मेकअपचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून… [How T...

मेकअपचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून… [How To Avoid Side-Effects Of Makeup]

केस धुण्यासाठी शाम्पू वापरल्यास केस गळतात का? शाम्पू वापरावा का नाही? तो कसा वापरावा?

 • नेत्रा, कळवा
  केसांच्या स्वच्छतेसाठी शाम्पू वापरण्यास हरकत नाही. परंतु तो वापरताना डायल्यूट करून वापरावा. म्हणजे 1 कप पाण्यात 1 चमचा शाम्पू असं प्रमाण घ्यावं. तसेच केस धुताना शाम्पू केसांतून पूर्णपणे गेला नाही तर केस गळू शकतात. म्हणून नेहमी आवळा पावडर किंवा 5 ते 6 थेंब लिंबाचा रस कपभर पाण्यात मिसळून ते पाणी आंघोळ झाल्यावर शेवटी केसांवर ओतावे, म्हणजे केस निरोगी राहतील.
  मला कांजण्या आल्या होत्या. त्या आता गेल्या असल्या तरी चेहर्‍यावर त्यांचे व्रण राहिले आहेत. हे व्रण जावेत म्हणून काही उपाय आहे का?
 • हर्षवी, मुंबई
  आपल्या चेहर्‍यावर त्वचेचे जे थर असतात ते कांजण्या फुटल्यानंतर नष्ट होतात आणि त्या ठिकाणी व्रण राहतात. मुरुमं फोडल्यानंतरही असेच खड्डे राहतात. या व्रणांवर पिकलेल्या पपईचा आणि कोरफडीचा गर सम प्रमाणात एकत्र करून रोज लावा. यामुळे हळूहळू त्वचेचे नष्ट झालेले थर पुन्हा तयार होतील आणि संपूर्ण त्वचा एकसंध होईल. पपई आणि कोरफड यामध्ये त्वचेच्या पेशी निर्माण करण्याची अमूल्य शक्ती आहे. पपईची पातळ चकती कापून बशीमध्ये उपडी घालून ठेवल्यास, पपई टिकतो आणि तीन-चार दिवस सलग वापरता येतो.
  मेकअप करण्यापूर्वी व मेकअप काढताना त्वचेवर दुष्परिणाम होऊ नये, म्हणून कोणती काळजी घेऊ?
 • सुप्रिया, सांगली
  मेकअप करताना आपली त्वचा जर तेलकट असेल, तर चेहरा स्वच्छ धुऊन ओल्या कापसावर 2-3 थेंब अ‍ॅस्ट्रिंजंट घेऊन तो कापूस चेहर्‍यावर फिरवा. त्यामुळे त्वचेवरील रोम छिद्रं बंद होतील. जर त्वचा शुष्क असेल, तर चेहरा व मान धुऊन पुसून घ्या. नंतर हातावर थोडं मॉइश्‍चरायजर घेऊन ते चेहर्‍यास लावा. त्यामुळे मेकअप फुटणार नाही आणि एकसंघ दिसेल. मेकअप उतरवताना आधी टीश्यूने लिपस्टिक पुसा, नंतर मेकअप रिमुव्हर किंवा क्रीमने चेहरा पुसून घ्या. याकरिता खोबरेल तेलही वापरू शकता. तेलकट त्वचा असल्यास टीश्यू पेपर आणि वॉटरबेस रिमुव्हरनेच मेकअप काढा.
  आमच्या इथे कोरडी हवा आहे, त्यात थंडीचे दिवस. थंडीमुळे हातापायांना भेगा पडून त्वचेचे पापुद्रे निघत आहेत. यावर काही उपाय सांगितलात तर बरं होईल?
 • रेवती, वसई
  बदलत्या हवामानाचा आपल्या संपूर्ण शरीरावरच परिणाम घडत असतो. थंडीमुळे हातापायांना जर भेगा पडल्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी भेगांना नाइट क्रीम किंवा कोमट तेल लावून हात व पायमोजे घालून झोपा. त्यामुळे हळूहळू भेगा नाहीशा होतील. तसेच रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर प्रथम एक ग्लास गरम किंवा कोमट पाणी प्या. म्हणजे सर्वांग अर्थात केस, नखे, डोळे, त्वचा सतेज होतील.