वाढदिवस विसरणार्‍या नवर्‍याशी कसे वागू? (How To...

वाढदिवस विसरणार्‍या नवर्‍याशी कसे वागू? (How To Behave With A Forgetful Husband?)


माझा नवरा एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करतो. सदैव कामात बिझी असतो. इतका की, त्याला घरातील काही कामे सांगितली तर तो विसरून जातो. ऑफिसच्या कामात तो इतका बुडाला आहे की, घरातही तो कामच करत राहतो. त्याला घरात काय कमी-जास्त आहे, याची क्षिती नसते. ऑफिसला जाताना रुमाल, घड्याळ, पैसे विसरणे एकवेळ मी समजू शकते, पण त्याला आमच्या एकुलत्या एक मुलीचा वाढदिवस लक्षात राहत नाही. तिला तो विश’ करत नाही. तेव्हा मुलगी नाराज होते. माझा वाढदिवस देखील त्याच्या लक्षात राहत नाही. मग आम्हाला गिफ्टस् वगैरे देणे तर दूरची बात! या गोष्टीचा मला खूप राग येतो. नवर्‍याचं माझ्यावर प्रेम कमी झालं की काय, अशी शंका येते. दिवसभरात त्याला माझ्या वाढदिवसाची आठवण येईल, मग तो मला फोन करून विश् करेल. अगदीच काही नाही तर येताना गिफ्ट आणून मला सरप्राईज देईल, अशी मला वेडी आशा असते. पण माझा विरस होतो. कारण यातलं काहीच घडत नाही. मग मी पण रागाच्या भरात त्याला माझ्या वाढदिवसाची आठवण करून देत नाही. पण लहान मुलीचा जीव राहवत नाही. नवरा घरी आल्यावर, रात्री ती त्याला आठवण करून देते. मग घाईघाईत तो आम्हाला चांगल्याशा हॉटेलात नेऊन पार्टी देतो. पण माझा प्रश्न असा आहे की, या विसराळू नवर्‍याशी कसे वागू? त्याला ऑफिसच्या कामाची चांगली आठवण राहते, पण घरच्या लोकांचे वाढदिवस कसा विसरतो? त्याच्या दृष्टीने बायको महत्त्वाची नाही का? त्याच्या या विसराळूपणावर काय तोडगा काढावा, तेच कळत नाही.

  • सीमा, डोंबिवली
    सीमा, तुझा नवरा विसरभोळा आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. पण त्यामुळे त्याचं तुझ्यावर प्रेम कमी झालं आहे, ही समजूत मनातून काढून टाक. कारण असे विसराळू नवरे असतात. बायका देखील अशा वृत्तीच्या असतात. आपण नाही का, काही कामे विसरत. तेव्हा नवर्‍याचा विसरभोळा स्वभाव माहीत असल्याने त्याच्या लक्षात तुझा वाढदिवस राहत नाही, ही बाब अन्य कशाशी जोडू नकोस. तूच सांगितल्याप्रमाणे तो ऑफिसच्या कामात अतिशय बिझी असतो. तो मोठ्या पदावर असेल. कामकाजाची मोठी जबाबदारी त्याच्या अंगावर असेल. म्हणून त्याला तुमचे वाढदिवस लक्षात राहत नाही. नवर्‍याने लक्षात ठेवून आपले वाढदिवस साजरे करावे, हे कोणत्याही बायकोला, त्याच्या मुलीला वाटणे स्वाभाविक आहे. हा दिवस गोड व्हावा. गिफ्ट घेऊन आनंद मिळवावा, असे सगळ्यांनाच वाटते. पण तुझ्या पदरी विसराळू नवरा पडलाय्, त्याला काय करणार. अर्थात् असा विचार करून हताश होऊ नकोस. अन् मी त्याला वाढदिवसाची आठवण करून देणार नाही, असा अहंगंड देखील बाळगू नकोस. कारण हे असंच चालू राहिलं तर तुमच्या नवरा-बायकोच्या नात्यात कटुता येईल. तुला राग येत राहील व त्याला गिल्टी वाटत राहील. तेव्हा ही बाब गोडीगुलाबीत घे. तू आपल्या नवर्‍याला समजावून सांग की, माझ्या तुझ्याकडून ह्या ह्या अपेक्षा आहेत! त्या तू पूर्ण केल्या नाहीस तर मी दुखावते. नवर्‍याला सांग की, त्याच्या फोनमध्ये तुझ्या व मुलीच्या वाढदिवसांच्या तारखेचा रिमाईंडर सेट करून ठेव. म्हणजे विसरायला होणार नाही. प्रेम बहरायला दोन्ही बाजूंनी फुलावं लागतं, हे लक्षात असू दे!