प्रोफेशनल कसं व्हावं? (How To Become Profession...

प्रोफेशनल कसं व्हावं? (How To Become Professional?)

करिअरच्या संदर्भात बोलताना तो किंवा ती व्यक्ती प्रोफेशनल आहे, असं म्हटलं की त्या व्यक्तीचं वजन वाढतं. आपल्या कार्यक्षेत्रात तो पक्का व्यवहारी आहे, असा त्याचा अर्थ काढला जातो. म्हणजे, ती व्यक्ती पक्की व्यावसायिक आहे, त्यात भावनेला थारा नाही; असं त्या व्यक्तीचं गुणवैशिष्ट्य म्हटलं जातं.

आजकाल ‘प्रोफेशनल’ या शब्दाला मोठी प्रतिष्ठा लाभली आहे. करिअरच्या संदर्भात बोलताना तो किंवा ती व्यक्ती प्रोफेशनल आहे, असं म्हटलं की त्या व्यक्तीचं वजन वाढतं. आपल्या कार्यक्षेत्रात तो पक्का व्यवहारी आहे, असा त्याचा अर्थ काढला जातो. म्हणजे ती व्यक्ती पक्की व्यावसायिक आहे, त्यात भावनेला थारा नाही; असं त्या व्यक्तीचं गुणवैशिष्ट्य म्हटलं जातं. ती व्यक्ती आपलं काम चोख करते, यश मिळवते; असं समजलं जातं. त्यामुळे ‘बी प्रोफेशनल’, ‘आर यू प्रोफेशनल’, ‘ही/शी इज प्रोफेशनल’, ‘प्रोफेशनल अ‍ॅप्रोच’ असे शब्दप्रयोग प्रतिष्ठेचे मानले जातात. मग अशी प्रतिष्ठा आपणही मिळवली पाहिजे ना? आपण प्रोफेशनल कसे होऊ शकतो, याचा हा मागोवा…

सावध राहा
आपण ज्या ऑफिसात काम करतो, तिथे कामाचा ताण जास्त असला तरी त्याची चर्चा आपल्या सहकार्‍यांशी कधीच करू नका. कारण सहकार्‍यांबाबत कायम सावध राहिलं पाहिजे. कोण, कसा, किती वरिष्ठांशी जवळीक साधून असेल, ते आपल्याला कळत नाही. विशेषतः नवीन नोकरी असेल तर, ही सावधगिरी जास्तच बाळगली पाहिजे. असा एखादा सहकारी आगलाव्या असला तर तो आपले शब्द वरिष्ठांच्या कानावर घालण्याची शक्यता अधिक. अन् तुम्ही तक्रार करता किंवा इतरांचा उत्साहही कमी करता म्हणून वरिष्ठांचा ओरडा खाण्याची शक्यता अधिक राहील. तेव्हा कामाचा ताण असला तरी त्याचा गवगवा न करता आपल्या जवळच्या बॉसशी किंवा त्याहून वरिष्ठांशी चर्चा करून ही समस्या सोडवा. अशी वर्तणूक प्रोफेशनल होईल.

श्रेय लाटू नका
ऑफिसातील कामकाज ही एक शृंखला असते. कामं एकमेकांच्या सहकार्याने होत असतात. कधी कधी असं होतं की, आपला सहकारी एखादं काम पूर्णत्वास नेतो; पण परिस्थिती अशी निर्माण होते की, त्याचं श्रेय आपल्या पदरात येऊन पडतं. आपलं कौतुक होतं. न केलेल्या कामाचं श्रेय मिळतंय, हे ऐकून आपण खूशही होतो. अन् कधी कधी सहकार्‍याचं कौतुकही स्वीकारतो. पण ज्याने हे काम खरोखरीच तडीस नेलं असतं, ज्याला त्याचं श्रेय मिळायचं असतं, तो मात्र मनातून नाराज होतो. तेव्हा असं करू नका. दुसर्‍याचं श्रेय लाटू नका. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं, निष्कपट राहावं. अन्यथा पुढे-मागे हे श्रेय लाटल्याचं प्रकरण उघडकीला आलं, तर आपले साहेबलोक आणि सहकारी यांच्या नजरेतून आपण उतराल. ते तुम्हाला मान देणार नाहीत. तेव्हा कामकाज सांभाळताना नीतिमूल्यं जपली पाहिजेत.
ऑफिसातील काही कर्मचारी अतिशय उतावळ्या स्वभावाचे असतात. बॉसचं लांगूलचालन करण्यात धन्यता मानणारे असतात. त्यामुळे बॉसच्या पुढेपुढे करण्याच्या नादात त्यांनी जे काम दिलं असतं, ते पूर्णपणे समजून न घेता, घाईघाईने त्यात हात घालतात. ही वागणूक ‘अनप्रोफेशनल’ म्हणता येईल. आपल्या हातून असं काही घडू देऊ नका. आपल्याला साहेबांनी दिलेलं काम अथवा प्रोजेक्ट त्यांच्याकडून नीट समजून घ्या. काही शंका असेल, तर सरळ त्यांनाच विचारा. भीड बाळगून सहकार्‍यांना विचारत राहाल, तर चुकीचा मार्ग दाखवला जाण्याची शक्यता अधिक. तेव्हा साहेबच काय ते योग्य मार्गदर्शन करू शकतात. अन् आपलं काम सहज मार्गी लागेल. शंका विचारली तर आपल्याबद्दल वाईट इम्प्रेशन होईल का, असा किंतु मनात बाळगू नका. कारण त्या कामात पुढे चुका झाल्या, तर त्यांची बोलणी खाण्यापेक्षा अथवा क्षमा मागण्याची वेळ येण्यापेक्षा शंकानिरसन केलेलं बरं.

लक्ष्मणरेषा आखा
कधीकधी आपल्या घरात तणावाचे प्रसंग होतात. जोडीदाराशी, सासू-सासर्‍यांशी, नणंद-दिराशी भांडणं होतात. नातेसंबंधातील हे बिघाड आपली मनःस्थिती बिघडवतात. त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. कामातून लक्ष उडतं. पण खरा ‘प्रोफेशनल’ माणूस असतो, तो या गोष्टींचा परिणाम कामावर होऊ देत नाही. आपल्या घरातील ताणतणाव विसरून तो कामाला लागतो. नेहमीच्याच एकाग्रतेने काम निभावतो. नात्यांमध्ये विसंवाद निर्माण करणार्‍या समस्या जर आपण चिवडत बसलो, तर त्या सुटणार आहेत का? याचा विचार करा. अन् त्यांना बाजूला सारून कामात गढून जा. अगदीच मन लागेनासं झालं, तर आपल्या बॉसच्या कानावर या गोष्टी घाला. म्हणजे ते समजूतदारपणा दाखवून सांभाळून घेतील. मात्र या ताणतणावातून मी लवकरच बाहेर पडीन आणि कामात कसूर करणार नाही, असा निर्धार त्यांच्याकडे व्यक्त करा. म्हणजे त्यांनाही तुम्हाला समजून घेणं सोपं जाईल. आपलं खासगी आयुष्य आणि प्रोफेशनल वर्तणूक यामध्ये लक्ष्मणरेषा आखा. दोन्ही गोष्टींची सरमिसळ होऊ देऊ नका. तर तुम्ही खरे प्रोफेशनल गणले जाल.

सुट्टी उपभोगा
आपल्याकडे कित्येक खासगी कंपन्यांमध्ये सुट्टीच्या दिवशीही कर्मचार्‍यांना कामाला लावण्याची प्रथा आहे. सुट्टीच्या काळात त्या बिचार्‍याला विश्रांती घेण्याऐवजी घरात बसून काम करावं लागतं. यामध्ये कधी तरी कर्मचार्‍याची दिरंगाई असते. आदल्या दिवशी नेमून दिलेलं काम त्याने पूर्ण केलेलं नसतं, म्हणून साहेबलोक त्याला नेट लावतात. तर कधी बॉसहट्ट म्हणून ते कामाला जुंपतात. म्हणूनच आपण काम कधी पेंडिंग ठेवू नये. अन् बॉसने हट्ट धरला तरी, आपण उद्या-सोमवारी ऑफिसात आल्या आल्या करून देऊ, असा विश्‍वास निर्माण केला पाहिजे. म्हणजे आपली सुट्टी वाया जाणार नाही. अन् तुम्ही खरे प्रोफेशनल ठराल.

जुन्यांसारखं वागू नका
आपली नोकरी नवी असते, तेव्हा प्रोबेशन पिरेड असतो. आपली कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि कामावरील निष्ठा दाखवण्याची ही सुसंधी असते. या काळातच प्रामाणिकपणे, सचोटीने काम करून आपली व्यावहारिक क्षमता सिद्ध केली पाहिजे. जुन्या कर्मचार्‍यांप्रमाणे जास्त वेळ गप्पा मारणं, वारंवार चहा-कॉफी पिणं, ऑफिसच्या वेळात शॉपिंगला जाणं इत्यादी गोष्टी टाळा. म्हणजे तुमची चांगली छाप वरिष्ठांवर पडेल. एक कामसू कर्मचारी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. या काळात शक्यतो गैरहजर राहू नका. कामावर गैरहजर राहिल्याने आपलं इम्प्रेशन चुकीचंच पडतं, हे लक्षात घ्या. अगदीच आणीबाणीचा प्रसंग आला, तर वरिष्ठांशी सौजन्याने बोलून, आपली अत्यावश्यक निकड स्पष्टपणे सांगून गैरहजेरी मंजूर करून घ्या. मुख्य म्हणजे, आपलं काम पेंडिंग ठेवू नका.
इमर्जन्सी कधीही येऊ शकते, हे मान्य. म्हणूनच दररोज ऑफिस सोडण्यापूर्वीच हाती असलेलं काम पूर्ण करण्याची सवय लावून घ्या. म्हणजे, चोख काम करणारा कर्मचारी अशी तुमची प्रतिमा कार्यालयात निर्माण होईल.