मुलांमुळे येणारा दुरावा कसा टाळावा? (How To Avo...

मुलांमुळे येणारा दुरावा कसा टाळावा? (How To Avoid Differences In Married Life, Caused By Children)

लग्नानंतर येऊ घातलेल्या लहान बाळाची प्रतिक्षा असते. त्याच्या आगमनाची चाहूल लागताच पती-पत्नी हरखून जातात. त्याच्या संगोपनाची स्वप्ने पाहू लागतात. आगमनाची जय्यत तयारी केली जाते. अन् बाळराजे घरात आले की, आई-बाबा झाल्याचा आनंद खूप मोठा असतो. पण कधी कधी असं होतं की, बाळाच्या संगोपनात, आई इतकी रममाण होते की, ’बाबा’ कडे तिचं दुर्लक्ष होतं. काही ’बाबा’ देखील इतके तृप्त होतात, की फक्त स्वतःकडे बघतात. आपल्या सहचारिणीकडे त्यांचे दुर्लक्ष होते.
तिला खेळायला, वेळ घालवायला एक खेळणं दिलंय् ना; बस्स आपलं कर्तव्य संपलं. अशी भावना अशा अप्पलपोट्या पतीदेवांमध्ये निर्माण होते. अन् मग पती-पत्नीमध्ये भावनिक दुरावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. खरं तर असं होता कामा नये, पण काही जोडप्यांच्या जीवनात ही स्थिती येते.

relationship

बदल सहज स्वीकारा
एक गोष्ट निश्चितच आहे की, आई-बाबा झाल्यावर पती-पत्नीच्या जीवनात बदल होतात. पत्नीचे बदल शारीरिक व मानसिक असतात. तर पुरुषाचे केवळ मानसिक. हे अगदी नैसर्गिक आहेत, असं समजून आपली वर्तणूक असली पाहिजे. एकमेकांकडे दुर्लक्ष न करता, बाळाचे संगोपन केले पाहिजे. ऑफिसचे कामकाज जितके महत्त्वाचे तितकेच संसाराचा रथ सुखाने हाकणे महत्त्वाचे आहे. नवजात बाळाचे पालनपोषण दोघांनी मिळूनच करायचे आहे नि आपलं पती-पत्नीचं नातं देखील सांभाळायचं आहे, या भावनेने आपली वर्तणूक असली पाहिजे. शरीराचा आणि स्वभावाचा बदल सहज स्वीकारलात तर तक्रारीला वाव राहणार नाही.

प्रेम टिकवा
काही जोडप्यांची त्यातही पतीची अशी तक्रार असते की, बाळाच्या जन्मामुळे पत्नीची कामभावना कमी झाली आहे. हे अर्धसत्य असते. पत्नीच्या अंगी ममत्त्व भावना वाढीस लागली असल्याने कामभावना झाकोळली जाते, हे खरं असलं तरी कामभावना कमी झाली, असा स्वतर्क लढविण्यात अर्थ नाही. डॉक्टरी सल्ल्यानुसार पुन्हा शरीरसंबंध प्रस्थापित करावे. मात्र त्यात पुरुषाने आततायीपणा दाखवू नये. बाळ हे शरीरसंबंधात अडसर आहे, ही भावना काढून टाका. रात्री बाळ गाढ झोपते, तेव्हा दोघांनाही प्रेम करायला भरपूर वेळ असतो. त्याचा लाभ उठवा. दिवसा वेळ मिळेल तसे एकमेकांना मोबाईल वरून मेसेज पाठवा. त्यातून प्रेमभावना, कामभावना व्यक्त करा. म्हणजे शरीर दाह शाश्वत राहील.

relationship

रागावर नियंत्रण ठेवा
घरात मूल आले की, जबाबदार्‍या वाढतात, मुलाच्या आगमनाने यदाकदाचित करिअरमध्ये उत्कर्ष झाला तर तिकडेही काम जास्त करावे लागते. पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे किंवा व्यवसाय सांभाळणारे असेल तर घरी यायला उशीर होतो. सहवास कमी होतो. दुरावा वाढू लागतो. त्यामुळे ताणतणाव निर्माण होतात आणि चिडचिड सुरू होते. या गोष्टींची जाणीव ठेवूनच वागा. रागावर नियंत्रण ठेवा. लहानसहान गोष्टींवरून आकांडतांडव करू नका. एकमेकांना समजून घेत, परिस्थितीवर मात करा.

relationship

एवढं करूनही स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर मित्रमंडळींचा, आप्तेष्टांचा सल्ला घ्या. त्यांच्याही घरात मूल आल्याने व त्यामुळे दुरावा निर्माण झाल्याने, त्यांनी परिस्थिती कशी हाताळली, याबाबत सल्ला घ्या.

relationship