघेल काय?

क्वचित काही घरात अशा व्यक्ती आढळतात. काही बायकांना भांडल्याशिवाय चैन पडत नाही. त्या स्वभावतः भांडखोर असतात, म्हणजे आधीपासून. तुमच्या समस्येनुसार तुमच्या बायकोच्या स्वभावात हा बदल नंतर आलेला दिसतो आहे. स्वभावात झालेला हा बदल मानसिक असतो. म्हणजे तिच्या मनात कशाची तरी अतृप्ती आहे. तिला काहीतरी खटकतं आहे. ते ती सरळसरळ व्यक्त करू शकत नाही, म्हणून भांडणाचा आधार घेते आहे. भांडताना ती बेभान होते आहे. त्यामुळेच आपल्याला लहान मुलगी आहे; तिच्यावर काय परिणाम आणि संस्कार होतील, याचं तिला भान राहत नाही. अशा समस्या गुंतागुंतीच्या असतात, हे खरं. त्यातून तोडगा निघू शकेल. जेव्हा ती चांगल्या मूडमध्ये असते, तेव्हा गोड गोड बोलून तिच्या मनात नेमका सल कसला आहे, ते काढून घेण्याचा प्रयत्न करा. रोगाचं मूळ कोठे आहे, ते समजलं की, त्यावर इलाज करणं सोपं जातं. त्यानुसार कारण समजलं की, त्या गोष्टीची पुनरावृत्ती करू नका. तिला समजून घ्या. आठवड्यातून एकदा, सुट्टीच्या दिवशी रविवारी तिला न चुकता फिरायला न्या. बाहेरच्या वातावरणात जरा बरं वाटेल, असं बघा. म्हणजे तेवढाच तुम्हालाही दिलासा मिळेल. एवढंही करून जर सुधारणा दिसून आली नाही, तर हा मोठा मानसिक विकार आहे, असं समजून चांगल्या मनोविकार तज्ज्ञास तिला दाखवून, उपचार करून घ्या. नाउमेद होऊ नका.