दोन मने दुरावण्याआधी नाती करून घ्या शुद्ध (How ...

दोन मने दुरावण्याआधी नाती करून घ्या शुद्ध (How To Avoid Break Up And Maintain Everlasting Relationship)

लग्नानंतर काहीच वर्षांत पती-पत्नीच्या नात्यात ताणतणाव वाढत असतील अन् त्यांना एकमेकांचा कंटाळा आला असेल, तर वेळीच सावध व्हा! आपलं काय चुकतंय् ते समजून घ्या आणि आपले, पती-पत्नीचे संबंध शुद्ध करून घ्या.
संसाराचा रथ जसजसा पुढे चालत जातो, तसतसे पती-पत्नी एकमेकांच्या बाबतीत निष्काळजी होऊ लागतात. याला अपवाद असतील. पण पुष्कळ जोडप्यांच्या बाबतीत असे लक्षात येते की, ते एकमेकांना गृहित धरून चालतात. आयुष्याच्या आलेखात असा चढ दिसतो. अन् हे गृहित धरणे वाढले किंवा एकमेकांच्या संबंधात निष्काळजीपणा वाढला, तर नात्यांमध्ये ताणतणाव वाढतात. पूर्वी ज्या गोष्टी आवडत्या असतात, त्या आता नावडत्या होऊ लागतात अन् काही लोकांचे संबंध दुरावतात.
आपल्याही बाबतीत, जर असं घडत असेल, अन् एकमेकांचा कंटाळा आला असेल, तर वेळीच सावध व्हा! आपलं काय चुकतंय् ते समजून घ्या आणि आपले, पती-पत्नीचे संबंध शुद्ध करून घ्या. यासाठी फार काही कष्ट करायचे नाही आहेत. थोडासा समजुतदारपणा आणि थोडीशी मौजमजा करून नाती शुद्ध होतील.

एकमेकांसाठी सवड काढा
आत्ताच्या स्पर्धेच्या युगात, कामाच्या धबडग्यात एकमेकांसाठी वेळ देता येत नाही, ही बर्‍याच लोकांची तक्रार आहे. त्यावर कुरघोडी करा. इतर कामांसाठी आपण जसा निश्चितपणे वेळ काढतो, तसा एकमेकांसाठी काढा. अगदी दररोज. कपाळावर आठ्या चढवू नका. प्रयत्न करा. नक्कीच जमेल. सकाळी चहा घेतानाची वेळ सर्वोत्तम. कालच्या लहानसहान गोष्टी शेअर करा. आजचा दिनक्रम ठरवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे खास काढलेल्या या वेळेत तक्रारी करू नका. सकारात्मक, साधकबाधक चर्चा करा. भावनांची देवाणघेवाण सकारात्मक रीतीने केलीत, तर मने आपोआप शुद्ध होतील.
एकमेकांसाठी ही सवड जर रात्री काढणार असाल, तर अधिकच छान. कारण दिवसभराचा ताळेबंद साधण्यासाठी ही वेळ उत्तम. हसतखेळत क्षण घालवा. एकमेकांच्या चांगल्या कामाचे कौतुक करा. उत्तम रोमान्स करा. या गोष्टींनी नात्यात शुद्धता तर राहिलच. पण दिवसभराच्या कामाचा ताणतणाव निघून जाईल. झोप छान लागेल. अन् दुसर्‍या दिवशी ताजेतवाने होऊन कामास भिडाल अन् असेच सुंदर क्षण रात्री घालवायचे आहेत, या स्वप्नरंजनात दंग राहाल.

अहंकार मिटवा
पती-पत्नी यांच्या पुष्कळशा नात्यांमध्ये बिघाड आणणारी मोठी गोष्ट म्हणजे अहंकार. दोघांपैकी कोणी एकाचा अहंकार संसाररथाचं चाक खिळखिळं करतो. तेव्हा या अहंकाराला मूठमाती द्या. मी म्हणेन, तसंच झालं पाहिजे. मी म्हणेन तसंच तू ऐकलं पाहिजेस… मी-मी आणि मी, ही वृत्ती सोडून द्या. आपल्या जोडीदाराच्या मनासारखं वागलात, तर पती-पत्नीचे नाते अधिक दृढ होईल. आपलाच हेका चालवण्यापेक्षा जोडीदाराच्या कलाने घेतलं तर तोही त्याचा अहंकार बाजूला ठेवून निरंकारी होईल. अन् नात्यात ठिणग्या पडणार नाहीत.
आत्ताच्या काळात नवरा-बायको, दोघेही आपापल्या कामात मग्न राहतात. त्यात पुन्हा मुलांचे छंद, त्यांचे संगोपन, शाळा-कॉलेज आणि हट्ट यातही आपली एनर्जी पुष्कळशी खर्ची पडते. ती पुन्हा मिळवण्यासाठी या सर्व समस्यांपासून दूर जा. म्हणजे वीकएन्डला घराबाहेर जा. कधी मुलांना घेऊन, तर कधी मुलांना सोडून. घराच्या चार भिंती, ऑफिसचे कामाचे कुंपण यातून वेगळ्या वातावरणात गेलात की, जीवाला बरे वाटेल. अन् मनाची व नात्यांची प्रसन्नता वाढेल.
नाती कितीही सांभाळायची म्हटली तरी प्रत्येकाचे स्वभाव भिन्न असल्याने भांड्याला भांडे लागणारच. छोट्याशा गोष्टीवरून नोकझोक होणारच. मात्र ही प्रकरणे वाढवू नका. मुद्दे ताणू नका. माणूस आहे; चूक होणारच; हे आपणच बोलतो. मग ते समजून घ्या. अन् चूक झालीच तर रागराग करण्याऐवजी, रुसून बसण्याऐवजी खिलाडूवृत्तीने घ्या. ज्याच्या हातून चूक झाली असेल, त्याने आपल्या साथीदाराला ’सॉरी’, ’चुकलं माझं’ म्हणण्यात कमीपणा मानू नये. म्हणजे बघा, नाती पाण्यासारखी स्वच्छ होतील.

शरीरसंबंधाची ओढ वाढवा
पती-पत्नीमधील नाजूक नातं लैंगिक संबंधाने अधिक नितळ राहतं. असं जगभरातील मानसशास्त्रज्ञांनी आणि लैंगिक समस्या तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितलं आहे. त्याकडे लक्ष द्या. नियमितपणे, निरामय कामजीवन उपभोगले तर मन आणि शरीर निरोगी राहतं. आनंदी जीवन जगता येतं. कामजीवनात समाधान असलं की, नातीगोती नितळ राहतात. तेव्हा कामजीवन उपभोगण्यात कसूर नसावी. वयोमानानुसार बव्हंशी जोडप्यांमध्ये नीरसता येते. शरीरसंबंधात रुचि कमी होते. त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे संबंध ठेवा. कामशास्त्रावरील पुस्तके किंवा इंटरनेटचे महाजाल संदर्भात मार्गदर्शक ठरावीत. वेगवेगळ्या आसनांनी शरीरसुख उपभोगलं की, त्यातील नीरसता कमी होईल. उलट त्याची ओढ वाटेल. शिवाय त्यासाठी वेगवेगळ्या जागा शोधा. बेडरूममध्येच ही मौज अनुभवली पाहिजे, असं काही शास्त्र नाहिये. वेगळ्या स्थानावर केलेली मौज महाआनंद मिळवून देईल.