ऐकू येत नसलेल्या माणसाशी कसे बोलावे? (How To Co...

ऐकू येत नसलेल्या माणसाशी कसे बोलावे? (How To Communicate With A Hearing Impaired Person)

बहिरेपणा हा मोठा शाप असतो. जी माणसे जन्मतःच बहिरी असतात, ती दुर्दैवाने मुकी पण असतात. त्यांच्या नशिबी बोलणं-ऐकणं नसतं. परंतु काही माणसं एखाद्या अपघातानं किंवा अन्य काही कारणानं बहिरी असतात. विशेषतः वृद्धापकाळी लोकांना कमी ऐकू येते. एखाद्याला एकाच कानाने ऐकू येते, तर अन्य कोणाला अजिबातच ऐकू येत नाही. अशा लोकांशी संवाद साधणे कठीण होऊन बसते. त्याच्याशी मोठ्याने बोलावे लागते. कधीतरी त्याला ऐकू आलेच, तर ‘ओरडता कशाला, मला ऐकू येतंय्,’ असं बोलून तो आपल्याला शरमिंदा करत असतो. काही तज्ज्ञ मंडळींनी आपल्या अनुभवांवरून अशा कमी ऐकू येत असलेल्या  अथवा ऐकायलाच येत नसलेल्या माणसाशी कसे बोलावे, त्याच्या युक्त्या सांगितल्या आहेत.

पुन्हा प्रयत्न करा
ज्याला कमी ऐकू येत असते, त्याच्याशी बोलताना एकच वाक्य 2-3 वेळा बोलावे लागते. असा अनुभव आपल्याला येत असतो. त्यावर निराश होऊ नका. याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, असा सूर लावू नका. पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही बोलताय् ते वाक्य, त्यातील मजकूर बदलून पाहा. थोडक्यात तुमचं म्हणणं मांडा. तुम्हाला काय म्हणायचंय् ते त्याला थोड्या वेळाने समजेल.

ओरडू नका
अशा व्यक्तीशी बोलताना तुमच्या नेहमीच्या आवाजात बोला. ओरडू नका. तसेच स्पष्ट बोला. तोंडातल्या तोंडात किंवा पुटपुटू नका. साधारण खणखणीत आवाजात बोललं तरी त्या व्यक्तीला ऐकू जातं. आता तुमचा आवाज मुळातच मृदू असेल तर आवाजाची पट्टी वाढवून बोलायला हरकत नाही. आपल्या व्यंगावर मात करण्यासाठी जी व्यक्ती कानात बसविण्याच्या यंत्राचा आधार घेते. तिच्या बाबतीत देखील हेच नियम लक्षात ठेवा.

कानात बोलू नका
ज्या व्यक्तीला ऐकायला कमी येते किंवा येत नाही, त्याच्या कानात बोलू नका. कारण अशी व्यक्ती, आपण बोलतो, तेव्हा आपल्या ओठांच्या हालचाली टिपत असते. त्यावरून ती बोललेल्या शब्दांचा अर्थ लावत असते. आपण त्यांच्या कानात बोललो तर ओठांच्या हालचाली दिसणार नाहीत. त्यामुळे कानात बोललेलं ऐकू जाणार नाही व ओठांच्या हालचाली दिसणार नाहीत. त्यामुळे कानात बोललेलं ऐकू जाणार नाही व ओठांच्या हालचाली न दिसल्याने त्यांना अर्थ लावता येणार नाही. अन् घोळ कायमच राहील. तेव्हा हे टाळा.

अडथळ्यात बोलू नका
जुने एअर कंडिशन मशीन, जुना पंखा आवाज करतो. तसेच फिश टँक मधील यंत्र गुरगुरण्याचा आवाज करते. अशा ठिकाणी, त्या बिचार्‍या व्यक्तीच्या ऐकण्यात अडथळा निर्माण होतो. अशा खोलीत, तसेच टी. व्ही. किंवा रेडिओ चालू असेल, त्या जागी त्याच्याशी बोलू नका. या आवाजांनी त्याच्या ऐकण्याला अधिकच मर्यादा येतात.