मोबाईलचा अतिरेक टाळा, गरजेपुरताच वापरा (How To ...

मोबाईलचा अतिरेक टाळा, गरजेपुरताच वापरा (How To Avoid Addiction Of Mobile Phones?)

मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एक दिवस जरी मोबाईल आपण घरी विसरून ऑफिसला गेलो तर आपली केवढी मोठी पंचाईत होते हे प्रत्येकाने आजपर्यंत एकदा तरी अनुभवले असेलच. मोबाईलचे खरंच खूप चांगले फायदे आहेत. पण, आपण याच्या फायद्याकडे लक्ष न देता त्याचा जास्तच वापर करत चाललो आहोत. मोबाईलचा अतिरेक होत असेल तर तो अतिरेक वेळीच आपल्याकडून थांबवला गेला पाहिजे. ते म्हणजे मोबाईल जर आपल्या जीवनासाठी धोकादायक ठरत असेल तर त्याचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, आपण मात्र मोबाईलचा वापर कमी गैरवापरच जास्त करून घेत आहोत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
रस्ता ओलांडताना मोबाईलवर बोलणे टाळले पाहिजे, हेही आपल्याला मोबाईलवर बोलताना लक्षात राहत नाही. काही दिवसांपूर्वी कॉलेज मधील विद्यार्थ्याचा मोबाईलवर गाणी ऐकत रेल्वे रूळ ओलांडताना दुर्दैवी मृत्यू झाला. मुळातच रेल्वे ओलांडणे चुकीचे आहे हे माहीत असूनही वेळ वाचवण्यासाठी बरेचजण हा धोका पत्करतात. त्याचबरोबर रेल्वेचा मोटरमन त्या मुलाला वाचवण्यासाठी बराचवेळ फोन वाजत होता. पण, त्याला तो फोन ऐकूच कसा जाणार..? कारण तो एअर फोनद्वारे मोबाईलवरचे गाणे ऐकत असल्यामुळे त्याला हॉर्न ऐकू गेला नाही. आणि मोबाईलमध्ये गाणी ऐकण्याच्या नादापायी त्याने स्वतःचा जीव गमावला.
मोबाईलवर तासनतास घालवणार्‍या तरुण मंडळीला त्यांच्या ’मिस्ड कॉल’ किंवा ’मेसेज’ला उत्तर आलं नाही तर त्यांची प्रचंड अस्वस्थता होते. नोकरी/ अभ्यासावरचं लक्ष कमी होते. कुटुंबापासून दुरावत जाणं अशा समस्या सुरू होतात. आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या बर्‍याच लोकांना मोबाईलचे व्यसन लागतं असंही लक्षात आलं आहे. सतत कोणाशी तरी आपण कनेक्टेड आहोत, असा दिलासा त्यांना हवा असतो. अशा लोकांचा मोबाईल थोडा वेळ त्यांच्यापाशी नसला किंवा तो बंद केला तर ते चिंताग्रस्त होतात. ही एक समस्या म्हणावी लागेल.


आजकाल मोबाईल फोन, त्यातला कॅमेरा आणि व्हिडिओ फोनमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येत आहे. मोबाईलवरून काढला जाणारा ’व्हिडिओ फिल्म’मुळे काही मुलींचं आयुष्य उद्धवस्त झालं आहे. दहशतवादी लोकांना वेगळे सिमकार्ड वापरतात येतात आणि गुन्हे करण्यास सोपे जात आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोन वापरल्यामुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या एका अहवालानुसार गाडी चालवताना मोबाईल अगदी हँडस फ्री जरी वापरला तरी अपघाताची शक्यता चारपट असते.
भारतात जवळपास 90 कोटी लोक मोबाइल फोनचा वापर करतात. रस्ता ओलांडताना, गाडी चालविताना, इतकेच नाही तर रेल्वे रूळ ओलांडतानादेखील माणसे मोबाईलवर बोलत असतात. त्यातूनच अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. पण, तरीही आपण जागरूक होत नाही. ’प्राण जाये पण मोबाईल ना जाये’ अशी परिस्थिती आपल्याकडे आलेली दिसते. मोबाईलचा वापर बंद करावा असे मी मुळीच म्हणणार नाही. पण, आपल्या समाजाला मोबाईलसाक्षर होणे खूप गरजेचे आहे. ही साक्षरता येण्यासाठी माणसांमध्ये परिपक्वता यायला पाहिजे. शक्यतो मोबाईलवर बोलताना कामापुरतेच बोलावे. तासनतास गप्पा मारत बसू नये. शक्य असेल तिथे लँडलाईन फोनचा वापर करावा. तसेच एसएमएसद्वारे बरेचसे निरोप पोचवता येऊ शकतात. त्यासाठी मोबाईल कानाजवळ नेण्याची गरज नसते. अशा काही गोष्टींचे आपण पालन केले तर मोबाईलचा वापर नक्कीच मर्यादित होऊ शकतो आणि त्यापासून होणार्‍या दुष्परिणामांपासून आपला बचाव होऊ शकतो.
-दादासाहेब येंधे